आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • The Possibility Of Contesting In The BJP Sena With The Change Of Party Of MLA Rana

आमदार राणांच्या पक्ष बदलाने भाजप-सेनेत लढतीची शक्यता

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

प्रवीण पवार 

उस्मानाबाद - उस्मानाबाद-कळंब विधानसभा मतदारसंघातील निवडणुकांचे चित्र पाहता माजी मंत्री डॉ.पद्मसिंह पाटील, विद्यमान आमदार राणाजगजितसिंह या पितापुत्रांविरोधात सर्वपक्षीय अशीच लढत दिसून आली. परंतु, नुकताच आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याने मतदारसंघातील राजकीय समीकरणेच बदलली आहेत.  विधानसभा निवडणुकीसाठी महायुती विरोधात आघाडी अशा लढतीऐवजी शिवसेना विरोधात भाजप अशी लढत पहायला मिळाल्यास नवल वाटू नये.

राष्ट्रवादीतून भाजपमध्ये प्रवेश केलेले विद्यमान आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी शिवसेनेच्या ओमराजे यांचा ११,३०६ मतांनी पराभव केला होता. त्याची परतफेड ओमराजे यांनी लोकसभा निवडणूक २०१९ मध्ये तब्बल सव्वा लाखापेक्षा जास्त मताधिक्याने करून लाेकसभेसाठी शिवसेनेचा बालेकिल्ला कायम ठेवला होता. परंतु, आता राणाजगजिसिंह भाजपमध्ये गेल्याने व खा. ओमराजे हे महायुतीत शिवसेनेचे खासदार असल्याने उस्मानाबादेत महायुती विरोधात आघाडी ऐवजी भाजप विरोधात शिवसेना असे चित्र असू शकते. 

राष्ट्रवादीत संभ्रम कायम :
माजी मंत्री पद्मसिंह व आमदार राणाजगजितसिंह या पाटील पुत्रांनी भाजपची वाट धरली आहे.  परंतु, राष्ट्रवादीचा जिल्ह्यातील एक मोठा गट राष्ट्रवादीतच राहिला आहे. तसेच उस्मानाबाद-कळंब विधानसभा मतदारसंघातील अनेक स्थानिक स्वराज संस्थांच्या लोकप्रतिनिधींनी अद्याप आपली भूमिका स्पष्ट केलेली नाही. दुसरीकडे राणाजगजितसिंह कार्यकर्त्यांना मेळाव्यातून आजमावण्यात व्यस्त असताना राष्ट्रवादीतील नेते मात्र सक्रिय होऊन तयारीला लागले आहेत.
 

हे असू शकतात संभाव्य उमेदवार 
उस्मानाबादचे विद्यमान आमदार राणाजगजितसिंह भाजपमध्ये गेल्याने  हा मतदारसंघ भाजपकडे घेण्यासाठी प्रयत्न होत आहेत. परंतु, सेनेचा प्रचंड विरोध पाहता त्यांना तुळजापूरचाही पर्याय ठेवला आहे. दुसरीकडे राष्ट्रवादीकडून उस्मानाबादेत पदाधिकारी, कार्यकर्त्यांना बळ देण्यासाठी बैठका, मेळावे घेतले जात असले तरी उमेदवार कोण याबाबत संभ्रम आहे. सेनेकडून नगराध्यक्ष मकरंद राजेनिंबाळकर, जिल्हा प्रमुख कैलास पाटील यांचीही नावे चर्चेत आहेत.  
 

२०१४ मधील विधानसभेची स्थिती
राणा पाटील  :   राष्ट्रवादी     ८८,४६९ 
ओमराजे   :     शिवसेना    ७७,१६३
संजय दुधगावकर  :    भाजप    २६,०८१
विश्वास शिंदे  :   काँग्रेस       ९०१८
 

या आहेत मतदारसंघातील समस्या
>  या मतदारसंघात शाश्वत पाणीस्राेत नाही.  त्यामुळे शेतीचा व्यवसायही बेभरवशाचा आहे. 
> उद्योगांअभावी राेजगाराची संधी नाही.   तरुणवर्ग पुणे, मुंबई अशा मोठ्या शहरांकडे स्थलांतरित होत आहे. 
> बाजारपेठही स्थानिक नागरिकांवरच अवलंबून आहे.  
> शेती आणि शेतीपूरक व्यवसायासाठी पाण्याची गरज.