आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मंत्रिमंडळाच्या बैठकीत मुख्यमंत्र्यांसोबत युवा सेना सचिव वरुण सरदेसाईंची उपस्थिती वादात

2 वर्षांपूर्वीलेखक: प्रवीण पवार
  • कॉपी लिंक

मुंबई - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मेहुणीचा मुलगा युवा सेना सचिव वरुण सरदेसाई मंत्रालयातील बैठकीला उपस्थित राहिला असल्याचे छायाचित्र समोर आल्याने भाजप आणि मनसेने यावर टीकास्र सोडले आहे, तर मागील सरकारच्या काळात माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता या बैठकांना उपस्थित राहिल्याची छायाचित्रे सोशल मीडियावर झळकल्याने हा वाद आता भाजप, मनसे विरुद्ध शिवसेना असा झाला आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात सोमवारी झालेल्या एका बैठकीला आदित्य ठाकरे यांच्यासोबत युवासेनेचे सचिव वरुण सरदेसाई उपस्थित होते. वरुण देसाई हे अदित्य ठाकरे यांचे मावसभाऊ आहेत. ते कोणत्याही सरकारी पदावर नसताना या बैठकीला उपस्थित कसे राहू शकतात ? असा प्रश्न राजकीय वर्तुळात विचारला जाऊ लागला होता. एवढेच नव्हे तर आदित्य ठाकरे हे फक्त आमदार असताना तेसुद्धा अशा प्रशासकीय बैठकांना कसे उपस्थित राहू शकतात ?, असाही प्रश्न विचारला जात आहे. यावर प्रतिक्रिया देताना भाजप प्रवक्ते माधव भंडारी यांनी सांगितले, मुख्यमंत्री कार्यालयाव्यतिरिक्त एक पर्यायी सत्ता केंद्र निर्माण केले जात असल्याचे यातून दिसून येत आहे. हे चुकीचे तर आहेच, सरकारी कामकाजाच्या गोपनियतेचा भंगही आहे. सरकारी बैठकांना अशासकीय व्यक्ती हजर राहतात  ही गोष्ट सरकारची प्रतिष्ठा कमी करणारी आहे, असेही ते म्हणाले.अमृता फडणवीसही काही बैठकांना उपस्थित असल्याची छायाचित्रे समोर आली आहेत त्यावर भंडारी म्हणाले, अमृता या कोणत्याही प्रशासकीय बैठकीला हजर नव्हत्या. हा गैरसमज पसरवण्याचा प्रयत्न आहे. ती सरकारी बैठक नव्हती तर सामाजिक कामासंदर्भात काही लोक भेटायला आले होते. त्यासंदर्भात ती बैठक होती, असेही ते म्हणाले.मुख्यमंत्र्यांच्या आमंत्रणावरूनच गेलो  : वरु


वरुण सरदेसाई यांच्या उपस्थितीबाबत प्रतिक्रिया देताना राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते नवाब मलिक म्हणाले, ही काही फार मोठी चूक आहे असे नाही. उद्धव ठाकरे प्रथमच मुख्यमंत्री झाले असून हे सरकार नवीन आहे. त्यांना प्रशासकीय अनुभव नाही. मुख्यमंत्री बैठकांना कोणते अधिकारी उपस्थित असावेत याची नियमावली आहे. त्यांना याबाबत सांगण्यात आले आहे. भविष्यात अशी घटना घडणार नाही याची काळजी त्यांना घ्यावी लागेल. याबाबत प्रतिक्रिया विचारली असता वरुण सरदेसाई म्हणाले, मंत्रालययातील बैठकीला मी मुख्यमंत्र्यांच्या निमंत्रणावरून गेलो होतो. त्या बैठकीत संवेदनशील विषयावर चर्चा झाली नाही. त्यामुळे मी त्या बैठकीला उपस्थित राहिलो यात काही आक्षेप घेण्यासारखे नाही.सरकारी अधिकाऱ्यांची नाराजी

याबाबत एका सरकारी अधिकाऱ्याने माहिती देताना सांगितले, वरुण सरदेसाई काही पर्यटन तज्ज्ञ नाहीत. त्यामुळे त्यांना या बैठकीला का बोलावले ते माहित नाही. खरे तर लोकप्रतिनिधी आणि सरकारचा भाग नसलेल्यांना अशा बैठकांना उपस्थित राहता येत नाही. तरीही वरुण सरदेसाई यांचे उपस्थित राहणे नियमाला धरून नाही. यावर उद्धव ठाकरे यांचे जनसंपर्क अधिकारी हर्षल प्रधान यांनी सांगितले, उत्सुकतेपोटी वरुण सरदेसाई बैठकीला उपस्थित राहिले असतील. 

मनसे नेते देशपांडे ट्रोल

मनसे नेते संदीप देशपांडे यांनीही सकाळी ट्विट करून वरुण सरदेसाई सरकारी बैठकांना कसे उपस्थित राहातात असा प्रश्न केला होता. त्यांच्या या ट्विटमुळे त्यांना अनेकांनी ट्रोल केल्याने त्यांनी पुन्हा प्रत्युत्तर देताना म्हटले की, मला ट्रोल करण्याचा प्रयत्न करू पाहाणाऱ्या शिवसेना आयटी सेलवाल्यांना एक प्रश्न विचारतो, भाजपने शेण खाल्ले म्हणून तुम्ही खाणार का? आणि हो जेव्हा तुम्ही मोदी आणि शहांचे पाय चाटत होतात  तेव्हा आम्हीच एकटे लढत होतो, असेही त्यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.

बातम्या आणखी आहेत...