आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भडका: मुंबईत पेट्रोल 88, तर डिझेल 77 रुपयांवर; काँग्रेसचा 10 सप्टेंबरला \'भारत बंद\',

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - दिल्लीमध्ये शनिवारी पेट्रोलचे भाव ८० रुपयांवर गेले आहेत. पेट्रोलच्या दरात ३९ पैशांनी वाढ होऊन ते ८०.३८ रुपये प्रतिलिटरवर पोहोचले. दिल्लीमध्ये डिझेल ४४ पैशांनी महागले. त्यामुळे डिझेल विक्रमी ७२.५१ रुपये प्रतिलिटरवर पोहोचले. दुसरीकडे मुंबईमध्ये पेट्रोलचे भाव ८८ रुपये प्रतिलिटरच्या जवळपास पोहोचले आहे. शनिवारी पेट्रोल ३८ पैशांनी महाग झाले असून याचे भाव ८७.७७ रुपये लिटर राहिले. तर डिझेल ४७ पैशांच्या दरवाढीसह ७६.९८ रुपये प्रतिलिटरवर पोहोचले आहे. दिल्लीमध्ये इंधनावरील व्हॅटचे दर कमी असल्याने इतर चार महानगरांच्या तुलनेत दिल्लीमध्ये पेट्रोल आणि डिझेलचे दर सर्वात कमी आहेत, तर मुंबई सर्वाधिक दर आहेत.

 

आॅगस्टच्या मध्यानंतर पेट्रोल ३.२४ रुपये तर डिझेल ३.७४ रुपये महाग झाले आहे. मागील वर्षी जून महिन्यापासून इंधनाच्या किमती दररोज बदलण्याचा निर्णय झाला होता. तेव्हापासून आतापर्यंत एखाद्या पंधरवड्यात झालेली ही सर्वाधिक वाढ आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या किरकोळ विक्रीच्या किमतीमध्ये सुमारे ५० टक्के भागीदारी केंद्र सरकारच्या आणि राज्य सरकारच्या करांची असते. त्यामुळे इंधनावरील कर कमी करण्याची मागणी विविध संघटनांच्या वतीने करण्यात येत आहे.

 


व्यापाऱ्यांचा बंदमध्ये सहभाग नाही : कॅट
पेट्रोल आणि डिझेलच्या किमती वाढत असून याविरोधात प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेसने सोमवारी (१० सप्टेंबर) 'भारत बंद'चे आवाहन केले आहे. या 'बंद'ला डाव्या पक्षांनी पाठिंबा दिला आहे. मात्र, छोटे व्यापारी या बंदमध्ये सहभागी होणार नाहीत. छोट्या दुकानदारांची संघटना कॅटने भारत बंदला समर्थन न देण्याचा निर्णय घेतला असल्याचे कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्स (कॅट)चे राष्ट्रीय अध्यक्ष बीसी भरतिया आणि राष्ट्रीय महामंत्री प्रवीण खंडेलवाल यांनी शनिवारी सांगितले. कॅटने २८ सप्टेंबरला वॉलमार्ट-फ्लिपकार्टच्या कराराविरोधात २८ सप्टेंबरला बंद पुकारलेला आहे.

 

जीएसटीत समावेश नसल्याने १५,००० कोटींचे नुकसान : प्रधान
पेट्रोल आणि डिझेलचा समावेश वस्तू आणि सेवा करात करण्याची वेळ आली असल्याचे मत पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी व्यक्त केले आहे. ही दोन्ही इंधने जीएसटीच्या बाहेर असल्याने देशाला सुमारे १५,००० कोटी रुपयांचे नुकसान होत असल्याचेही त्यांनी सांगितले. या दोन्ही इंधनांना जीएसटीअंतर्गत आणल्यास ग्राहकांसह सर्वांनाच फायदा होणार असल्याचे ते म्हणाले.

 

सोमवारी विरोधी पक्षांचा मुंबई बंद; मनसेचा पाठिंबा, सेनेलाही आवतण
पेट्रोल, डिझेल आणि गॅसच्या दरवाढीविरोधात काँग्रेस आणि सर्व विरोधी पक्षांतर्फे सोमवारी (दि. १०) भारत बंदचे आवाहन करण्यात आले आहे. मुंबईतही १०० टक्के बंद यशस्वी व्हावा म्हणून काँग्रेस-राष्ट्रवादीतर्फे शिवसेना आणि मनसेनेही बंदमध्ये सहभागी होण्याचे आवाहन मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम यांनी केले. दरम्यान, मनसे बंद सहभागी होणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, जनता दल (शरद यादव), सीपीआय, सीपीआय (एम), पीडब्ल्यूपी, शेतकरी कामगार पक्ष, रिपाइं (जोगेंद्र कवाडे गट), राजू शेट्टी यांचा स्वाभिमानी शेतकरी पक्ष अशा सर्व भाजपविरोधी पक्षांनी सोमवारी रोजी भारत बंद पुकारला आहे. तसेच सर्व संलग्न कामगार संघटनांनीही भारत बंदला समर्थन जाहीर केले आहे. बँक युनियनचा पाठिंबा असल्याने बँका, इन्शुरन्स कंपनी, पेट्रोल पंप असोसिएशन, आहार संघटना आणि मुंबईतील २७ मोठ्या मार्केटचा बंदला पाठिंबा असल्याने १०० टक्के भारत बंद यशस्वी होईल, असे निरुपम यांनी सांगितले. या वेळी राष्ट्रवादीचे नवाब मलिक उपस्थित होते.

 

 

 

बातम्या आणखी आहेत...