आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राज्यावर दोन चक्रीवादळांच्या स्वारीची शक्यता, ५ व ६ डिसेंबरला मध्यम पावसाचा अंदाज

2 वर्षांपूर्वीलेखक: प्रतिनिधी
  • कॉपी लिंक

पुणे - लांबलेला पावसाळा, ऋतुचक्राचे बदललेले वेळापत्रक, गायब झालेली थंडी.. यांचा मागोवा घेत राज्याच्या पश्चिमेकडील अरबी समुद्रात एकाच वेळी दोन चक्रीवादळांची निर्मिती होत आहे. अरबी समुद्राच्या नैऋत्य भागात कमी दाबाची अतितीव्र क्षमतेची दोन क्षेत्रे एकाच वेळी निर्माण झाली आहेत. कमी दाबाचे हे भोवऱ्यासारखे क्षेत्र अजून राज्याच्या पश्चिम किनाऱ्यापासून बरेच दूर असले, तरी आगामी १२ ते ४८ तासांत, त्यांचे रूपांतर चक्रीवादळात होण्याची दाट शक्यता भारतीय हवामान विभागाने वर्तवली आहे. असे घडून आल्यास २०१९ हे वर्ष चक्रीवादळ वर्ष म्हणूनच ओळखले जाईल.

यंदा आयएमडीच्या सांख्यिकीतून उपलब्ध माहितीनुसार, २०१९ या वर्षात नोव्हेंबर अखेरीपर्यंत तब्बल नऊ चक्रीवादळांची निर्मिती झाली. त्या संख्येत दोनची भर पडण्याची शक्यता आता दिसत आहे. पवन आणि आंफन असे या चक्रीवादळाचे नामकरण करण्यात आले आहे. आयएमडीने दिलेल्या माहितीनुसार, कमी दाबाचे एक क्षेत्र मध्यपूर्व अरबी समुद्रावर मुंबईपासून ६४० किमी अंतरावर आणि पणजीपासून ४४० किमी अंतरावर आहे. दक्षिण-पश्चिम अरबी समुद्रावर घोंगावणारे चक्रीवादळ येमेनच्या आसपास आहे. एकाच वेळी दोन्ही चक्रीवादळांची स्वारी समुद्रावर सुरू असल्याने राज्याच्या अनेक भागांत थंडी पडण्याऐवजी पुन्हा एकदा पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. दोन्ही चक्रीवादळे राज्याच्या पश्चिम किनाऱ्यापासून बरीच अंतरावर असल्याने राज्यात ५ व ६ डिसेंबरला मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज आहे. तसेच काही भागात हवामान ढगाळ राहील. या काळात वाऱ्यांचा वेग ताशी ५० ते ७० किमी इतका राहील.