आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मराठवाड्यातील आमदारांना मुंबई, काेकणातील प्रश्नांचेच ‘गांभीर्य’; अधिवेशनात स्थानिक समस्या मांडण्याकडे मात्र दुर्लक्षच

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - नुकत्याच झालेल्या विधिमंडळ पावसाळी अधिवेशनात काही अपवाद वगळता मराठवाड्यातील बहुतांश आमदार ‘माैनी बाबा’ असल्याचेच दिसून आल्यामुळे या भागातील जनतेचा अपेक्षाभंग झाला. काही बाेटावर माेजण्या इतक्याच आमदारांनी खराेखरच पाेटतिडकीने प्रश्न मांडले, तर इतर काही जणांनी मात्र मराठवाड्यापेक्षा मुंबई, काेकण व पश्चिम महाराष्ट्राच्या प्रश्नांविषयीच गांभीर्य दाखवल्याचे दिसून आले.


वसमतचे आमदार जयप्रकाश मुंदडा यांनी रायगड जिल्ह्यातील दूषित पाणी आणि मुंबईतील मराठा मंडळ संस्थेला दिलेल्या भूखंडाचा, परभणीचे राहुल पाटील यांनी अहमदनगर जिल्ह्यातील विवाहितेला जाळल्याचा, लातूरचे अमित देशमुख यांनी मुंबई लोकलमध्ये सोनसाखळी चोरी आणि मुंबईतील दूषित बर्फाचा, तर आष्टीचे भीमराव धोंडे यांनी ठाणे जिल्ह्यातील बनावट विमा पॉलिसीचा आणि राज्य कामगार विमा योजनेचा मुद्दा सभागृहात उपस्थित केला. त्यामुळे आपल्या भागातील प्रश्न संपलेत की काय? असा प्रश्न मराठवाड्यातील जनतेला पडल्याशिवाय राहत नाही.


औरंगाबादचा आवाज कमीच
औरंगाबाद जिल्ह्यात ९ विधानसभा मतदारसंघ आहेत. औरंगाबाद पूर्वचे आमदार अतुल सावे, पश्चिम संजय शिरसाट, औरंगाबाद मध्य आमदार इम्तियाज जलील, फुलंब्री हरिभाऊ बागडे, वैजापूर भाऊसाहेब चिकटगावकर, गंगापूरचे प्रशांत बंब, पैठण संदीपान भुमरे, सिल्लोड अब्दुल सत्तार, तर कन्नडचे आमदार हर्षवर्धन जाधव आहेत. बागडे विधानसभा अध्यक्ष असल्याने प्रश्न विचारत नाहीत. अतुल सावे राज्यमंत्री झाले आहेत. सत्तार, जाधव आणि जलील यांनी राजीनामे दिले आहेत.  यामुळे ९ पैकी केवळ ४ आमदारांनाच सभागृहात अस्तित्व दाखवण्याची संधी होती. प्रशांत बंब दररोज उपस्थित होते, पण ते काही बोलले नाहीत. अन्य ३ आमदार फारच कमी वेळा विधानसभेत दिसत हाेते.

 

काहीच होणार नसल्याने आम्ही गप्प
औरंगाबाद जिल्ह्यातील एका सत्ताधारी आमदाराने शांत बसण्याचे गुपित सांगितले. ‘फडणवीस सरकारचे हे अखेरचे अधिवेशन आहे. यात अर्थसंकल्पावर चर्चा अपेक्षित होती. कामे मार्गी लागता लागता विधानसभेची आचारसंहिता लागेल. शिवाय सभागृहातील उपस्थितीपेक्षा मतदारसंघातील कामे पाहून तिकीट मिळणार असल्याने यंदा गप्पच बसलो,’ अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.

बातम्या आणखी आहेत...