आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ऑनलाइन पगार रखडल्याने जिल्हा परिषदेवर मोर्चा काढून केली निदर्शने

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


नगर : ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचे तीन महिन्यांपासून, तर नऊ महिन्यांपर्यंतचे ऑनलाइन पगार रखडल्याने ग्रामपंचायत कर्मचारी संघटनेच्या वतीने जिल्हा परिषदेवर मोर्चा काढून आक्रोश आंदोलन केले. हलगीच्या निनादात ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांनी जिल्हा परिषदेसमोर निदर्शने केली. 


पूर्वसूचना देऊन आंदोलन करण्यात आले असताना जिल्हा परिषदेत ग्रामपंचायत विभागाचे सक्षम अधिकारी उपस्थित नसल्याने आंदोलक संतापले. दुपारी तीनपर्यंत आंदोलन चालू होते. अखेर ग्रामपंचायत विभागाचे दळवी यांनी ऑनलाइन थकीत पगार ७ तारखेपर्यंत देण्याचे लेखी आश्वासन दिल्याने आंदोलन मागे घेण्यात आले. बुरुडगाव रोड येथील भाजप कार्यालयापासून या मोर्चाची सुरुवात झाली. या मोर्चात राज्य सह सचिव अॅड. कॉ. सुधीर टोकेकर, जिल्हा संघटक मारुती सावंत, कार्याध्यक्ष संदीप आल्हाट, सुनील शिंदे, योगा कानडे, राजेंद्र कोरडे, भाऊसाहेब गिरवले, संजय शेलार, दादासाहेब साळवे, राहुल पोळ, एकनाथ वखरे, महादेव ढगे, देविदास साळवे, अशोक गुंजाळ, शांताराम पारधे आदी सहभागी झाले होते. 


गेल्या वर्षापासून ग्रामपंचायत आकृतिबंधातील कर्मचाऱ्यांसाठी ऑनलाइन पगार सुरू झाल्याने सर्व आनंदात होते. मात्र, ऑनलाइन पगार होताना अनेक त्रुटी निर्माण होऊन त्यामध्ये दुरुस्त्या झाल्या. शासनाने ठरवून दिलेल्या निर्देशानुसार हे काम व्हावे, असे ग्रामविकास मंत्रालयाचे आदेश आहेत. मात्र, जवळपास तीन ते नऊ महिने होऊन देखील ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचे पगार त्यांच्या बँकेत जमा झालेले नाहीत. ग्रामसेवक, बीडीओ व जिल्हा परिषद यांनी समन्वय साधून दर महिन्याला २५ ते ३१ तारखेपर्यंत कर्मचाऱ्यांची माहिती डाटामध्ये भरून पगारविषयक सर्व पूर्तता करणे गरजेचे आहे. परंतु ही जबाबदारी कोणत्याही तालुक्यातून होताना दिसत नसल्याने, कर्मचाऱ्यांचे पगार वेळेवर होत नसल्याचा आरोप संघटनेच्या वतीने करण्यात आला आहे. ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचे १ ते १० तारखेपर्यंत दर महिन्याचा पगार जमा होणे आवश्यक आहे. ऑनलाइन पगाराबाबत पूर्तता होत नसल्याने कर्मचाऱ्यांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे, जर सर्व कर्मचाऱ्यांचे ऑनलाइन कामकाज पूर्ण झालेले नसेल, तर निदान ज्या कर्मचाऱ्यांची पगारविषयक पूर्ण माहिती भरली गेली त्यांचे पगार रोखून न ठेवता अदा करावे, थकीत पगार तातडीने अदा करून, वेळेवर ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचे ऑनलाइन पगार मिळण्याची मागणी संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे. 


वेळेवर पगार मिळण्याची मागणी 
ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचे तीन महिन्यांपासून तर नऊ महिन्यांपर्यंतचे ऑनलाइन पगार रखडल्याने ग्रामपंचायत कर्मचारी संघटनेच्या वतीने जिल्हा परिषदेवर मोर्चा काढून आक्रोश आंदोलन करण्यात आले. 


कर्मचाऱ्यांवर उपासमारीची वेळ 
ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचे पगार त्यांच्या बँकेत जमा झालेले नाहीत. ज्यांचे जमा झाले त्यांचे पगार कमी जास्त अदा करण्यात आले आहेत. कर्मचाऱ्यांचे पूर्ण पगार होऊ शकलेले नाही. त्यामुळे कर्मचाऱ्यांवर उमासमारीची वेळ आली असल्याचे निवेदनात म्हटले आहे. 
 
 

बातम्या आणखी आहेत...