आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जबाबदारी, दृढता, विनय, महिलांविषयी आदर अन् देशभक्ती ही स्वामी विवेकानंद यांची पंचकिरणे

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद -  स्वामी विवेकानंद यांनी 'जबाबदारीची भावना', 'मानसिक दृढता', 'पराक्रम, विनय आणि विनम्रतेसह आचरण', 'ईश्वरभक्ती आणि देशभक्ती यांचा समन्वय साधणे' आणि 'महिलांविषयी आदर बाळगणे' या पंचकिरणांद्वारे जीवन कसे जगावे याची शिकवण युवकांना दिली. त्यांच्या या पंचकिरणांचा आदर्श घेऊन आजच्या युवकांनी स्वत:सोबतच देशाचीही प्रगती साधावी, असे आवाहन केरळच्या हरिपद येथील रामकृष्ण मठाचे अध्यक्ष स्वामी वीरभद्रानंद यांनी शुक्रवारी केले. 

 

निमित्त होते औरंगाबाद येथील विवेकानंद मार्गावरील (बीड बायपास) रामकृष्ण मिशन आश्रमात श्रीरामकृष्ण यांच्या सार्वजनीन (युनिव्हर्सल) मंदिराच्या लोकार्पण दिनानिमित्त आयोजित तीनदिवसीय सोहळ्याचे. पहिला दिवस 'स्वामी विवेकानंद दिन' म्हणून साजरा करण्यात आला. त्यात स्वामी वीरभद्रानंद यांनी 'विवेकानंद यांच्याकडून भारतीय युवकांनी घ्यावयाची शिकवण' या विषयावर सविस्तर मार्गदर्शन केले.

 
सकाळी ८.३० वाजता बेलूर मठाचे ज्येष्ठ उपाध्यक्ष स्वामी गौतमानंद यांच्या हस्ते विवेकानंद हॉलचे, तर आणखी एक ज्येष्ठ उपाध्यक्ष स्वामी शिवमयानंद यांच्या हस्ते नवीन साधू निवासाचे उद््घाटन झाले. पहिल्या सत्राची सुरुवात सकाळी ९ वाजता वैदिक मंत्रपठणाने झाली. त्यानंतर स्वामी गौतमानंद आणि स्वामी शिवमयानंद तसेच औरंगाबाद येथील आश्रमाचे प्रमुख स्वामी विष्णुपादानंद यांच्या हस्ते दीपप्रज्वलन झाले. पीएसबीए स्कूलच्या विद्यार्थ्यांनी 'जयतु विवेकानंद योगीवर राजा' हे उदघाटकीय समूहगीत सादर केले. तीन विद्यार्थ्यांनी स्वामी विवेकानंद यांचे संदेश कथन केले.

 

स्वागतपर भाषणात स्वामी विष्णुपादानंद म्हणाले की, ' स्वामी विवेकानंद हे युवकांचे, विद्यार्थ्यांचे आदर्श आहेत. त्यांचे प्रेरक विचार समूहगीत आणि लघुनाटिकांद्वारे तसेच व्याख्यानांद्वारे सर्वांपर्यंत पोहोचवणे हा या दिनाचा मुख्य उद्देश आहे.' पहिल्या सत्रात भारत विकास ग्रुप इंडिया लिमिटेडचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक हनुमंत गायकवाड यांनी 'स्वामी विवेकानंद यांच्यापासून मी प्रेरणा कशी घेतली' या विषयावर विवेचन केले.

 

मध्य प्रदेशमधील ग्वाल्हेर येथील मठाचे सचिव स्वामी राघवेंद्रानंद यांचे 'विवेकानंद यांचे प्रेरणादायी भारत भ्रमण' या विषयावर व्याख्यान झाले. सरस्वती भुवन कला आणि वाणिज्य महाविद्यालयाच्या नाट्यशास्त्र विभागाच्या विद्यार्थ्यांनी स्वामी विवेकानंद यांच्या शिकवणुकीवर आधारित 'शिक्षणाचे सार : एकाग्रता' आणि 'स्वत:ला ओळखा' या दोन लघुनाटिका सादर केल्या. दुसऱ्या सत्रात कठोपनिषदातील 'नचिकेता' या विषयावर लघुनाटिका सादर झाली. अरुणीपुत्र नचिकेता याने साक्षात यमराजाकडूनच माणसाच्या जन्म-मरणाचे रहस्य जाणून घेतले होते. त्यावर ही लघुनाटिका आधारित होती. विवेकानंद महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी 'मान्यवर व्यक्तिमत्त्वांच्या दृष्टिकोनातून स्वामी विवेकानंद' या विषयावर सादरीकरण केले.

 

रवींद्रनाथ टागोर, महर्षी अरविंद, महात्मा गांधी, नेताजी सुभाषचंद्र बोस, लोकमान्य टिळक, पं. जवाहरलाल नेहरू, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, डॉ. राजगोपालाचारी आणि भगिनी निवेदिता या महनीय व्यक्तींची वेशभूषा विद्यार्थ्यांनी केली होती. दुपारी ३ ते ५.३० या वेळेत सार्वजनिक सभा झाली. कोलकाता येथील नरेंद्रपूर येथील आश्रमाचे सचिव स्वामी सर्वलोकानंद अध्यक्षस्थानी होते. सभेत स्वामी शांतात्मनानंद (नवी दिल्लीच्या आश्रमाचे सचिव), स्वामी सत्येशानंद (बेलूरच्या आश्रमाचे विश्वस्त आणि चंदिगडच्या आश्रमाचे सचिव), स्वामी आत्मप्रियानंद (बेलूर मठ येथील रामकृष्ण मिशन विवेकानंद शैक्षणिक आणि संशोधन संस्थेचे उपकुलगुरू), स्वामी सुप्रियानंद (मलेशिया येथील आश्रमाचे अध्यक्ष), स्वामी आत्मश्रद्धानंद (कानपूरच्या आश्रमाचे सचिव) यांची विविध विषयांवर भाषणे झाली.

 

तिसऱ्या सत्रात ५.४५ ते ६.३० वेळेत सध्याच्या देवघरात संध्याआरती झाली. ६.३० ते ९ यादरम्यान सांस्कृतिक कार्यक्रम झाला. त्यात 'श्रीरामकृष्ण आणि स्वामी विवेकानंद यांच्यातील गुरू-शिष्याचे आदर्श संबंध' या विषयावर संगीत नाटक सादर झाले. 


भगवान श्रीरामकृष्ण देव यांच्या सार्वजनीन मंदिराचा आज लोकार्पण सोहळा 
धार्मिक कार्यक्रम पहिल्या दिवशी शुक्रवारी सकाळी ८ ते सायंकाळी ५ या वेळेत क्रमेण देवता स्थापना, शांतिपाठ, विष्णू याग आणि आरती असे विविध धार्मिक कार्यक्रम झाले. 
शनिवारी सकाळी ७.३० वाजता बेलूर येथील रामकृष्ण मठाचे ज्येष्ठ उपाध्यक्ष स्वामी वागीशानंद यांच्या हस्ते भगवान श्रीरामकृष्ण देव यांच्या सार्वजनीन मंदिराचा लोकार्पण सोहळा होईल. उद््घाटनाचे कार्यक्रम पहाटे ५ ते सकाळी ९.३० या वेळेत होतील. त्यात मंगलारती, प्रार्थना, ध्यान, विद्यमान देवघरात पूजा, नवीन मंदिराची परिक्रमा, नवीन मंदिरासमोर रामकृष्ण मिशन आश्रमाच्या संन्याशांचे समूह छायाचित्र, अर्पण, कलशपूजन आणि अभिषेक, प्रतिष्ठा पूजा, होम, भजन, संकीर्तन हे कार्यक्रम होतील.

 

सकाळी १० ते दुपारी १२.४५ या वेळेत उद््घाटकीय सार्वजनिक सभा होईल. त्यात विविध मान्यवरांची व्याख्याने होतील. दुपारी १२.४५ ते २ या वेळेत भोजन प्रसाद आयोजित करण्यात आला आहे. दुपारी २.३० ते रात्री ९ या वेळेत सार्वजनिक सभा होईल. त्यात व्याख्याने आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचा समावेश असेल. शहरात होणाऱ्या या ऐतिहासिक सोहळ्याला औरंगाबादवासीयांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन स्वामी विष्णुपादानंद यांनी केले आहे. 

बातम्या आणखी आहेत...