आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ओडिशात मोदी-पटनायक यांच्यात खरी लढत, राहुल गांधी लांबच

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

भुवनेश्वर - ओडिशाच्या हाय व्होल्टेज रणसंग्रामात केंद्र विरुद्ध राज्य आणि मोदी विरुद्ध पटनायक या लढतीचाच मुख्य मुद्दा आहे. हे दोन्हीही नेते आपापल्या पक्षाच्या बॅनरवर झळकत आहेत. तुलनेत काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांचे पाेस्टर भुवनेश्वर व कटकमध्ये कमी प्रमाणात आहेत. खेडोपाडीही लोक मोदी व पटनायक यांच्याच लढतीची चर्चा करत आहेत. त्यात राहुल यांचा उल्लेखही नाही.  


१९ वर्षांपासून मुख्यमंत्री असलेले बिजू जनता दलाचे अध्यक्ष नवीन पटनायक २०१४ मधील मोदी लाटेला ओडिशात रोखण्यात यशस्वी ठरले होते. बिजदने २१ पैकी २० जागा जिंकल्या होत्या. भाजपला एक जागा मिळाली, तर काँग्रेसची पाटी काेरीच होती. हाच कित्ता पटनायक यंदा पुन्हा गिरवू पाहत आहेत. मात्र यंदाही ओडिशात कमळ फुलवण्यासाठी भाजप जोरदार प्रयत्न करत आहे.  

 

दोन्ही पक्षांत आधीपासूनच आरोप-प्रत्यारोपांचा फैरी सुरू होत्या. त्या आता आणखी तीव्र झाल्या आहेत. बिजद मोदींवर हेतुपुरस्सरपणे आेडिशाकडे दुर्लक्ष व विशेष राज्याच्या मागणीकडे डोळेझाक करण्याचा आरोप करत आहे. भाजपने मुख्यमंत्र्यांना खोटारडे संबोधून ते केंद्राशी सहकार्य करत नसल्याचा आरोप केला आहे. पटनायक यांनी राज्याला वित्तीय स्वायत्तता देण्याचीही मागणी केलेली आहे. बिजद सचिव बिजय नायक यांचे म्हणणे आहे की, केंद्र आमची मदत करू शकत नसेल तर त्यांनी आम्हाला आर्थिक स्वायत्तता दिली पाहिजे. आम्ही आमच्या निधीने कामे करू.  

 

विविध मुद्द्यांवर राज्य आणि केंद्रात मतभेद आहेत. पंतप्रधानांनी केंद्राच्या आयुष्यमान योजनेऐवजी बिजू आरोग्य कल्याण योजना लागू केल्याप्रकरणी पटनायक सरकारवर टीका केली होती. बिजद नेत्यांचे म्हणणे आहे की, आमची योजना केंद्राच्या तुलनेत कित्येक पटींनी चांगली असून तिचा विस्तारही मोठा आहे. भाजप नेते आणि पदमपूरचे आमदार प्रदीप पुरोहित म्हणाले, ओडिशा सरकार केंद्राच्या योजनांकडे दुर्लक्ष करत आहे. यामुळे राज्यातील लोकांचे नुकसान होईल.  


नवीन पटनायक यांनी शेतकऱ्यांसाठी कृषक असिस्टन्स फॉर लाइव्हलीहूड अँड ऑर्ग्युमेंटेशन योजना (केएएलआयए) सुरू केली आहे. यात कंत्राटी शेती करणारे आणि भूमिहीन शेतमजुरांचाही समावेश आहे. मात्र ते केंद्राची पीएम किसान योजना लागू करण्यास टाळाटाळ करत असून अनेकदा सांगितल्यानंतर त्यांनी लाभार्थी शेतकऱ्यांची यादी केंद्राला पाठवली होती. केंद्र आणि राज्यातील वाढते मतभेद हाच यंदाच्या निवडणुकीचा मुख्य मुद्दा आहे. बिजद त्याला राज्याच्या अस्मितेशी जोडत आहे. बिजय नायक म्हणाले, नवीन यांचे वडील बिजू पटनायक यांनीही ओडिया अस्मितेचा लढा दिला होता.  


राज्यात विभागवार वेगवेगळे मुद्दे आहेत. पश्चिम ओडिशाचे कालाहांडी, बोलनगीर, संभलपूर, बारगड आणि सुंदरगडे हे पाच मतदारसंघ सलगच्या दुष्काळाने प्रभावित आहेत. येथे शेतकरी आत्महत्या हा प्रमुख मुद्दा आहे. २०१३ ते २०१८ दरम्यान येथे २२७ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याची कबुली स्वत: सरकारनेच दिली आहे. सिंचनाची अत्यल्प साधने असलेल्या पश्चिम भागातच जास्त आत्महत्या झाल्या आहेत.  

 

कालाहांडीचा काही भाग वगळता येथे सिंचन योजनाच नाहीत. १३४० कोटींचा गंगाधर मेहर उपसा सिंचन प्रकल्प सुरूच झालेला नाही. महानदीवर धरण व बंधारे बांधल्याने १५ जिल्ह्यांना पाणी पुरवणाऱ्या हिराकुंड प्रकल्पाची पाणीपातळी घटली आहे. दोन राज्यांतील पाणीवाटपाचा वाद लवादापुढे प्रलंबित आहे.  


छत्तीसगडमध्ये काँग्रेस सरकार आल्याने परिस्थिती आणखी बिकट झाली आहे. काँग्रेसचे माजी आमदार लतेंदू महापात्रा म्हणाले की, आमचे सरकार प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करेल. कटकसह ९ तटीय लोकसभा मतदारसंघांत महानदीचा मुद्दा असेल. ओडिशात जात हा निवडणुकीचा मुद्दा राहिलेला नाही. यंदा माओवाद्यांचा प्रभाव असलेल्या कंधमाल व कोरापुतच्या काही भागांत काही जमाती सरकारविरोधात जाऊ शकतात. रस्त्यांचा अभाव आणि विकासाची कमतरता असल्याने लोक नाराज आहेत. तसेच ते माओवाद्यांच्या हिंसाचारामुळेही त्रस्त आहेत. या आदिवासी क्षेत्रात काँग्रेसचे पारडे जड आहे. 


राजकीय विश्लेषक प्रो. आनंद मिश्रा म्हणाले, भाजप व बिजदमध्ये प्रतिष्ठेचा मुकाबला आहे. हा दोन व्यक्ती (मोदी व पटनायक) आणि त्यांच्या विकासाच्या अजेंड्याचाही संघर्ष आहे. गेल्या निवडणुकीच्या तुलनेत यंदा बालाकोट हल्ल्यानंतर मोदींची लोकप्रियता वाढली आहे. मुद्दे व लोकप्रियतेच्या मुद्द्यावर तूर्त पटनायकच पुढे आहेत.