आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘मी आणि माझं’ यापलीकडे पाहणारे खरे प्रेरणास्रोत!

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

आज समाजामध्ये “मी आणि माझं’ याच्या पलीकडे लोक पाहायलाच तयार नाहीत. असे असेल तर मग हा समाज व देश कसा बदलणार, असा प्रश्न आहे. या पार्श्वभूमीवर “दिव्य मराठी’ने आयोजित केलेला “प्राऊड ऑफ महाराष्ट्रीयन’ हा पुरस्कार सोहळा अनेकांना प्रेरणा देणारा आहे. समाजात कोण काय आणि कसं काम करतं याची प्रेरणा यातून अनेकांना मिळेल. मी समाजाचं, माझ्या देशाचं काही देणं लागतो, ही जाणीव ठेवून लोक काम करतील. ठराविक लोकांचीच पुरस्कारासाठी निवड होते. कारण पुरस्कार मिळतो ती माणसं जन्माला आलो, खायचं, प्यायचं, चैन करायची आणि मरायचं, असा विचार करत नाही. या लोकांनी विचार केला की फक्त खाणं-पिणं आणि मरणं हे जीवन नाही. मानवाला ईश्वराने ज्ञान, बुद्धी, शक्ती दिली. मी कोण आहे, कोठून आलो, मला कोठे जायचे, माझे कर्तव्य काय आहे, हे ज्यांना कळतं तीच माणसं या रस्त्याने वाटचाल करतात. आज ज्यांना पुरस्कार मिळाले, त्यांनी आपल्या जीवनात हाच विचार केला.


आज पुरस्कार मिळालेल्या माणसांनी त्यांचे ध्येय ठरवलेले आहे. यात काही अपंगांनाही पुरस्कार मिळाला आहे. शरीराच्या एखाद्या अवयवाने जो अपंग आहे, तो खरा अपंग नाही. पण मनाने जो अपंग आहे, तोच खरा अपंग आहे. जो “मी आणि माझं” यापलीकडे विचारच करत नाही, तो खरा अपंग आहे. जी माणसं आपल्या सबंध जीवनाचे ध्येय ठरवतात त्यांना मंदिर दिसते. जर ध्येय नसेल तर दुसरा चालतो तसे आपण चालतो. दुसरा पळतो तसे आपण पळतो. इतर लोकांकडे बघून अापण चालतो. पण एकदा ध्येय निश्चित केले की “मंजिल’ दिसते. ही “मंजिल’ दिसली की तिकडे वाटचाल करायला लागतो.


या मंजिलच्या दिशेने जाताना अडचणी येतात, विरोध होतो, टीका होते, निंदा होते, पण माणूस थांबत नाही. मरण आले तरी चालेल, पण हटणार नाही, असे ध्येय ठरवून जी माणसं वाटचाल करतात, ती माणसं समाजाला दीपस्तंभारखे अाधार ठरतात. जी माणसं “मी आणि माझं’ यापलीकडे जाऊन समाजाचं, आपल्या शहराचं, देशाचे देणं चुकवतात त्यांच्याकडे लोक प्रेरणास्रोत म्हणून पाहत असतात. पण मन कधी कधी धोका देतं. कारण हे मन चंचल आहे, तेज आहे, धोकेबाज आहे. मग आम्ही हातात घेतलेलं काम ते कधी कधी बिघडवायला लागतं. 
मनावर ताबा ठेवण्यासाठी आयुष्यात कार्यकर्त्यानं पाच गोष्टींचं पथ्य पाळणं गरजेचं आहे. आचार शुद्ध, विचार शुद्ध, जीवन निष्कलंक, जीवनात त्याग पाहिजे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे अपमान पचवायला शिकावं. फक्त गोष्टी सांगणाऱ्या लोकांचा प्रभाव कधी कधी पडत नाही. कारण सांगणाऱ्याच्या शब्दाला कृतीची जोड नसते. आजवर अनेक जण लखपती, करोडपती झाले, पण रात्री झोप लागत नाही. झोपेच्या गोळ्या घ्याव्या लागतात. कारण डाग. हे डाग माणसाला बेचैन करतात. ज्यांच्या जीवनात डाग लागले, त्यांनाच माहीत असते की काय काय डाग लागलेत ते.आपल्या भारताच्या इतिहासात त्यागाची परंपरा आहे. जर आपल्याला समाजाचे व देशाचे भले करायचे असेल तर त्याग करावाच लागतो. आपल्याला शेतात दाण्याने भरलेली कणसं दिसतात, पण त्यासाठी एक दाणा आधी जमिनीत स्वत:ला गाडून घेतो, तेव्हा ते कणीस येते. पण हल्ली समाजात सगळीकडे जीवनाचा अर्थ म्हणजे “माझं ते माझं’ आणि “तुझं तेही माझं’ अशा वृत्तीने चाललेली माणसं दिसत आहेत. पंचवीस वर्षांपूर्वी मी तरुण होतो. तेव्हा विवेकानंदांकडून मला उत्तर मिळालं की, जीवनात सेवा केली पाहिजे.


सेवा ही प्रसिद्धीसाठी, प्रतिष्ठेसाठी नसावी. सेवेतून निखळ आनंद मिळतो. माझं गावाकडे घर आहे, शेतीवाडी आहे, पण ४५ वर्षं झाली मी जात नाही. मंदिरात राहतो. मला कोटी रुपयांचे पुरस्कार मिळाले, त्याचाही ट्रस्ट करून टाकला. राष्ट्रपतींनी पद्मश्री, पद्मभूषण देऊन सन्मानित केले. अमेरिका, दक्षिण कोरिया, कॅनडा, कुठकुठले पुरस्कार मिळाले, पण मी जवळ ठेवले नाहीत. माझ्याकडे फक्त झोपण्याचं बिस्तर व जेवणाचं ताट असतं. लखपती, करोडपतींना जो आनंद मिळत नसेल, तो आनंद मी अनुभवतो. माणसं आनंद 
मिळवण्यासाठी पळतात अन् एसीमध्ये झोपेच्या गोळ्या घेऊन झोपतात. म्हणून हा पुरस्कार सोहळा एक आशेचा किरण आहे. तुमच्याकडूनच लोक प्रेरणा घेतील.

 

मी ३५ वर्षे अपमान पचवतोय. मला लोक काय-काय बोलतात. उपोषण करू नका सांगतात. जर मी भ्रष्टाचाराविरुद्ध बोललो तर तेच लोक मला भ्रष्टाचारी म्हणतात. मी सगळे आरोप अाणि अपमान पचवले. आतापर्यंत ६ कॅबिनेट मंत्री घरी गेल्यानंतर लोकांना कळते की “अण्णा’ कसा आहे. त्यामुळे तुम्ही बोलू नका, तर प्रत्यक्ष 

 

कृतीतून उत्तर द्या. आमच्यापेक्षाही तुम्ही खूप मोठं काम करू शकाल, असा मला विश्वास वाटतो. म्हणून माझी विनंती आहे की, जिल्ह्यात आपण जे काही काम हातात घेतलेय ते सातत्याने करत राहा. तुमच्या भावी आयुष्याला शुभेच्छा देतो. जय हिंद.
शब्दांकन : महेश पटारे

बातम्या आणखी आहेत...