आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

समाजमनाचा वास्तव आरसा

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कथासंग्रह केवळ समाजातील प्रश्नांवर बोट ठेवत नाही, तर समाजाचा घटक म्हणून जगताना माणुसकीची विविध चांगली वाईट रूपंही शब्दबद्ध करतो. व्यक्तीच्या अभिवृत्तीवर भाष्य करणारा हा कथासंग्रह आहे. 
 
कुठल्याही कथाकाराच्या कथेचं जग हे त्याच्या कल्पनांच्या मनोऱ्यावर उभे असले तरी त्याच्या स्वअनुभवाची लकेर त्याच्या लेखनातून दिसतेच. तो स्वत:च्या अनुभवापासून अलिप्त राहून कुठलंही लेखन करूच शकत नाही. कुठेना कुठे तरी त्याला भेटलेली माणसे, अनुभवलेले प्रसंग, घटना, स्थळ, मनात बिंबलेले असतातच व  या सर्व बाबी ती पात्रं कधी प्रत्यक्ष, तर कधी अप्रत्यक्षरीत्या लेखकाच्या लेखनातून प्रतिबिंबित होत असतात. ही प्रक्रिया इतकी सहज आहे की आपल्याला लिहिताना समजतही नाही की हे पात्रं कसं साकारलं आपण. अगदी नकळत मनाच्या गाभाऱ्यात तळ ठोकून बसलेली  ही पात्रं सहज एखाद्या व्यक्तीचा चेहरा घेऊन उभी राहतात व आपलं लेखन जिवंत करतात. या कथासंग्रहाच्या मुखपृष्ठावरील ‘रूमणपेच’ या शीर्षकातच पेच हा शब्द असल्याने नेमका कुठला पेच मनातला कथालेखकाने मांडला आहे हा प्रश्न निर्माण होतो. हा कथासंग्रह वाचतो तेव्हा लेखक त्याच्या मनातले पेच मांडतोच, पण आपल्या मनात अनेक प्रश्न, पेच उभे करतो. 

ग्रामीण आदिवासी भागात वास्तव्य करणाऱ्या लेखक सु.द.घाटे यांनी त्यांच्या पहिल्याच कथासंग्रहात केवळ समाजातील प्रश्नांवर बोट न ठेवता समाजाचा घटक म्हणून जगताना माणुसकीची विविध चांगली वाईट रूपं पाहिलेली, अनुभवलेली शब्दबद्ध केली आहेत. व्यक्तीच्या अभिवृत्तीवर भाष्य करणारा हा कथासंग्रह आहे. अस्सल ग्रामीण बोलीभाषेतून लिहिलेल्या या कथा आपल्या ओघवत्या व चटकदार निवेदन व संवाद शैलीमुळे मनावर चटकन पकड घेतात. या कथासंग्रहातील कथांची शब्दकळा आपल्याला या कथा वाचताना कथेत गुंतवून ठेवतात. प्रथमपुरुषी निवेदनात्मक शैलीतून लिहिलेल्या या कथा, आत्मकथनाकडे झुकणाऱ्या, वास्तवाच्या चौकटीतून आपल्याला न दिसणाऱ्या, नेहमीच पडद्यामागे जगणाऱ्या खालच्या स्तरातील मागास जगाचं आतलं जगणं परखडपणे मांडताना दिसतात. कुठेही नाट्यात्मकता दिसून येत नाही. मागास जमातीतील लोकांचं खरं जगणं आपल्यापर्यंत पोहोचवण्याची लेखकाची तगमग दिसून येते. लेखक सु.द.घाटे यांच्याकडे कथालेखनाला आवश्यक असते ती चिंतनशील वृत्ती आहे. समाजभान आहे व उपेक्षितांना न्याय मिळावून देण्याचा प्रयत्न करतानाच अशा लोकांना साक्षरतेचे महत्त्व पटवून देऊन आपणच आपल्या न्याय्य हक्कासाठी लढले पाहिजे व या जुनाट परंपरेचे पेच सोडवले पाहिजे तरच आपला विकास होईल व जगणं सुधारेल हा आशादायी विश्वास देतात म्हणूनच या कथासंग्रहाची नोंद मराठी साहित्यात घेतली जावी, असे मला वाटते.
 
> कथासंग्रह - रूमणपेच - सु.द.घाटे
> प्रकाशक- गणगोत प्रकाशन (नांदेड)
> मूल्य- २१०

बातम्या आणखी आहेत...