आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘गुड न्यूज’ आणि ‘परवरिश’ यांच्यातील नातेसंबंध

एका वर्षापूर्वीलेखक: जयप्रकाश चौकसे
  • कॉपी लिंक

काही महिन्यांपूर्वी प्रदर्शित झालेल्या ‘गुड न्यूज’ चित्रपटात स्पर्म प्रयोगशाळेमध्ये एकसारखे आडनाव असल्यामुळे स्पर्मची अदलाबदली होते. हा चित्रपट म्हणजे ‘विकी डोनर’ चित्रपटाचा पुढचा भाग समजला जातो. आता वैद्यकीय ज्ञानावरून प्रेरणा घेऊन चित्रपट बनत आहेत. ‘गुड न्यूज’ हा धाडसी विषय आहे. बंदिस्त पटकथा आणि चटकदार संवादामुळे चित्रपट प्रेक्षकांना प्रसन्न वाटतो. कोणत्याही नातेसंबंधाचा आधार समान विचारधारा नाही तर आदर आणि प्रेम असते. आचार्य कृपलानी आणि त्यांच्या पत्नीचे राजकीय विचार परस्परविरोधी होते, पण यामुळे त्यांच्या वैवाहिक जीवनावर कोणता परिणाम झाला नाही. शौकत आझमी जुन्या राजेशाही परिवारात जन्मल्या होत्या, पण त्यांचा प्रेमविवाह डाव्या विचारांच्या कैफी आझमी यांच्याशी झाला होता. साठच्या दशकात ‘परवरिश’ चित्रपटात राज कपूर, महमूद आणि राधा कृष्ण यांनी मुख्य भूमिका केल्या होत्या. त्याचे कथासार असे होते की, एका रुग्णालयातील मॅटर्निटी वॉर्डात एकाच वेळी दोन मुलांचा जन्म होतो. एका मुलाची माता एका अस्थिर कुटुंबातील असते, तर दुसऱ्याची माता वेश्या असते. पण दोघांनाही ओळखण्यात गडबड होते आणि वादाचा निकाल असा लागतो की, दोन्ही मुलांचे पालनपोषण संपन्न कुटुंबात होईल. मोठे झाल्यानंतर त्यांची ओळख करून घेतली जाईल. वेश्येचा भाऊ म्हणतो की, मी माझ्या भाच्याच्या हितांच्या रक्षणासाठी श्रीमंत कुटुंबातच राहीन. या कथेत असेही एक वळण देण्यात आले होते की, ती वेश्या ही श्रीमंत व्यक्तीची रखेल असते. माता वेगवेगळ्या असल्या तरी पिता एकच आहे. परवरिशच्या अगोदर महमूदने काही चित्रपटांत एक किंवा दोन दृश्यांमध्ये काम केलेले होते.  ‘परवरिश’मध्ये प्रौढ झाल्यानंतर राज कपूर अभिनीत पात्र समजून चुकते की, ओळखीनंतर महमूद अभिनीत पात्राचे जीवन अतिशय संघर्षमय होणार आहे. या चित्रपटात हसरत जयपुरी यांनी लिहिलेले आणि मुकेश यांनी गायिलेले -‘आंसू भरी हैं जीवन की राहें, उन्हें कोई कह दे कि हमें भूल जाएं’ हे गीत फार लोकप्रिय झाले. रणधीर कपूरद्वारा निर्देशित चित्रपट ‘धरम-करम’मध्येही दोन मुलांचा जन्म एकाच वेळी होतो. एकाचे वडील संगीतकार असतात, तर दुसऱ्याचे वडील सराईत गुन्हेगार असतात. हा सराईत गुन्हेगार संगीतकाराच्या मुलाला पळवून त्याच्या जागी आपल्या मुलाला ठेवतो. कारण त्याला असा विश्वास असतो की, संगीतकाराच्या घरी ठेवलेला आपला मुलगा संगीतकार बनेल. तो आपल्या सहकाऱ्यांना सांगतो की, संगीतकाराच्या मुलाला गुन्हेगार बनण्यास मदत करा. पण कालांतराने गुन्हेगारीच्या विश्वात वाढलेला मुलगा संगीत क्षेत्रात चमकू लागतो आणि प्रेमनाथचा मुलगा संगीतकाराच्या घरात राहूनही गुन्हेगारी क्षेत्राकडे आकृष्ट होतो.  आता आश्चर्याची गोष्ट आहे की, राज कपूर यांनी प्रयाग राज लिखित ‘धरम-करम’ चित्रपटाची निर्मिती केली होती, पण ‘आवारा’ चित्रपटाची सर्वश्रेष्ठ ठरलेली कथा त्याच्या एकदम विपरीत होती. ख्वाजा अहमद अब्बास लिखित ‘आवारा’ चित्रपटाचा आधार हा आहे की, पालनपोषण करतानाच माणसाचे विचार तावून सुलाखून निघतात. या चित्रपटात न्यायाधीश रघुनाथ यांचा मुलगा गलिच्छ वस्तीत राहून गुंड बनतो. खरे पाहता ख्वाजा अहमद अब्बास यांची पुरोगामी पटकथा ‘ब्लू ब्लड’ ही चांगल्या व्यक्तीचा मुलगा चांगला आणि वाईटाचा वाईट बनतो या विचारधारेलाच छेद देते. अशा प्रकारे ‘धरम-करम’ हा चित्रपट राज कपूरच्या ‘आवारा’ या श्रेष्ठ चित्रपटाच्या विपरीत विचारधारेला अधोरेखित करतो. दरम्यान, गुड न्यूज ही आहे की, विज्ञानाच्या नव्या शोधावरून प्रेरणा घेऊन चित्रपट बनत आहेत आणि लोक असे चित्रपट पसंतही करत आहेत.