आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
नवी दिल्ली- वादग्रस्त रफाल विमान खरेदी करारावरून राजकीय वाद पेटलेला असताना मंगळवारी या करारासंबंधी कॅगचा अहवाल संसदेत सादर करण्यात आला. या अहवालातील माहिती अद्याप बाहेर आली नसली तरी काँग्रेसने यावर संयुक्त संसदीय समितीची मागणी करत सभात्याग केला. दरम्यान, राहुल यांनी पत्रकार परिषदेत एका ई-मेलची प्रिंट दाखवली. याआधारे त्यांनी दावा केला की, 'फ्रान्सशी रफाल करारावर स्वाक्षऱ्या होण्यापूर्वी मोदींनी अनिल अंबानी यांची दलाली केली. ते राजद्रोही आहेत.' या आरोपानंतर मोदींच्या बचावार्थ उतरलेले रविशंकर प्रसाद यांनी राहुल परदेशी कंपन्यांच्या लॉबिस्टची भूमिका वठवत असल्याचे सांगत हा मेल मिळालाच कसा, असा प्रश्न केला.
अंबानी यांना कसे कळले? :
याबाबत तत्कालीन परराष्ट्र सचिव एस. जयशंकर आणि संरक्षण मंत्री मनोहर पर्रीकर यांनाही माहिती नव्हती. मग अंबानींना ही माहिती कशी मिळाली, असा प्रश्न राहुल यांनी उपस्थित केला. पंतप्रधान मोदींनीच अंबानींना ही माहिती दिल्याचा आरोप राहुल यांनी केला.
आता गोपनीयतेच्या कायद्याचे उल्लंघन...:
राहुल म्हणाले, आतापर्यंत या करारच्या प्रक्रियेतील उणिवांचा मुद्दा महत्त्वाचा होता. आता तर थेट गोपनीयतेच्या कायद्याचे उल्लंघन झाल्याचे दिसत आहे. मोदींनी पद व गोपनीयतेच्या घेतलेली शपथच मोडली आहे. मोदींविरुद्ध खटलाच चालवला पाहिजे.
तो मेल मिळालाच कसा?
संयुक्त अरब अमिरातीतून प्रत्यार्पण करण्यात आलेल्या कॉर्पोरेट लॉबिस्टशी संबंधित ही कंपनी आहे. शिवाय राहुल यांना गोपनीय व्यवहाराचा मेल कसा हाती लागला? काँग्रेसच्या काळात भाजपचे अनेक संरक्षण कराराबाबत आक्षेप होते. परंतु कधी राजद्रोहाचा आरोप आम्ही केला नाही, असेही प्रसाद म्हणाले.
रिलायन्स डिफेन्सने आरोप फेटाळले
रिलायन्स डिफेन्सने राहुल गांधी यांचे आरोप फेटाळले असून ई-मेलमध्ये ज्या सामंजस्य कराराचा उल्लेख आहे तो एअरबस हेलिकॉप्टरसंबंधी कराराशी संबंधित असल्याचे कंपनीने म्हटले आहे. याचा रफालशी काहीही संबंध नसल्याचा दावा रिलायन्सने केला.
मेल संशयास्पद : भाजप
राहुल यांनी केलेले आरोप भाजपने फेटाळले. राहुल परदेशी कंपन्यांचे लॉबिस्ट म्हणून भूमिका बजावत आहेत, असे सांगून हा मेलच संशयास्पद असल्याचे केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद म्हणाले.
अगोदर विरोधात ट्विट, नंतर अंबानींची वकिली
राहुल यांनी आरोप करताच काँग्रेसचे कपिल सिब्बल यांनी अंबानींविरुद्ध ट्विट केले. मात्र, ४० मिनिटांनंतर ते थेट अंबानींविरुद्धच्याच एका खटल्यात त्यांची बाजू मांडण्यासाठी कोर्टात पोहोचले.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.