आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'इन्फोसिस'चे सीएफओ रंगनाथ यांचा राजीनामा, 18 वर्षांपूर्वी कंपनीत कामाला सुरुवात

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बंगळुरू - देशातील दुसरी सर्वात मोठी आयटी कंपनी इन्फोसिसचे सीएफओ एम. डी. रंगनाथ यांनी राजीनामा दिला आहे. १८ वर्षांपूर्वी त्यांनी कंपनीत कामाला सुरुवात केली होती. वास्तविक ते १६ नोव्हेंबर २०१८ पर्यंत पदावर राहतील. रंगनाथ तीन वर्षांपूर्वी इन्फोसिसचे सीएफओ बनले होते. कंपनी संचालक मंडळाचे प्रमुख नंदन नीलेकणी यांनी सांगितले की, "रंगनाथ यांनी इन्फोसिसच्या विकासात तसेच यशामध्ये महत्त्वाची भूमिका पार पाडली आहे. कंपनीमध्ये त्यांच्या दीर्घ कालखंडात मी त्यांना अनेक आघाड्यांवर नेतृत्व करताना पाहिले असून प्रत्येक वेळी त्यांना यश मिळाले आहे. त्यांनी प्रभावशील फंड वाटपाचे धोरण बनवले आणि सर्वांच्या हिताचा सन्मान मिळवला आहे.'

 

रंगनाथ यांनी २०१५ मध्ये राजीव बन्सल यांच्या राजीनाम्यानंतर सीएफओ पद सांभाळले होते. इन्फोसिसच्या नेतृत्वात रंगनाथ यांचे महत्त्वाचे योगदान आहे. त्यांनी कन्सल्टन्सी, फायनान्स, धोरण, रिस्क मॅनेजमेंट आणि एमअँडएममध्ये महत्त्वाची भूमिका निभावली आहे. कंपनीसाठी धोरण ठरवताना आणि त्यावर अंमलबजावणी करताना कंपनीच्या संचालक मंडळात तसेच त्यासाठीच्या समितीशी ते जोडलेले असत.

 

"रंगा' या नावाने प्रसिद्ध असलेले रंगनाथ म्हणाले की, "इन्फोसिसमधील माझ्या करिअरची १८ वर्षे अत्यंत चांगली राहिली. यात सीएफओ म्हणून मागील तीन वर्षांपासूनच्या कार्यकाळाचाही समावेश आहेच. हा काळ कंपनीसाठी अत्यंत अवघड काळ होता. या दरम्यान आम्ही आर्थिक मानांकनांवर कायम राहून काम केले तसेच जागतिक पातळीवर टीम आणि शेअरधारकांचे मूल्य वाढवण्यासाठी काम केले, याचा मला अभिमान वाटतो. आता नव्या क्षेत्रात स्वतंत्र जबाबदारीचा शोध घेण्याची माझी इच्छा आहे.'
इन्फोसिसचे सीईओ सलिल एस. पारेख यांच्याजवळ राहून काम करण्यासाठी रंगनाथ याच वर्षी अमेरिकेतून बंगळुरूमध्ये स्थलांतरित झाले होते. मागील वर्षी जुलैमध्ये कंपनीने त्यांना अमेरिकेत पाठवले होते.

 

व्यवस्थापनात बदल
मागील वर्षी इन्फोसिसच्या व्यवस्थापनात तसेच एन.आर.नारायणमूर्ती यांच्या नेतृत्वातील कंपनीच्या संस्थापकांमध्ये वाद समोर आला होता. मूर्ती यांनी कॉर्पोरेट गव्हर्नन्स व राजीव बन्सल यांच्या सेव्हरेन्स पॅकेजचा विरोध केला होता. २०१५ मध्ये इस्रायली आयटी कंपनी पनायाची २० कोटी डॉलरमध्ये खरेदी करण्याच्या निर्णयालाही महागडा व्यवहार असल्याचे सांगत विरोध केला होता. या विरोधानंतर विशाल सिक्का यांनी कंपनीच्या सीईओपदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर कंपनीला अडचणीतून बाहेर काढण्यासाठी कंपनीचे सहसंस्थापक नंदन नीलेकणी यांना अकार्यकारी अध्यक्ष बनवले होते, तर सलील एस. पारेख यांनी याच वर्षी जानेवारीमध्ये सीईओ पद सांभाळले आहे.

 

बातम्या आणखी आहेत...