राजकीय / भाजपला वास्तवाची जाणीव करून देणारा निकाल

विधानसभा निवडणुकीचे निकाल काहीसे अपेक्षित आहेत

दिव्य मराठी

Oct 26,2019 09:18:00 AM IST

डॉ. रा. ह. तुपकरी,
रा. स्व. संघाचे माजी पदाधिकारी


विधानसभा निवडणुकीचे निकाल काहीसे अपेक्षित आहेत. काहीसे एवढ्यासाठी की, “अब की बार २२५ पार’ असे भाजप आणि शिवसेनेचे नेते सुरूवातीपासून सांगत होते, तसे झाले नाही. भाजप एकटा १५० जागा मिळवेल, अशी चर्चा होती. तसेही घडले नाही. त्यामुळे ही निवडणूक भाजपला वास्तवाची जाणीव करून देणारी आणि महायुतीच्या सरकारला कारभाराचा गाडा नीट हाका, असा संदेश देणारी आहे. या निवडणुकीत मराठा, धनगरांसह इतर समाजाला आरक्षण देण्याच्या मुद्यावरून खुल्या प्रवर्गात रोष होता. “सेव्ह मेरिट, सेव्ह नेशन’ चळवळीतून हा कितपत प्रगट झाला, हे यथावकाश समोर येईलच. पण, त्याचा फटका निश्चितच भाजपला बसला. पक्षाचा परंपरागत मतदार दुरावला. याशिवाय, मध्यमवर्गीय मतदार मतदानासाठी बाहेर पडला नाही. जे ५ ते १० टक्के मतदान कमी झाले, त्यात भाजपच्या मतदानाचा वाटा होता. मतदार इतका अनुत्सुक कसा झाला, हे तपासून पाहिले पाहिजे. नेत्यांच्या ‘मेगा भरती’चे प्रयोगही भाजपला नडले. त्यामुळे पक्षातील सामान्य कार्यकर्ता दुखावला. परिणामी पक्षाला बंडखोरांचा सामना करावा लागला. कार्यकर्त्यांच्या नाराजीचा नेमका अंदाज आला नाही. काही प्रमाणात भाजप नेते मस्तीत राहिले. त्या मानाने नुकसान कमी झाले. “जोर का झटका धीरे से’ असे हे चित्र आहे. पक्ष आणि सरकार व्यवस्थित चालवा. नाही तर पुढील वेळी भूकंपाची तीव्रता वाढेल, असा संदेश मतदारांनी या निकालातून दिला.

भाजपला असे वाटले, की आपण खूप चांगले सरकार चालवले. पण, सामान्य माणसाला यांमुळे काहीही फरक पडला नाही. गाजावाजा खूप झाला. पण, प्रत्यक्षात कारभारात फरक पडला नाही. यांनी केलेले बदल खालपर्यंत झिरपले नाही. सरकारी यंत्रणेतील भ्रष्टाचार कुठल्याही अर्थाने कमी झाला नाही. “न खाऊंगा, न खाने दूंगा’, हे मोदींनी दिल्लीत करून दाखवले. ते राज्यात करता आले नाही. लहान व्यावसायिकांना ‘जीएसटी’ने सतावले. सामान्य माणसाला दिलासा मिळाला नाही. जनतेचे सरकारबद्दलचे मत फारसे सकारात्मक होऊ शकले नाही. अपेक्षेइतकी मराठ्यांची मतेही मिळाली नाहीत. त्यातच शरद पवारांनी सर्व खेळ पलटवला. अशा विरोधाच्या वातावरणात जे आले ते खूप निवडून आले, असे म्हणावे लागेल.

दुसरे म्हणजे, जनता आणि कार्यकर्त्यांशी भाजप नेत्यांचा संवाद राहिला नाही. त्यामुळे वस्तुस्थिती यांच्यापर्यत पोहोचत नव्हती. कारण नसताना कार्यकर्ता व मतदार दुखावला. हे वरवर बोलत राहिले. परिणामी कार्यकर्त्यांकडून नवीन कल्पना व माहिती मिळणे बंद झाले. सुरवातीची दोन वर्षे प्रशासनावर पकड नव्हती. संपूर्ण अभ्यास करून सल्ला देतील, असे दमदार लोकही यांच्याजवळ नव्हते. मोदींनी नाेकरशाहीला सरळ ठेवले, तसे यांना ठेवता आले नाही. शहरी मतदारांना सांभाळता आले नाही. पश्चिम महाराष्ट्रात जनतेला वाऱ्यावर सोडल्यासारखे झाले. या सर्वांचा परिणाम निवडणुकीतून दिसला. इतके असूनही युती पुन्हा सत्तेत आली. यापुढे सरकारचे कार्यक्रम जनताभिमुख असले पाहिजेत. जनता आणि कार्यकर्त्यांशी संवाद वाढवायला हवा, इतकेच.

X
COMMENT