आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भेसळ-बनावट वस्तू विक्री करणाऱ्याला सहा महिन्यांपासून जन्मठेपेपर्यंत शिक्षा

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - भेसळयुक्त आणि बनावट वस्तूंची विक्री करणाऱ्याला आता सहा महिन्यांपासून ते सात वर्षांपर्यंत तुरुंगवासाची शिक्षा होऊ शकते. सरकारने नवीन ग्राहक संरक्षण विधेयकामध्ये ही तरतूद केली आहे. हे विधेयक संसदेच्या चालू अधिवेशनात दोन दिवसांपूर्वीच लोकसभेत सादर करण्यात आले आहे. चालू अधिवेशनातच हे विधेयक संसदेच्या दोन्ही सभागृहांत मंजूर होण्याची शक्यता आहे. 


प्रस्तावित कायद्यातील महत्त्वपूर्ण नियम : जर भेसळयुक्त किंवा बनावट वस्तूचा वापर करताना ग्राहकाचा मृत्यू झाला तर वस्तूची निर्मिती करणाऱ्याला जन्मठेपेची शिक्षा आणि कमीत कमी १० लाख रुपयांचा दंड होईल. गंभीर नुकसान झाल्याच्या स्थितीत निर्मात्याला सात वर्षे तुरुंगवास आणि पाच लाख रुपयांचा दंड लागेल. तर ग्राहकाला भेसळयुक्त वस्तूंच्या वापरामुळे किरकोळ नुकसान झाल्यास एक वर्ष तुरुंगवास आणि तीन लाख रुपये दंड होईल. 
भेसळयुक्त आणि बनावट वस्तूमुळे ग्राहकाचे नुकसान झाले नाही तर वस्तू बनवणाऱ्याला सहा महिन्यांचा तुरुंगवास आणि एक लाख रुपयांपर्यंत दंड होऊ शकतो. निर्मात्याचा परवानाही रद्द करण्याची तरतूद यात करण्यात आली आहे.


तक्रारींसाठी केंद्रीय प्राधिकरण : अशा प्रकरणात तक्रारी करण्यासाठी ग्राहकांना नेहमीच त्रास सहन करावा लागतो. ही अडचण दूर करण्यासाठी केंद्रीय प्राधिकरणाची स्थापना करण्यात येणार आहे. या प्राधिकरणाच्या निर्णयाला केवळ सर्वोच्च न्यायालयातच आव्हान देता येईल.

 

दिशाभूल करणाऱ्या जाहिराती दिल्यास १० लाख रुपयांचा दंड
एखाद्या निर्मात्याने त्याच्या उत्पादनाची विक्री करण्यासाठी दिशाभूल करणाऱ्या जाहिराती केल्यास त्याला तुरुंगात जावे लागेल. नवीन विधेयकानुसार जर उत्पादनाची दिशाभूल करणारी जाहिरात पहिल्यांदा केली असेल तर निर्मात्याला दोन वर्षांपर्यंत तुरुंगवास आणि १० लाख रुपयांपर्यंत दंड लागेल. दिशाभूल करणाऱ्या जाहिराती पुन्हा दिल्यास निर्मात्याला पाच वर्षांपर्यंत तुरुंगवास आणि ५० लाख रुपयांपर्यंतचा दंड लागू शकतो.

बातम्या आणखी आहेत...