आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

समृद्धी महामार्ग निर्धारित वेळेपूर्वीच पूर्ण होणार, अधिग्रहणाचे ६७११ कोटी अदा

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - काम सुरू होण्यापूर्वी शंभर टक्के भूसंपादन झालेला आणि पैशांसह सर्व परवानग्या हातात असलेला नागपूर-मुंबई समृद्धी महामार्ग हा देशातला पहिला मोठा प्रकल्प ठरला आहे. शिवाय, काम करणाऱ्या ठेकेदारांना त्यांनी लवकर काम पूर्ण केल्यास प्रोत्साहन रक्कम मिळणार आहे. त्यामुळे हा महामार्ग निर्धारित वेळेच्या आधी पूर्ण होईल, असा विश्वास महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे सहव्यवस्थापकीय संचालक अनिकलकुमार गायकवाड यांनी इथे व्यक्त केला.


औरंगाबाद-जालना भागातील कामाचा आढावा घेण्यासाठी मंगळवारी औरंगाबाद येथे आलेल्या गायकवाड आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी संपादकांशी चर्चा केली आणि महामार्गाच्या कामाविषयी माहिती दिली. त्यांच्याशी झालेल्या चर्चेचा काही भाग असा.

 

१० जिल्हे आणि २६ तालुक्यांतून जाणाऱ्या ७०१ किलोमीटर्स लांबीच्या या समृद्धी महामार्गाच्या कामांची १६ भागांत विभागणी करण्यात आली आहे. त्यातील १३ भागांचे काम वेळेआधी पूर्ण केले जाण्याची शक्यता आहे. उर्वरित ३ भागांमध्ये एकूण १० किलोमीटर्स लांबीचे ६ बोगदे आहेत. काही ठिकाणी दरीत पूल बांधायचे आहेत. त्यामुळे त्या ३ टप्प्यांचे काम वेळेवर पूर्ण होईल. या महामार्गावर १२० किलोमीटर्स ताशी वेगानेच वाहन चालवण्याची परवानगी असेल. मात्र, त्याचे काम १५० किमी वेगासाठी सक्षम असेल. त्यासाठीच या महामार्गाला कुठेही दीड टक्क्यापेक्षा अधिक चढ- उतार नसेल. तीन ते चार ठिकाणे अशी आहेत जिथे चढ किंवा उतार अडीच टक्क्यांपर्यंत असेल. वळणेही दोन किलोमीटर्स अंतराची असतील. त्यामुळे वाहनांचा वेग कमी करावा लागणार नाही. या वेगासाठी आवश्यक असणारे निकष आणि रस्त्याचे डिझाइनही आपल्याकडे नव्हते. ते आयआयटी पवईकडून बनवून घेण्यात आले आहे. 

 

१ लाख ७५ हजार झाडे कापली, ८ लाख ५० हजार लावणार
दरम्यान, हा महामार्ग बनवताना रस्त्यात येणारी १ लाख ७४ हजार ८९६ झाडे कापावी लागणार आहेत. त्यातील ७० टक्के म्हणजे १ लाख ३० हजार ९३२ झाडे फाॅरेस्ट डेव्हेलपमेंट कॉर्पोरेशनच्या माध्यमातून कापण्यातही आली आहेत. अवघ्या तीन महिन्यांत ही झाडे त्यांनी कापली आहेत. या झाडांच्या बदल्यात साडेआठ लाख झाडे रस्ते विकास महामंडळाला नव्याने लावावी लागणार आहेत. ही सर्व झाडे महामार्गाच्या दुभाजक आणि आजूबाजूला लावली जाणार आहेत. आतापर्यंत रस्ते विकास महामंडळाने १०० टक्के जमीन अधिग्रहित केली असून त्यासाठी आतापर्यंत ६७११ कोटी रुपये अदा करण्यात आले आहेत. शिवाय ठेकेदारांनाही १६३५ कोटी रुपये देण्यात आले आहेत. 


धावपट्टीचा प्रस्ताव रद्द
हवाई दलाची विमाने उतरू शकतील अशी धावपट्टी या महामार्गावर करण्यात येणार होती. मात्र, हवाई दलाला त्या संदर्भात गरज आहे का, असे विचारण्यात आले. त्यांनी गरज नाही असे सांगितल्याने मोठ्या खर्चाची ही धावपट्टी बनवण्याचा निर्णय रद्द करण्यात आला आहे. 
 

नागपूर ते मुंबईदरम्यान फक्त दोनच टोलनाके, किलोमीटरमागे लागणार १.६५ रुपये शुल्क
या रस्त्यावर दोनच ठिकाणी टोल नाके असतील. एक नागपूरला आणि दुसरा मुंबईला. कारच्या प्रवासात प्रति किलोमीटर एक रुपया ६५ पैसे इतका टोलचा खर्च येणार आहे. मोठ्या वाहनांसाठी हा दर अधिक असेल, पण प्रवासाचा वेळ निम्मा कमी होणार असल्यामुळे इंधनाची जी काही बचत होईल त्या तुलनेत टोलचा खर्च बराच कमी असेल. वेगामुळे अपघात होऊ नयेत यासाठी या अॅडव्हान्स इंटेलिजंट ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टिम बसवण्यात येणार आहे. कोरियन सरकार त्यासाठी फायनान्स करणार आहे, असेही गायकवाड म्हणाले. 
 

 

रस्ते निर्मितीस लागेल ६०० कोटी लिटर पाणी
या रस्त्याच्या निर्मिती काळात विविध टप्प्यांवर मिळून एकूण ६०० कोटी लिटर पाण्याची आवश्यकता आहे. कोणत्याही जिवंत स्रोतांतून हे पाणी वापरायचे नाही, असे निर्देश ठेकेदारांना देण्यात आले आहेत. पाण्याची व्यवस्थाही त्यांनीच करायची आहे. आता अनेक ठिकाणी पाणी नसल्यामुळे त्रास होतो आहे, असे अहवाल येत आहेत. महामार्गाच्या आजूबाजूला ठेकेदाराने शेततळे खोदावे, निघालेला मुरूम किंवा खडी त्याने रस्त्याच्या कामात वापरावी आणि त्यात साठलेले पाणी काम सुरू आहे तोपर्यंत ८० टक्के ठेकेदाराने आणि २० टक्के शेतकऱ्यांनी वापरावे, असे ठरले आहे. काम पूर्ण झाल्यावर ते शेततळे १०० टक्के शेतकऱ्यांनी वापरावे, असे ठरले आहे.

बातम्या आणखी आहेत...