आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

देशात संघ दंगल घडवण्याच्या तयारीत, दंगली घडवून सत्ता मिळवणे हा संघाचा हेतू : अॅड.प्रकाश आंबेडकर 

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- मनुवादी संविधानाची तयारी करणाऱ्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाची प्रतीक्षा न करता २१ फेब्रुवारीपासून राममंदिराचे बांधकाम करण्याचे जाहीर केले आहे. याच तारखेपासून देशात भयंकर दंगली घडवण्याचे नियोजन संघाने केले असून राज्यातील परिस्थिती बिघडू नये म्हणून वंचित बहुजन आघाडीच्या वतीने २१ तारखेपासून जिल्ह्याजिल्ह्यात शांती मार्च काढण्यात येणार असल्याचे आघाडीचे प्रमुख अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी शुक्रवारी औरंगाबादेत पत्रकार परिषदेत सांगितले. आघाडीची काँग्रेसबरोबर चर्चा सुरू असली तरी संघाला संविधानाच्या चौकटीत आणण्याचा अजेंडा काँग्रेसने दिला तरच पुढे चर्चा होईल, १२ जागांचा मुद्दा नंतरचा असल्याचेही त्यांनी सांगितले. 

 

काही राज्यांतील निवडणुका विरोधात गेल्यानंतर गेली साडेचार वर्षे झोपेत असलेल्या या संघटनेला अचानक राममंदिराची आठवण झाली. ते संविधान मानत नाहीत. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाची ते प्रतीक्षा करत नाहीत. या संघटनेला संविधानाच्या चौकटीत आणले पाहिजे. 

 

काँग्रेस संघधार्जिणी 
इंदिरा गांधी पंतप्रधान असेपर्यंत तसे प्रयत्न झाले होते. त्यानंतर मात्र काँग्रेसच संघधार्जिणी झाली. त्यामुळेच राष्ट्रीय स्वंयसेवक संघाला संविधानाच्या चौकटीत आणण्याचा अजेंडा काँग्रेसने द्यावा, अशी मागणी आपण लावून धरली होती. मात्र, यावर काही होत नाही. त्यानंतर १२ जागांचा विचार होईल, असे त्यांनी स्पष्ट केले. संघावर बंदी हा पर्याय नव्हे, त्यांना संविधानाच्या कक्षेत आणणे हाच पर्याय असल्याचे त्यांनी या वेळी बोलताना सांगितले. या वेळी कार्यकर्त्यांची उपस्थिती होती. 

 

दंगलीबाबत अमेरिकेच्या गुप्तचर संस्थेचा इशारा 
२१ फेब्रुवारीनंतर देशभरात दंगली भडकतील, असा इशारा अमेरिकेच्या गुप्तचर संस्थेने दिला आहे. भारतीय गुप्तचर संस्थांचाही तसाच इशारा आहे, परंतु तो सार्वजनिक होऊ शकला नाही. दंगली घडवून सत्ता मिळवणे हा संघाचा हेतू आहे. किमान महाराष्ट्रात असे होऊ नये म्हणून बहुजन वंचित आघाडीच्या वतीने प्रत्येक जिल्ह्यात शांती मार्च काढला जाईल. त्यात उपस्थित प्रत्येक जण आपण कोणत्या समुदायाचा आहे हे हाती फलक लावून जाहीर करेन आणि आम्ही दंगल होऊ देणार नाही याची ग्वाही देईल असे या शांती मोर्चाचे स्वरूप असणार असल्याचे अॅड. आंबेडकर यांनी स्पष्ट केले. पत्रकार परिषदेस लक्ष्मण माने, प्रा. किसन चव्हाण, हरिभाऊ भदे, अमित भुईगळ आदी उपस्थित होते. 
 

बातम्या आणखी आहेत...