आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लातूर जिल्हा मध्यवर्ती बँकेत ६५ लाख रुपयांचा अपहार

एका वर्षापूर्वीलेखक: प्रतिनिधी
  • कॉपी लिंक

लातूर - लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या तळेगाव (ता. देवणी) शाखेतील तीन कर्मचाऱ्यांनी संगनमत करून ६४ लाख ८९ हजार रुपयांचा अपहार केल्याची तक्रार व्यवस्थापकांनी पाेलिसांत दिली आहे. देवणी पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, ऑक्टोबर २०१५ ते जानेवारी २०२० या कालावधीत तळेगाव शाखेतील सतीश गायकवाड, महादेव नाबदे आणि विनायक गायकवाड या तीन कर्मचाऱ्यांनी ठेवीदार आणि खातेदारांकडून आलेल्या रकमा स्वीकारल्या, परंतु त्याची नोंद बँकेच्या अभिलेख्यांवर केली नाही. या तिघांनी ६५ लाखांच्या रकमेचा अपहार करून ती रक्कम आपल्या फायद्यासाठी वापरल्याचे व्यवस्थापक राजेंद्र जगताप यांनी म्हटले आहे. दरम्यान, पोलिसांनी या तक्रारीवरून तिघांविरोधात फसवणूक करणे आणि सार्वजनिक रकमेचा अपहार करण्याच्या कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणात अद्याप कुणालाही अटक केल्याची माहिती प्राप्त झाली नाही.  तथापि, पोलिस या प्रकरणाचा तपास करत आहेत.

वरिष्ठ अधिकारी, संचालकांचा सहभाग?:  


या अपहार प्रकरणात तळेगाव शाखेतील केवळ तिघांचेच संगनमत आहे की वरिष्ठ अधिकारी आणि काही संचालक, पदाधिकारीही त्यात सामील आहेत याबाबत शंका व्यक्त केली जात आहे. दरम्यान, याबाबत बँकेच्या कार्यकारी संचालकांशी आणि अध्यक्षांशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी फोन स्वीकारला नाही. ‘अ’ वर्ग ऑडिटचे काय ?

दरम्यान, बँकेचे आतापर्यंत सातत्याने ‘अ’ वर्ग ऑडिट झाल्याचा बँकेच्या वार्षिक अहवालात दावा करण्यात आला आहे. बँकेच्या व्यवहारात कोणत्याही त्रुटी नसल्या तरच बँकेला अ वर्ग ऑडिट मिळते. गेल्या पाच वर्षांच्या काळात तळेगाव शाखेत ग्राहकांच्या रकमा स्वीकारूनही त्याच्या नोंदी होत नव्हत्या हे अंतर्गत आणि बाह्य लेखा परीक्षकांच्या लक्षात कसे आले नाही, असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आहे. 

बातम्या आणखी आहेत...