आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भारिप नेते आसिफखान यांचा शोध सुरु; दोन मित्रांसह संशयितांची कसून चौकशी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला - भारिप बहुजन महासंघाचे नेते तथा वाडेगाव येथील बांधकाम व्यावसायिक व माजी सरपंच आसिफखान मुस्तफाखान हे १६ ऑगस्ट रोजी बेपत्ता झाले. त्यांची कार म्हैसांग नजीक पुर्णा नदीच्या काठावर आढळून आल्याने घातपाताचा संशय वर्तवण्यात येत आहे. त्यानुसार, पोलिसांनी तपासाची सुत्रे हलवली आहेत. शनिवारी स्थानिक गुन्हे शाखे (एलसीबी)चे प्रमुख कैलास नागरे व त्यांची टिम दिवसभर कसून तपास करीत होते. आसिफ खान यांच्या वाहनाचा चालक व दोन मित्रांची एलसीबीत कसून चौकशी केली. त्यानंतर संध्याकाळी म्हैसांग येथील परिसर डॉगस्कॉडच्या मदतीने पिंजून काढला. रात्री उशिरापर्यंत पोलिसांची शोधमोहीम सुरु होती.

 

पूर्णा नदीच्या काठावर बेवारस अवस्थेत आसिफ खान यांची कार दिसून आल्याने व तेव्हापासूनच ते बेपत्ता झाल्याने आसिफखान यांच्या कुटुंबीयांची घालमेल सुरु झाली. त्यांनी शनिवारी पोलिस अधीक्षक एम. राकेश कलासागर व एलसीबीचे प्रमुख कैलास नागरे यांची भेट घेतली व सविस्तर वृत्तांत कथन केला. त्यापूर्वीच पोलिसांनी तपासाची दिशा निश्चित केली होती. आसिफखान यांची कार आढळून आल्याचे ठिकाण हे बोरगाव मंजू पोलिस ठाण्याच्या हद्दीत असल्याने बोरगाव मंजूचे पोलिस निरीक्षक प्रशांत मगर यांनी घटनास्थळावरून कार आणि त्यामध्ये असलेल्या वस्तू ताब्यात घेतल्या. शनिवारी सकाळपासूनच एलसीबीचे तीन पथके त्यांच्या खबऱ्यांच्या माध्यमातून तपास कामाला लागली होती. अनेक संशयितांची परेडही एलसीबीमध्ये घेण्यात आली. त्यानंतर संध्याकाळी एलसीबीच्या टिमने म्हैसांग परिसरात शोधमोहीम राबवली. पाऊस आणि पूर्णा नदीला असलेल्या पुरामुळे तपासकार्यात अडथळे निर्माण झाल्याने रात्री उशिरापर्यंत पोलिस म्हैसांग परिसरातच होते.

 

आसिफखान यांचे शेवटचे संभाषण १६ ऑगस्ट रोजी रात्री ९.३० वाजता : आसिफखान यांचे शेवटचे संभाषण त्यांचे मित्र सैय्यद परवेज यांच्याशी १६ ऑगस्ट रोजी रात्री ९.३० वाजता झाले. सैय्यद परवेज यांना ते वाशीमच्या माजी जिल्हा परिषद अध्यक्षा यांच्या बहिणीकडे मुर्तिजापूरला जात असल्याचे सांगितले होते. तेव्हापासून त्यांचा फोन बंद आहे. सैय्यद परवेज यांची पोलिसांनी चौकशी केली.

 

काय आहे आसिफखान पुत्रांची तक्रार : डॉ. सोहेलखान आसिफखान यांनी १७ ऑगस्ट रोजी बाळापूर पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीत म्हटले की, 'वडील १६ ऑगस्ट रोजी घरून गेल्यावर परत आले नाही. त्यांच्या कामावर असलेल्या धम्मा डोंगरे यांना बाबा कुठे गेले असतील, अशी विचारणा केली, त्यावर धम्मा डोंगरे यांनी वडिलांचे पातूर येथील मित्र सैय्यद परवेज यांच्याकडे चौकशी करण्यास सांगितले. त्यानुसार सैय्यद परवेज यांना विचारले असता त्यांनी म्हटले की, तुझ्या वडिलांचा फोन मला, १६ ऑगस्टचे रात्री ९.३० वाजता फोन आला होता, ते मूर्तिजापूर येथील माजी जिप अध्यक्षांच्या बहिणीकडे जात असल्याचे सांगितले होते. त्यानंतर वडिलांचा ड्रायव्हर शे. जिया शे. जाकीर यांच्याकडे विचारणा केल्यानंतर, त्याने सांगितले की, मी तुझ्या वडिलांना एम. एच. २७ बी ई-५६०० या गाडीने वाशीम बायपासवर ८ वाजेपर्यंत सोबत होतो, त्यानंतर, त्यांनी हुंडाई एसेन्ट क्रमांक एम. एच. ०१ सीए-१३३९ घेऊन कोठे गेले माहीत माहित नाही'.

 

कारच्या स्टेरिंगवर रक्ताचे डाग, डॉग पुलाजवळच फिरला : कारच्या स्टेरींगवर रक्ताचे डाग दिसून आले. तसेच मागच्या सिटवरसुद्धा रक्ताचे डाग होते. फिंगरप्रिंटच्या चमुने रक्ताचे नमुने घेतले असून न्यायिक पृथकरणासाठी ते पाठवले आहेत, अशी माहिती पाेलिस सुत्रांनी दिली. तसेच डॉगस्कॉडला पाचारण करण्यात आले होते. बेवारस स्थितीत सापडलेल्या कारभोवती व तेथील पुलाजवळच डॉग फिरला.

 

पोलिसांनी पिंजून काढला नदीकाठ : घटनास्थळापासून ते संपूर्ण नदीकाठ पोलिसांनी शनिवारी दिवसभर पिंजून काढला. दहिहांडा, कट्यार आणि पूर्णाकाठच्या गावामध्ये शोधमोहीम राबवण्यात आली. मात्र पुर्णेला पूर असल्याने पोलिसांना काहीही सुगावा लागला नाही. वाशीम जि.प. च्या माजी अध्यक्षांचा संबंध काय? : वाशीमच्या जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा यांचा आसिफखान यांना फोन आला होता. त्यांनी त्यांच्या मूर्तिजापूर येथील बहिणीची भेट घेण्यासाठी बोलावले होते, असे पोलिस तपासात समोर येत आहे. आता या राजकीय महिलेचा त्यांच्याशी संबंध काय, याचा पोलिस कसून तपास करीत आहेत.

बातम्या आणखी आहेत...