आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अशा आमदारांची लाज वाटते! दुष्काळावर चर्चा सुरू आणि मंत्री - आमदार मात्र गायब

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - गुरुवारी सायंकाळी 6.30 वाजता राज्यातील दुष्काळी परिस्थितीवर चर्चेचा प्रस्ताव विधिमंडळात मांडण्यात आला, तेव्हा सत्ताधारी बाकांवर 10 व विराेधी बाकांवर दहा ते 12 आमदारांशिवाय कुणीही उपस्थित नव्हते. एकूण 288 पैकी अवघी 20 -22 डाेकीच सभागृहात दिसत हाेती.  कृषिमंत्री अनिल बाेंडे हे विदर्भातील एकमेव मंत्री हजर हाेते. मराठवाड्यातील भाजप- शिवसेनेच्या एकाही आमदाराला या गंभीर विषयावरील चर्चेच्या वेळी उपस्थित राहणे आवश्यक वाटले नाही. सत्ताधारी असोत वा विरोधक, असे संवेदनशून्य लोकप्रतिनिधी असतील, या राज्याचे आणखी काय होणार आहे? एरवी दुष्काळाचे राजकारण करण्यात आघाडीवर असणारे हे नेते दुष्काळाविषयी किती सजग आहेत, याचा आणखी वेगळा पुरावा कशाला हवा? राज्यपालांच्या अभिभाषणावरील अभिनंदनाच्या ठरावावर मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या बहारदार उत्तराला बाके वाजवून दाद देताना थकलेले विदर्भ- मराठवाड्यातील सत्ताधारी आमदार मुख्यमंत्री सभागृहाबाहेर पडताच श्रमपरिहारासाठी रवाना झाले. विराेधी बाकांवरही काही वेगळे चित्र नव्हते.  भावी विराेधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, अजित पवार, जयंत पाटील हे पहिल्या ओळीतील दिग्गज नेते एरवी दुष्काळाच्या मुद्द्यावरून सरकारला काेंडीत पकडण्याची एकही संधी साेडत नाहीत. मात्र, दुष्काळ या गंभीर विषयावरील चर्चेला उपस्थित राहण्यास त्यांनाही वेळ मिळाला नाही. चर्चेला सुरुवात झाल्यानंतर 10 मिनिटांनी का हाेईना बाळासाहेब थाेरात यांनी मात्र हजेरी लावून काहीशी लाज राखली. मधुकर चव्हाण, बसवराज पाटील, राजेश टाेपे या विराेधी पक्षातील मराठवाड्याच्या आमदारांनी मात्र या चर्चेच्या वेळी उपस्थित राहून शेतकऱ्यांप्रती असलेली काळजी दाखवून दिली. 

 

अकाेल्याचे भाजप आमदार रणधीर सावरकर यांनी हा विषय चर्चेला आणला तेव्हाच रिकाम्या सभागृहाबाबत नाराजी व्यक्त केली. 'जर याच ठिकाणी नगरविकासाशी संबंधित काही विषयांवर चर्चा असती तर विराेधकच काय आमच्याकडील (सत्ताधारी) मंडळीही माेठ्या प्रमाणावर हजर राहिली असती. गरिबाचा खरंच कुणी वाली नसताे हे पुन्हा एकदा अधाेरेखित झाले,' अशी नाराजी त्यांनी बाेलून दाखवली. तुळजापूरचे काँग्रेसचे ज्येष्ठ आमदार मधुकर चव्हाण यांनीही दुष्काळाचे चटके साेसणाऱ्या शेतकऱ्यांविषयी तळमळ व्यक्त केली. या दाेन आमदारांनी उपस्थित केलेल्या मुद्द्यानंतर विधानसभेचे उपसभापती विजय औटी यांनी वेळेची मर्यादा लक्षात आणून देत आजचे कामकाज संपल्याचे जाहीर केले. आता उद्या शुक्रवारी ही चर्चा पुढे सुरू होईल, तेव्हा ताजेतवाने हाेऊन आलेले विराेधी पक्षातील नेते निश्चितच सरकारला धारेवर धरतील, दुष्काळाच्या मुद्द्याचे राजकारणही करतील. मात्र, आज जेव्हा चर्चेला सुुरुवात झाली तेव्हा महाराष्ट्राविषयी एरवी तळमळ असणाऱ्या लाेकप्रतिनिधींची संवेदनशून्यता विधानसभेतील रिकाम्या बाकांनी अनुभवली. 


अशा आमदारांची लाज वाटते!