अमेरिकेत शास्त्रज्ञांनी तयार केलेला स्मार्ट पायजमा सांगणार तुम्ही झोप कशी घ्यावी

वृत्तसंस्था

Apr 06,2019 10:44:00 AM IST

वॉशिंग्टन - अमेरिकी विद्यापीठ मॅसाच्युसेट्सच्या शास्त्रज्ञांनी चांगली झोप येण्यासाठी सेल्फ पॉवर्ड सेन्सरने सुसज्ज असा स्मार्ट पायजमा तयार केला आहे. युजरच्या हृदयाची स्पंदने व झोपण्याची पद्धत तो ट्रॅक करतो. त्याद्वारे आपण कशा पद्धतीने झोपावे हेही सांगतो. यात ब्ल्यूटूथद्वारे रिसीव्हरपर्यंत डेटा ट्रान्समिट होतो. संशोधकांनी सांगितले, या पायजम्याची किंमत १४ हजार रुपये इतकी आहे. येत्या २ वर्षांत तो बाजारात येईल. स्मार्ट पायजमा सामान्यांसाठी एका डॉक्टराच्या भूमिकेत असेल. झोपेचा स्तर, त्याची अवस्था हे सर्वकाही सांगेल. तसेच स्लीपिंग पोश्चर ट्रॅक करेल. याआधारे शांत झोप लागावी म्हणून झोपण्याची पद्धत कशी बदलाल याचीही माहिती तो सांगणार आहे. पायजम्याचे वजन खूप कमी असून यात सुधारणा करण्यासाठी संशोधकांचे पथक कपड्यांची वेगवेगळ्या पद्धतीने चाचणी करत आहे. अशा प्रकारच्या पायजम्याबाबत लोकांमध्ये उत्सुकता आहे. पण त्यांना दोन वर्षे प्रतिक्षा करावी लागणार आहे.

यातील दोन प्रकारचे सेन्सर शरीरात होणारे बदल सांगतील, हृदयाचे ठोकेही मोजेल

स्मार्ट पायजम्याच्या छोट्या शिलाईच्या भागात सेन्सर आहेत. ते एका नायलॉनच्या तारेने एकमेकांशी जोडलेले आहेत. याद्वारे एकत्र मिळणारा डाटा ब्ल्यूटूथ ट्रान्समिटरच्या मदतीने तारेशिवाय रिसीव्हरपर्यंत पाठवता येईल. पायजम्यात दोन प्रकारचे सेन्सर आहेत. पहिला शरीरात तयार होणाऱ्या दबावाच्या बदलाची माहिती घेईल. दुसरा ट्रायबोइलेक्ट्रिक पेच हृदयाच्या पंपिंगची माहिती घेईल. यामुळे हृदयाच्या ठोक्याची गती समजेल. यामुळे लोकांचे आजारही कमी करता येतील.

X
COMMENT