आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पोलिसांच्या चुकीमुळे गेली जवानाच्या पत्नीची नोकरी; निवडीच्या वेळी अनुकंपा तत्त्वावर निवडले, नंतर अपात्र ठरवत निवड रद्द 

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- देशसेवेसाठी सैन्यात कार्यरत असलेल्या जवानाचा दुर्दैवी मृत्यू झाला. त्याच्या विधवा पत्नीला पोलिस दलात स्वकष्टाने नोकरी मिळाली. प्रशिक्षणासाठी तिने लाखभर खर्च केले. पण प्रशिक्षण कालावधीत अवघ्या तीन महिन्यांत तिला अपात्र ठरवत नोकरीवरून काढून टाकल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. पोलिस दलाच्या चुकीचा फटका या महिलेस बसला आहे. या महिलेची कैफियत मुख्यमंत्री, गृहराज्यमंत्र्यांपर्यंत गेली, मात्र अद्यापतरी न्याय मिळालेला नाही. 

 

निवडीच्या वेळी पोलिसांनी तिला अनुकंपा तत्त्वावर निवडले आणि नंतर तिची निवड रद्द करत तिला घरी पाठवल्याचे हे प्रकरण आहे. सातारा पोलिस अधीक्षक कार्यालयाचे. शिपाई पदावर परिश्रमाने नेमणूक झालेल्या वर्षा चौगुले हिला अंतिम निवड यादीत अनुकंपा तत्त्वावर घेण्यात आले. तीन महिन्यांनंतर अचानक तिची निवड रद्द केली. उमेदवारी अर्ज भरताना प्रशासनाच्या चुकीची शिक्षा ती भोगत आहे. बारावी उत्तीर्ण वर्षाने वर्षभर प्रशिक्षणावर एक लाख रुपये खर्च केले. हाती असलेले पैसेही गेले अन् नोकरीही गमावल्याने वर्षावर आता उपासमारीची वेळ आली आहे. 

 

सांगली जिल्ह्यातील कुपवाड ता. मिरज येथील सैन्यात असलेले अशोक चौगुले यांचे सेवेत असताना २६ ऑगस्ट २०१६ रोजी अपघाती निधन झाले. त्यांच्यामागे पत्नी वर्षा व दोन अपत्ये आहेत. वर्षाला पतीच्या निधनानंतर नोकरी करण्याशिवाय पर्याय नव्हता. 

 

एप्रिल २०१८ मध्ये झालेल्या भरतीसाठी सकाळी ३ वाजता वर्षा रांगेत उभी होती. दुपारी कडक उन्हात तिने शारीरिक क्षमता चाचणी दिली. उत्तीर्ण झाल्यानंतर लेखी परीक्षेनंतर तिची २९ जुलै २०१८ रोजी प्रशिक्षणासाठी निवड करण्यात आली. तीन महिन्याच्या प्रशिक्षणानंतर पोलिस अधीक्षक पंकज देशमुख यांनी १८ ऑक्टोंबर २०१८ रोजी तिच्या सेवासमाप्तीचे आदेश दिले. अनुकंपा तत्वावरील नियुक्तीच्या अटी शर्ती पूर्ण करीत नसल्याचा ठपका ठेवण्यात आला. वर्षाकडील वर्दी काढून घेण्यात आली. शासकीय सरंजाम , हत्यारे, दारूगोळा जमा करून घेण्याचे आदेश देण्यात आले. 

 

गृहराज्यमंत्र्यांचे आश्वासन हवेतच : 
अकोला येथील शासकीय पुनर्नियुक्त माजी सैनिक संघटनेचे विभागीय उपाध्यक्ष संतोष कुटे, अरविंद कोरपे यांनी गृहराज्यमंत्री डॉ.रणजित पाटील यांना निवेदन दिले. डॉ.पाटील यांनी स्वत: लक्ष घालण्याचे आश्वासन दिले. परंतु अद्याप कारवाई झालेली नाही. 

 

परिपत्रक लागू 
युद्ध विधवा अथवा त्यांचे पाल्य, कारवाईत शहीद झालेल्या जवानांचे अवलंबितांना नोकरीत प्राधान्य द्यावे, असे परिपत्रक आहे. वर्षा चौगुले यांना हे परिपत्रक लागू होते. -दीपक पाटील, कोषाध्यक्ष शा. मा. सैनिक सं. 
  
तत्काळ नोकरीची गरज 
माजी सैनिक संवर्गातून अर्ज भरलेला असताना अनुकंपामध्ये कसे काय टाकले गेले? तीन महिने काम केल्याचे वेतनही देण्यात आले नाही. तुटपुंज्या पेन्शनमध्ये काहीच होत नाही. मुख्यमंत्र्यांचे सचिव प्रवीणसिंह परदेशी यांची भेट घेतली असता यात स्वत: मुख्यमंत्रीच मार्ग काढतील, असा सल्ला त्यांनी दिला. - वर्षा अशोक चौगुले.
 
कैफियत मांडणाऱ्यांना मिळाली पदे, तेही झाले पाठमोरे 
सैन्यातील वीरपत्नी, जवानांच्या विधवांना कायम नोकरीत घ्यावे म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन देण्यासाठी निवृत्त ब्रिगेडियरच्या पत्नी ज्योत्स्ना गर्गे १७ सप्टेंबर २०१७ रोजी औरंगाबादेत होत्या. सोबत वर्षा चौगुले, नम्रता पाटील, स्मिता पवार, सुवर्णा ढोरमारे, रेखा वाघ होत्या. महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांनी त्यांची मुख्यमंत्र्यांशी भेट घालून दिली. त्यानंतर गर्गे भाजप माजी सैनिक महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष झाल्या. मात्र, वर्षा यांच्याकडे दुर्लक्ष झाले. यावर लवकरच तोडगा निघेल, असे आश्वासन त्यांनी दिले. 
लेखी परीक्षेनंतर २९ जुलै २०१८ रोजी प्रशिक्षणासाठी निवड. ३ महिने प्रशिक्षणानंतर १८ ऑक्टोंबर २०१८ रोजी तिच्या सेवासमाप्तीचे आदेश मुख्यमंत्र्यांना औरंगाबादेत १७ सप्टेंबर २०१७ रोजी निवेदन दिले होते. 

 

बातम्या आणखी आहेत...