आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बापाचे पालन-पोषण करण्यासाठी ७ हजार ५०० रुपये प्रति महिना देण्याचे मुलगा, सुनेला एसडीएमचे आदेश

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

हिंगोली - एमबीए शिक्षण झालेले आणि प्रतिवर्ष १० लाख रुपये कमावणारे मुलगा आणि सून सांभाळत नसल्याने येथील उपविभागीय अधिकारी कार्यालयाने मुलगा आणि सुनेने अर्जदाराला प्रतिमहिना ७ हजार ५०० रुपये निर्वाह भत्ता देण्याचे आदेश दिले आहेत.


हिंगोली शहरातील ज्योतीनगर भागात राहणाऱ्या आणि सध्या अमरावती येथे नोकरी करणाऱ्या संजय यशवंत खडसे आणि त्याची पत्नी पौर्णिमा संजय खडसे यांच्या विरोधात हे आदेश देण्यात आले आहेत. संजय खडसे यांचे वडील यशवंत शिवाजी खडसे हे आज घडीला ६५ वर्षांचे आहेत. 


वृद्धापकाळ व आजारामुळे ते त्रस्त आहेत. त्यांचा मुलगा संजय खडसे हा त्यांच्या पालनपोषणाची जबाबदारी घेत नसल्यामुळे ते आडगाव येथे त्यांच्या गावी राहत आहेत. त्यामुळे  त्यांनी मुलगा संजय आणि त्याची पत्नी पौर्णिमा यांना प्रतिवादी करून  त्यांच्याविरोधात वडील व ज्येष्ठ नागरिक यांचा निर्वाह व कल्याण अधिनियम २००७ चे कलम ५ व ९ प्रमाणे येथील उपविभागीय अधिकारी कार्यालयात निर्वाह भत्ता मिळण्यासाठी अर्ज केला होता. त्यानुसार उपविभागीय अधिकारी अतुल चोरमारे यांनी प्रतिवादी संजय आणि पौर्णिमा यांना नोटिसा काढून यशवंत खडसे यांच्या अर्जाबाबत त्यांचे म्हणणे दाखल करण्याचे आदेश दिले. 


त्यानंतर उपविभागीय अधिकारी यांच्या न्यायालयात प्रकरण  चालले. सदर प्रकरणात संजय यशवंत खडसे व त्याची पत्नी पौर्णिमा हे एमबीएचे शिक्षण घेतलेले आणि मुलगा संजय हा प्रतिवर्ष १० लाख रुपये कमावणारा असल्याचे सिद्ध झाले. 

 

न्यायालयात झालेल्या साक्षी पुराव्यावरून आदेश

न्यायालयात झालेल्या साक्षी पुराव्यावरून अर्जदार यशवंत खडसे यांना प्रतिमहिना ७ हजार ५०० रुपये निर्वाह भत्ता देण्याचे आदेश देण्यात आले. त्याचबरोबर अर्जदाराचा ज्योतीनगर हिंगोली येथील प्लॉट जबरदस्तीने न घेण्याचे आदेशही संजय आणि त्याची पत्नी पौर्णिमा यांना देण्यात आले. आदेश मिळाल्यापासून ७ दिवसांच्या आत निर्वाहभत्ता न दिल्यास एक महिन्याच्या कारावासाची शिक्षा देण्याचे आदेश सुद्धा देण्यात आले. वडील आणि ज्येष्ठ नागरिक यांचा निर्वाह आणि कल्याण अधिनियमाखाली दाखल झालेले हिंगोली जिल्ह्यातील हे दुसरे प्रकरण आहे.