आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ज्वारी, सोयाबीनला कोंब फुटले; मराठवाड्यात पीक पंचनामे सुरू

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
शिरूर तालुक्यातील कोळवाडी शिवारात पावसामुळे शेतात पाणी साचल्याने कपाशीचे नुकसान झाले. छाया : सतीश मुरकुटे - Divya Marathi
शिरूर तालुक्यातील कोळवाडी शिवारात पावसामुळे शेतात पाणी साचल्याने कपाशीचे नुकसान झाले. छाया : सतीश मुरकुटे

पावसामुळे कापूस, तूर, उडीद, मूग, ज्वारी, बाजरी, मका, सोयाबीनचे नुकसान झाले असून शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेला. पावसानेे अनेक ठिकाणी शेतांना तळ्याचे स्वरूप आले आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी नुकसान झालेल्या पिकांचे तत्काळ पंचनामे करण्याचे आदेश तहसीलदारांना दिले असून पंचनाम्यांना सुरुवात झाली आहे. पंचनाम्यांचे सर्व अहवाल विभागीय आयुक्तांना पाठवण्यात येणार आहेत.

बीड जिल्ह्यात पिकांच्या नुकसानीचे प्रमाण ठरवण्यासाठी संयुक्त समिती
बीड : जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या पिकांच्या नुकसानीसंदर्भात मागील ७२ तासांत पीक विम्याचे दावे दाखल न करू शकलेल्या शेतकऱ्यांना आता जिल्हाधिकाऱ्यांच्या निर्णयामुळे लाभ मिळणार आहे. त्याचबरोबर गावपातळीवरील पीक विम्याबाबत नुकसानीचे सर्वेक्षण करण्यासाठी तालुका कृषी अधिकारी यांच्या अध्यक्षतेखालील मंडळ कृषी अधिकारी, शेतकरी प्रतिनिधी व पीक विमा कंपनीचे प्रतिनिधी यांची समिती सर्वेक्षण करून अहवाल सादर करणार आहे.


बीड जिल्ह्यातील अकरा तालुक्यांत पावसाची वार्षिक सरासरी ६६६.३० मिलिमीटर असून १ जून ते ३१ऑक्टोबर २०१९ पर्यंत सरासरीच्या तुलनेत जिल्ह्यात ६३५.३० एवढा पाऊस झाला आहे. वार्षिक पर्जन्यमानाशी टक्केवारी ९५.३४ एवढी आहे. जिल्हा प्रशासन या अहवालाच्या आधारे पीक विमा नुकसानीची माहिती विमा कंपनीस देणार असून ज्यामुळे दावे दाखल न केलेल्या शेतकऱ्यांना नुकसानीची भरपाई मिळणार आहे. राज्य शासनाकडून मिळणाऱ्या नुकसान भरपाईसाठीही पंचनामे करण्यात येणार असून त्याची माहिती राज्य शासनाला स्वतंत्ररीत्या सादर केली जाईल. यामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पंतप्रधान पीक विमा योजना आणि राज्य शासनाच्या अतिवृष्टीसाठी मिळणाऱ्या भरपाईचा लाभदेखील मिळणार आहे.

नुकसानीचा आकडा पंचनाम्यानंतर कळणार
पिकांच्या नुकसानीचे पंचनामे तातडीने करण्याचे आदेशही जिल्हाधिकारी अास्तिककुमार पांडेय यांनी जिल्ह्यातील तहसीलदारांना दिले. पंचनामे झाल्यानंतरच पावसामुळे शेती पिकांचे नेमके किती नुकसान झाले याची माहिती समोर येणार आहे.

परभणी कपाशी, सोयाबीनचे सर्वाधिक क्षेत्रफळ बाधित
जिल्ह्यातील ३ लाख २९ हजार हेक्टरवरील पिकांना फटका
परभणी : ऑक्टोबरच्या दुसऱ्या पंधरवड्यात झालेल्या मुसळधार पावसाने व अतिवृष्टीने जिल्ह्यातील लागवड झालेल्या क्षेत्रावरील ३ लाख २९ हजार ३२ हेक्टर क्षेत्रफळावरील पिकांना फटका बसला आहे. कपाशी व सोयाबीनचे मोठे नुकसान झाले आहे.


नऊ तालुक्यांतील ६ लाख १ हजार ९६४ हेक्टर पेरणी योग्य क्षेत्रफळापैकी ५ लाख ५४ हजार ७ हेक्टरवर खरिपात पेरणी झाली होती. जिल्ह्यातील ८४४ गावांपैकी ८४३ गावांना या संततधार पावसाने झोडपले आहे. त्यामुळे अंदाजे ३ लाख ३८ हजार ७६२ शेतकऱ्यांच्या पिकांना या पावसाचा फटका बसला आहे. यात कोरडवाहू क्षेत्रावरील ३ लाख १९ हजार ५५२ हेक्टर, तर बागायती क्षेत्रावरील ९ हजार १९८ हेक्टर शेतजमिनीवरील पिके या पावसाने बाधित झाली. तर, २८२ हेक्टरवरील फळपिकेही पावसाच्या या तडाख्यात गारद झाली. खरिपात सोयाबीन व कपाशीची यंदा मोठ्या प्रमाणावर लागवड झाली होती. ३ लाख २९ हजार हेक्टरवरील क्षेत्र या पावसाने बाधित झाले असल्याचे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयाने म्हटले आहे. दरम्यान, नुकसानभरपाईसाठी दि. २९ रोजी ४२ हजार ७८०, तर दि. ३० रोजी ४२ हजार ८० असे एकूण ८४ हजार ८६० अर्ज प्रशासनाकडे प्राप्त झाले आहेत.

औरंगाबाद जिल्ह्यातील ५९ टक्के क्षेत्र बाधित
जिल्ह्यात ७७३४०१ हेक्टर पेरणीलायक आहे. प्रत्यक्षात ६९१४०६ हेक्टरवर पेरणी झाली. सर्व १३५५ एकूण बाधित गावांचा समावेश असून ४६२४८२ बाधित शेतकऱ्यांची संख्या आहे. जिरायत, बागायत व फळबागांचे बाधित क्षेत्र ४०८२७६ हेक्टर, सोयाबीन ९६३३ हे., कापूस २११४०६ हेक्टर, इतर १८७२३७ हेक्टर अशा एकूण क्षेत्रापैकी ५९.०५ टक्के बाधित क्षेत्र असल्याची नोंद कृषी व महसूल विभागाने घेतली आहे.

समितीला काय करावे लागणार
समितीला तालुक्यातील प्रत्येक महसूल मंडळातील प्राप्त अर्जातील प्रातिनिधिक शेतकऱ्यांच्या शेतास भेट देऊन सविस्तर क्षेत्रीय सर्वेक्षण करून प्रत्यक्षात झालेल्या नुकसानीचा पीकनिहाय अहवाल प्रपत्रात १० नोव्हेंबर २०१९ पर्यंत जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांच्याकडे सादर करावा लागणार आहे.

जालना अहवाल विभागीय आयुक्तांकडे पाठवणार
जिल्ह्यात पावसामुळे अनेकांच्या शेतात पाणी साचले आहे. १ नोव्हेंबर रोजी बदनापूर तालुक्यातील भराडखेडा येथे पालकमंत्री बबनराव लोणीकर, आमदार नारायण कुचे, जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांनी भेट देऊन पिकांची पाहणी केली. महसूल, कृषी विभागाच्या पथकाने नुकसानीचा पंचनामा केला. अहवाल विभागीय आयुक्तांकडे पाठवला जाणार असल्याचे जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांनी सांगितले.

हिंगोली दोन लाख तेरा हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान
हिंगोली : जिल्ह्यात दोन लाख तेरा हजार हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज असून प्रशासनाने नुकसानीचे पंचनामे करण्यास सुरुवात केली आहे. त्यानंतरच नुकसानीचा अंतिम आकडा निश्चित होणार आहे. हिंगोली जिल्ह्यात खरीप हंगामात साडेतीन लाख हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली आहे. यामध्ये अडीच लाख हेक्टर क्षेत्रावर सोयाबीन, चाळीस हजार हेक्टरवर कपाशी व सुमारे पंधरा ते वीस हजार हेक्टवर प्रत्येकी तूर, उडीद, मूग, ज्वारी आदी पिकांचा समावेश आहे. जिल्ह्यात मागील आठवड्यात झालेल्या पावसामुळे पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. प्रशासनाच्या प्राथमिक अंदाजानुसार दोन लाख तेरा हजार ७२६ हेक्टर क्षेत्राचे नुकसान झाले आहे. यामध्ये सर्वात जास्त एक लाख तीस हजार हेक्टरवरील सोयाबीनचे नुकसान झाले आहे.

उस्मानाबाद ८० %पेक्षा अधिक क्षेत्रावरील पिकांचे नुकसान
उस्मानाबाद : पावसाने जिल्ह्यातील खरीप हंगामातील २ लाख १९ हजार ६७५ हेक्टरवरील सोयाबीनसह कपाशी, ज्वारी, बाजरी, मका यासह इतर पिकांचे नुकसान झाले आहे. यामुळे शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास अवेळी झालेल्या पावसाने हिरावला आहे. सध्या प्रशासनाकडून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या पिकांचे पंचनामे करण्यास सुरुवात झाली आहे. जिल्ह्यातील ८० टक्क्यांपेक्षा अधिक क्षेत्रावरील सोयाबीनसह विविध पिकांचे नुकसान झाले असून शेंगाला कोंब फुटले आहेत.

माहूर तालुक्यात आजपासून नुकसानीची संयुक्त पाहणी
नांदेड : परतीच्या पावसाने माहूर तालुक्यात शेतकऱ्यांच्या खरीप पिकांचे अतोनात नुकसान झाल्याच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांच्या आदेशानुसार दि.२ पासून तलाठी, ग्रामसेवक व कृषी सहायक आपल्या क्षेत्रातील पिकांच्या नुकसानीची संयुक्तरीत्या प्रत्यक्ष पाहणी करून अहवाल सादर करतील, अशी माहिती तहसीलदार सर्वेश मेश्राम यांनी शुक्रवारी पत्रकारांना दिली.

बातम्या आणखी आहेत...