तेलंगणातील बसची स्पेअर पार्ट विक्रीच्या उद्देशाने चोरी; बसचा सांगाडा मिळाला

दिव्य मराठी

Apr 26,2019 10:52:00 AM IST

नांदेड - हैदराबाद येथील शहर बस वाहतूक सेवेतील एक बस चोरून तिचे स्पेअर पार्ट विकणाऱ्या एका टोळक्याला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने रंगेहाथ पकडले. या टोळक्याला तेलंगणा पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आल्याची माहिती एलसीबीचे सहाय्यक पोलिस निरीक्षक विनोद दिघोरे यांनी दिली.


तेलंगणा परिवहन महामंडळाची एक बस क्र. एपी ११ झेड ६२५४ दोन दिवसांपूर्वी चोरीला गेली होती. या प्रकरणी बुधवारी तेलंगणातील अफजलगंज पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. बस चोरीनंतर तेलंगणा पोलिसांचे एक खास पथक बस शोधण्यासाठी नेमण्यात आले. या शोध पथकाला ही बस नांदेड परिसरात असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार तेलंगणा पोलिसांनी स्थानिक पोलिसांना बस चोरीची माहिती दिली. त्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलिस निरीक्षक विनोद दिघोरे, पोलिस उपनिरीक्षक गजाजन वाघमारे व त्यांच्या सहकाऱ्यांनी काकांडी परिसरात कुख्यात फारुख अठ्ठन्नी याच्या काकांडी जवळील फार्म हाऊसवर छापा मारला असता तेथे बसचा सांगाडाच मिळाला. ]

बस चाेरून नेताना चाेरटे सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद
चाेरटे बस चाेरून नेताना सीसीटीव्हीत कैद झाले हाेते. चाेरट्यांनी शहर बसला क्रेनच्या सहाय्याने अाेढून नेल्याचे सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसल्यानंतर पाेलिसांनी तपास सुरू करत नांदेड गाठले. स्थानिक गुन्हे शाखा पाेलिसांच्या मदतीने तेलंगणा पाेलिस या चाेरट्यांपर्यंत पाेहाेचले.

बसचा सांगाडाच मिळाला
तेलंगणा पोलिसांच्या पथकाने स्थानिक पोलिसांच्या मदतीले फारुखच्या फार्म हाऊसवर छापा मारला तेव्हा तेथील दृष्य पाहून पोलिस पथक अवाक झाले. चोरून आणलेल्या तेलंगणातील बसचे सर्व भाग वेगळे करून बसचा केवळ सांगाडाच शिल्लक होता. बस चोरून तिचे स्पेअर पार्ट विक्री करण्याचा चोरट्यांचा हेतू असल्याचे स्पष्ट झाले. या प्रकरणी पोलिसांनी फारुख अठ्ठन्नीसह ५ जणांना अटक केली. पाचही आरोपींना तेलंगणा पोलिसांच्या स्वाधीन केल्याची माहिती विनोद दिघोरे यांनी दिली आहे.

X