आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
पिंपळगाव पेठ : परतीच्या तसेच बेमाेसमी पावसात शेतात उभे बाजरी, साेयाबीन, कपाशी आणि ज्वारीचे पीक भिजून सडून गेले. पीक मातीमाेल झाल्यानंतर नुकसानीची पाहणी करण्यासाठी आलेले केंद्रीय पथक आपला नियाेजित पाहणी दाैरा साेडून आडरानाने फिरत आहे. शुक्रवारी तर ज्या भागात जास्त नुकसान झाले त्या भागातील शेतकऱ्यांना या पथकाने गुंगारा दिला. या पथकाची वाट पाहत एक शेतकरी सडलेल्या बाजरीच्या काडांजवळ दिवसभर बसून राहिला. पण पथक आलेच नाही. निराश हाेऊन जड पावलाने सायंकाळी घरी परतला.
सिल्लाेड तालुक्यात परतीच्या पावसामुळे शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. केंद्र सरकारचे प्रतिनिधी परिस्थितीची प्रत्यक्ष पाहणी करायला येण्याची परंपरा जुनीच आहे. शुक्रवारी या केंद्रीय पाहणी पथकाचा दौरा १२.३० वाजता गेवराई, १२.५५ मिनिटाला बाहूळगाव व त्यानंतर १.१५ वाजता पिंपळगाव पेठ येथे हाेता. मात्र हे पथक पिंपळगाव पेठ ऐवजी थेट निल्लोड येथील गट क्र.६११ मधील शेतकरी रामेश्वर पांडुरंग आहेर यांच्या औरंगाबाद जळगाव महामार्ग लगत असलेल्या मक्याच्या शेतात शिरले. तेथून ते भराडीला निघून गेले. मात्र केंद्रीय पथकाने पिंपळगाव पेठला जाणे टाळले सकाळपासून शेतकरी साहेबराव दिवटे, मुकुंदा बेलेवार, गणपत चिकटे केंद्रीय पथक आपल्या शेतीत पाहणी करणार म्हणून उन्हात, जनावरांचे चारापाणी न करता शेतात जाऊन बसले. तरी दुपारी दोन वाजेपर्यंत पथक दाखल झालेच नाही. पथकाने पिंपळगाव पेठ येथील नियोजीत दौरा रद्द करून थेट भराडी गाठल्याचे दुपारी २.१९ मिनिटांना पाहणी स्थळावर सकाळपासून ठाण मांडून बसलेले तलाठी ज्ञानेश्वर क्षीरसागर, कृषी सहायक गणेश फुसे, ग्रामसेवक इस्माईल शेख, पोलिस जमादार राजू पायघन, पोलिस पाटील साईनाथ कळम, सरपंच पती दिगंबर सांगळे, उपसरपंच नयूम मिर्झा, शेतकरी तालुकराव दिवटे, तुकाराम गुंजाळ राजू बेलेवार, साईनाथ चिकटे, यांना कळाले आणि दुपारनंतर हळूहळू सर्वांनी शेतातून काढता पाय घेतला.
सडलेल्या मक्यातून अजून किती उत्पन्न निघेल, अधिकाऱ्याचा एका शेतकऱ्याला प्रश्न
अधिकाऱ्यांवर अविश्वास
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार कृषी व महसूल विभागाने नियोजित केलेल्या काही माेजक्या स्थळांनाच केंद्रीय पथकाने भेटी दिल्या. त्यामुळे केंद्रीय पथकाचा स्थानिक प्रशासनातील अधिकाऱ्यांवर विश्वास नाही का, असा प्रश्न शेतकरी उपस्थित करत अाहेत.
रात्रीची झाेप उडाली
केंद्रीय पथक सडलेली बाजरी बघण्यासाठी येणार म्हणून शेतात त्यांची वाट पाहत बसलाे होते. मात्र दुपारचे अडीच वाजले तरी पथक आलेच नाही. आमचे आता ऐकणार तरी कोण. शेतीवर मागील वर्षी कर्ज घेतले. पेरणी केली. पण पीक अालेच नाही. आता कर्ज दुप्पट झाले. ते कसे फेडायचे घरदार चालवायचे कसे? रात्री झोप लागत नाही. सांगावे तर कोणाला? -साहेबराव गबाजी दिवटे, शेतकरी
केंद्रीय पथकाच्या प्रतीक्षेत बाजरीच्या काडाजवळ बसलेला शेतकरी.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.