Home | International | Other Country | The Sri Lanka Bomb Blast attack incident was revealed by eyewitnesses

श्रीलंकेत दहशतवादी हल्ला : ‘चर्चमध्ये रक्ताचे पाट वाहत होते, राख पसरली होती’ हल्ल्यानंतर प्रत्यक्षदर्शींनी सांगितला हृदयद्रावक प्रसंग

वृत्तसंस्था | Update - Apr 22, 2019, 11:13 AM IST

हॉटेलच्या १७ व्या मजल्यावरून खाली आलेली महिला म्हणाली, जिन्यावर रक्त पाहून काय झाले समजले नाही

 • The Sri Lanka Bomb Blast attack incident was revealed by eyewitnesses

  कोलंबो - श्रीलंकेत ईस्टरच्या दिवशी झालेल्या साखळी बाॅम्बस्फोटाने संपूर्ण जग हादरले. अनेक लोकांना स्फोटाच्या भयंकर अनुभवातून जावे लागले. स्फोटानंतर चर्चमध्ये रक्ताचे पाट वाहत होते, असेे वर्णन अनेक प्रत्यक्षदर्शींनी केले.


  हॉटेलमध्ये उतरलेल्या सरिता मर्लू यांनी फेसबुकवर एक पोस्ट टाकली. त्यात त्या म्हणाल्या, हॉटेलच्या तिसऱ्या मजल्यावरील रेस्तराँमध्ये असलेल्या टेबलवर सकाळी स्फोट झाला. तेव्हा लोक नाष्टा करण्यासाठी येथे जमले होते. आम्ही तेव्हा हॉटेलच्या १७ व्या मजल्यावर झोपलेलो होतो. स्फोटाचा आवाज झाल्यानंतर तो अगदी जवळ झाल्यासारखे वाटले. हॉटेलच्या कर्मचाऱ्यांनी काही मिनिटांतच हॉटेल खाली करण्यास सांगितले. आम्ही तत्काळ जिना उतरू लागलो. तेव्हा सर्व जिने रक्ताने माखलेले दिसले. एवढे पाहूनही आम्हाला नेमके काय घडले आहे, हेच कळायला मार्ग नव्हता, असे मर्लू यांनी सांगितले. दुकानदार एन.ए. सुमनापाला म्हणाले, स्फोट होताच आम्ही सेंट अँथोनी चर्चमध्ये मदतीसाठी धावलो. चर्चमध्ये गेलो तेव्हा तेथे तर रक्ताचे पाटच वाहत होते. राख बर्फासारखी विखुरलेली दिसून आली. काही ठिकाणी मृतदेहांचा खच पडलेला होता. नेगोंबोचे सेंट सेबास्टियनचे मुख्य पाद्री एडमंड तिलकरत्ने म्हणाले, हल्ल्यानंतर मांसाचे तुकडे चर्चच्या भिंतींवर चिकटलेले दिसून येत होते. कोलंबोच्या सिन्नग्रँड हॉटेलमध्ये साखळी स्फोट झाले. तामिळ चित्रपट अभिनेत्री राधिका सरतकुमार हल्ल्यापूर्वी या हॉटेलमध्ये होती. ट्विटरवर त्या म्हणाल्या, हल्ल्याच्या काही मिनिटे आधी मी हॉटेल सोडले. मला चेन्नईला जाण्यासाठी फ्लाइट पकडायची हाेती. नंतर स्फोट झाल्याचे समजले तेव्हा धक्काच बसला.

  जागितक माध्यमे आणि नेत्यांच्या प्रतिक्रिया

  वर्ल्ड मीडिया

  बीबीसी : गृहयुद्धानंतर हिंसाचार घडत राहिला

  श्रीलंकेत गृहयुद्धानंतरही हिंसाचार होत राहिला. ईस्टरवर चर्च व हॉटेलला लक्ष्य करण्यात आले. कोणत्याही गटाने हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली नाही.

  डॉन : हल्ले कशा स्वरूपाचे हे अद्याप स्पष्ट नाही

  श्रीलंकेतील हल्ल्याचे स्वरूप समजायला मार्ग नाही. श्रीलंकेतील पाकिस्तानच्या राजदूत कार्यालयात सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

  न्यूयॉर्क टाइम्स : ख्रिश्चन भाविक हल्लेखोरांचे लक्ष्य
  ईस्टरसाठी सामुदायिक प्रार्थनेत सहभागी भाविक हेच हल्लेखोरांचे लक्ष्य होते. परदेशी पर्यटक उतरलेल्या हॉटेलांनाही लक्ष्य केल्याचे दिसून आले आहे. परदेशातील पर्यटकांमध्ये येथील ठिकाणे प्रसिद्ध आहेत.

  वर्ल्ड लीडर

  ब्रिटन : एकजूट होत आपण निर्भय होऊ : थेरेसा मे

  हिंसाचार भयंकर आहे. त्याच्याविरोधात सर्वांनी एकजूट व्हायला हवे. त्यामुळे कोणतेही धार्मिक कार्य करताना माणूस निर्भय होऊ शकेल.

  अमेरिका : आमच्या संवेदना श्रीलंकेसोबत : ट्रम्प

  चर्च-हॉटेलवर झालेल्या भयंकर दहशतवादी हल्ल्यातील पीडितांसमवेत अमेरिकेच्या संवेदना आहेत.

  रशिया : दहशतवादविरोधी लढाईत आम्ही सोबत : पुतीन
  रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतीन म्हणाले, आम्ही आंतरराष्ट्रीय पातळीवर दहशतवादाच्या विरोधातील लढाईत श्रीलंकेसोबत आहोत. हा अत्यंत क्रूर हल्ला होता. रशिया त्याचा धिक्कार करते.

Trending