आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जगात जीवनाचा स्तर उत्तम होतोय!

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

गुरचरण दास

नव्या दशकाच्या सुरुवातीला जेव्हा अनेक लोक नाखुश दिसत होते, तेव्हा प्रतिभावंत विज्ञान लेखक मॅट रिड्ले यांनी, 'गेले दशक सर्वोत्तम दशकांपैकी एक होते,' असा दावा केला आहे. 'द स्पेक्टॅटर' या ब्रिटिश नियतकालिकात ते लिहितात की, 'इतिहासात मानव जीवनाच्या स्तरात महान सुधारणा होत आहेत अशा काळात आपण राहत आहोत. प्रथमच पराकोटीची गरिबी जगाच्या लोकसंख्येच्या १० टक्क्यांपेक्षा कमी झाली आहे. बाल मृत्युदर सर्वात खालच्या स्तरावर आहे. दुष्काळ जवळपास संपला आहे. मलेरिया, पोलिओ आणि हृदयविकार कमी होत आहेत.' रिड्ले यांनी एक चांगला मुद्दा मांडला आहे. भारतात पराकोटीची गरिबी वेगाने कमी होत आहे. पराकोटीची गरिबी म्हणजे दररोज ८८ रुपयांपेक्षा कमी उत्पन्न, ती २०१२ मध्ये २२ टक्के होती आणि आज ५.५ टक्के राहिली आहे. भारत गेल्या १७ वर्षांपासून सात टक्के दराने विकास करत आहे; त्यामुळे हे झाले आहे. चीननंतर हा जगातील सर्वात वेगवान विकास दर आहे.

सामान्य माणूस आणि सामान्य महिला यांच्या आयुष्याशी संबंधित इतर सकारात्मक संकेतकही आहेत. घरातील विषारी प्रदूषणापासून आता जास्त महिला मुक्त आहेत, कारण त्या आता स्वच्छ गॅसचा वापर करून स्वयंपाक बनवतात. आता जास्त भारतीयांकडे शौचालये आहेत आणि ते उघड्यावर शौच करत नाहीत. त्यामुळे ते प्रदूषण आणि आरोग्यासाठी असलेल्या इतर धोक्यांपासून मुक्त झाले आहेत. आता जास्त भारतीयांचे गाव पक्क्या रस्त्यांनी जोडलेले आहे, त्यांच्याकडे वीज आहे आणि एक बँक खाते आहे, त्यात त्यांना डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरची रक्कम मिळत आहे.

लोकांच्या आयुष्यात झालेले हे नाट्यमय बदल आपल्या लक्षात आलेले नाहीत, कारण आपण इतिहासाकडे व्यापक परिदृश्यात पाहत नाही. आपण रोजच्या हेडलाइनबाबतच बोलतो आणि चांगल्या बातम्या हेडलाइन होत नाहीत. हंस रोजलिंग यांच्या 'फॅक्टफुलनेस' या पुस्तकानुसार जगाबाबत आपली धारणा विकृत करणाऱ्या काही धारणा आहेत. उदाहरणार्थ आपण जगाची विकसित पश्चिम आणि विकसनशील पूर्व अशी विभागणी केली आहे. आता हे अंतर संपले आहे, कारण आता मोठ्या संख्येने गैर पाश्चिमात्य देश मध्यमवर्गात आले आहेत.

व्यापक दृष्टिकोन ठीक आहे, पण गेल्या एक दशकात ट्रम्प, पुतीन, शी जिनपिंग, एर्दोगन, मोदी आणि बोरिस जाॅन्सन यांच्यासारख्या राष्ट्रवादी नेत्यांचा उदय आणि जे आदर्श समोर ठेवून आपण वाढलो आहोत त्यांच्या वेगवान घसरणीबद्दल काय बोलावे? अनेक पिढ्यांनी तयार केलेल्या आणि विकसित केलेल्या संस्था धोक्यात असताना कोणाला चांगले कसे काय वाटू शकते? कट्टर उजव्या विचारसरणीच्या वाढीमुळे जग अनपेक्षित आणि धोकादायक बनवले आहेे. भारतीय अर्थव्यवस्था नाट्यमयपणे मंद झाली आहे, आपली हवा आणि पाणी खराब होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींचा वादग्रस्त सामाजिक अजेंडा देशाच्या धर्मनिरपेक्ष आणि लोकशाही पायाला धोका निर्माण करत आहे. देशभरातील विद्यार्थी नागरिकत्व दुरुस्ती कायद्याच्या विरोधात आंदोलन करत आहेत. पाच महिन्यांनंतरही काश्मीरमध्ये लॉकडाउन सुरू आहे. एखादी व्यक्ती कायमस्वरूपी विषादात राहावी यासाठी हे पुरेसे नाही का?

त्याला उत्तर असे आहे की, अशी स्थिती असूनही काही चांगल्या गोष्टी घडलेल्या आहेत, त्यामुळे जग हे राहण्यासाठी उत्कृष्ट जागा झाली आहे. वैज्ञानिक यशाच्या रूपात या गोष्टी सुरू झाल्या आणि बाजारातील शक्तींद्वारे लवकरच त्यांचा जगभर प्रसार झाला. उदाहरणासाठी सेलफोनच घ्या, त्याने जगातील गरिबांना अनेक अर्थांनी सशक्त बनवले आहे. सेलफोन म्हणजे एक टेलिव्हिजन, घड्याळ, कॅमेरा, टॉर्च, रेकॉर्ड प्लेअर, वृत्तपत्र, कॅलेंडर, पत्रलेखक, बुद्धिबळ आणि पोस्टमन अशा विविध भूमिका पार पाडतो. भारतात त्याने वैश्विक बँकिंगही हातात आणले आहे. सरकारचे त्याच्याशी काहीही देणे-घेणे नव्हते. ब्रिटनच्या सायन्स जर्नलमध्ये अलीकडेच अशा एका कृत्रिम बुद्धिमत्ता यंत्रणेविषयी अहवाल प्रकाशित झाला आहे, तो ब्रेस्ट कॅन्सरची माहिती देण्यात रेडिओलॉजिस्टलाही मागे टाकेल. जो सुरुवातीच्या काळात समजू शकत नाही अशा कॅन्सरची माहितीही ही यंत्रणा देईल किंवा एखाद्याला कॅन्सर नसला तरीही त्याला पॉझिटिव्ह सांगितले जाते, अशी चूकही ही यंत्रणा कमी करेल.

व्यापार आणि नवोन्मेष याच्या रंजक इतिहासावर रिड्ले यांचे 'द रॅशनल ऑप्टिमिस्ट' वाचल्यानंतर मी त्यांच्याकडे गांभीर्याने पाहू लागलो. एक प्रतिभावंत विज्ञान लेखक असतानाही त्यांनी आपला फोकस अर्थव्यवस्थेवर ठेवला. स्टीफन पिंकर या आणखी एका विज्ञान लेखकाने माझ्या आशावादाला बळ दिले आहे. त्यांनी मानवाच्या १५ वेगवेगळ्या मानदंडांच्या आधारे म्हटले आहे की, बहुतांश लोकांचे जीवन चांगले होत आहे. लोक आधीपेक्षा दीर्घ आणि आरोग्यदायी आयुष्य जगत आहेत. दहशतवादाबाबतची आपली भीती अतिरंजित आहे.

मग जग आणखी चांगले होत आहे का? आणि कोणावर विश्वास ठेवायला हवा-आशावादी व्यक्तीवर की निराशावादी व्यक्तीवर? चांगल्या आणि वाईट दोन्ही गोष्टी होत आहेत हे स्पष्ट आहे आणि एक संतुलित दृष्टिकोन साकारणे सोपे नाही. पर्यावरण संकट आणि कट्टर उजवे राजकारण तुमच्या दु:खाचे कारण ठरू शकते. पण जेव्हा काळे राजकीय ढग डोक्यावर येतात तेव्हा व्यापक दृष्टिकोनाला शरण जाण्याची माझी सवय आहे. मी आपल्या देशात कोट्यवधी घरांत राहणाऱ्या सर्वसामान्य लोकांच्या जीवनात होत असलेल्या परिवर्तनाबाबत विचार करतो. जेव्हा अजून काही करायचे बाकी आहे, पण तुम्ही ते करू शकत नाही तेव्हा विकासाची प्रशंसा करणे मूर्खपणाचे वाटते. कोणीतरी म्हटलेच आहे की, जेव्हा पाऊस पडतो तेव्हा इंद्रधनुष्य पाहा आणि जेव्हा अंधार असेल तेव्हा तारे पाहा.

गुरचरण दास, स्तंभलेखक gurcharandas@gmail.com