हॉट सीट / मुंडे बहीण-भाऊ, क्षीरसागर काका-पुतण्याच्या लढतींकडे राज्याचे लक्ष

भाजपसमोर जागा कायम राखण्याचे, तर राष्ट्रवादीसमोर खाते उघडण्याचे आव्हान

Sep 23,2019 04:54:13 PM IST

दिनेश लिंबेकर

बीड - २०१४ च्या निवडणुकीत सहापैकी पाच जागांवर भाजपने विजय मिळवला होता. तर बीडची एक जागा राष्ट्रवादीला मिळवता आली. बीडमधील राष्ट्रवादीचे आमदार जयदत्त क्षीरसागर यांनी काही महिन्यांपूर्वीच आमदारकीचा राजीनामा देऊन शिवसेनेत प्रवेश करत मंत्रिपदही मिळवले. त्यामुळे जिल्ह्यात सध्या राष्ट्रवादीचा आता एकही आमदार शिल्लक राहिला नाही. अस्तित्व टिकवण्यासाठी या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीची कसोटी लागणार आहे. तर जिल्ह्यातील पाचही जागा कायम राखण्यासाठी भाजपची प्रतिष्ठा पणाला लागणार आहे. परळीत बहीण- भाऊ तर बीडमध्ये काका- पुतण्यात चुरशीची लढत होत असून याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष
लागलेले आहे.


२०१४ च्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीचे जयदत्त क्षीरसागर यांनी भाजपच्या तिकिटावर निवडणूक लढलेले शिवसंग्रामचे विनायक मेटे यांचा ६ हजार १३२ मतांनी पराभव केला होता. सध्याचे शिवसेनेचे कॅबिनेट मंत्री जयदत्त क्षीरसागर यांच्या विरोधात या मतदारसंघात राष्ट्रवादीकडून पुतणे संदीप क्षीरसागर लढत असून शरद पवार यांनी बीडच्या कार्यक्रमात संदीप यांची उमेदवारी जाहीर केली. हा मतदारसंघ शिवसेनेला सुटल्याने शिवसंग्रामचे आमदार मेटे यांच्या उमेदवारीचा तिढा कायम आहे. गेवराई मतदारसंघात भाजपचे आमदार लक्ष्मण पवार यांनी २०१४ मध्ये ६० हजार मते मिळवून राष्ट्रवादीच्या बदामराव पंडितांचा पराभव केला होता. निवडणुकीनंतर पंडित यांनी शिवसेनेत प्रवेश केला असून ते निवडणूक रिंगणात उतरले. यंदा राष्ट्रवादीचे विजयसिंह पंडित हे सुद्धा निवडणुकीत रिंगणात उतरले आहेत. गेवराईची जागा भाजपला सोडायची की शिवसेनेला यावर युतीत अजूनही एकमत झालेले नाही. त्यामुळे शिवसेनेचे माजी मंत्री बदामराव पंडित लढणार की विद्यमान आमदार लक्ष्मण पवार हा तिढा कायम आहे.


माजलगाव मतदारसंघात भाजपचे उमेदवार आर. टी. देशमुख यांनी ३७ हजार मतांनी राष्ट्रवादीचे माजी मंत्री प्रकाश सोळंके यांचा पराभव केला होता. यंदा माजलगावातून सोळंके राष्ट्रवादीकडूनच लढत असून भाजपत आमदार आर. टी. देशमुख यांनी निवडणूक लढवणार की नाही ही भूमिका जाहीर केली नसतांना अर्धा डझन इच्छुकांनी तयारी सुरू केली आहे.


त्यात भाजप नेते रमेश आडसकर, मोहन जगताप, ओमप्रकाश शेटे, यांचा समोवश आहे. राखीव असलेल्या केज विधानसभा मतदारसंघात भाजपच्या संगीता ठोंबरे यांनी मागील वेळी स्व. डॉ. विमल मुंदडा यांच्या स्नुषा राष्ट्रवादीच्या नमिता मुंदडा यांचा ४३ हजार मतांनी पराभव केला होता. यंदा राष्ट्रवादीकडून मुंदडा यांची उमेदवारी पक्षाकडून जाहीर झाल्याने त्या प्रचाराला लागल्या. आमदार ठोंबरे यांच्या उमेदवारीला शिवसेनेबरोबरच भाजपतील एका गटाकडून छुपा विरोध होत आहे. शिवाय भाजपकडून डॉ. अंजली घाडगे, तर वंचित आघाडीकडून माजी आमदार पृथ्वीराज साठे हे निवडणूक लढवण्याच्या तयारीत आहेत.

मुलाला उमेदवारी मिळण्यासाठी धस यांचे प्रयत्न
आष्टी विधानसभा निवडणुकीत भाजपचे भीमराव धोंडे यांनी राष्ट्रवादीचे सुरेश धस यांचा ६ हजार मतांनी पराभव केला होता. बीड जिल्हा परिषदेत भाजपला मदत केल्याने सुरेश धस यांना विधान परिषदेची उमेदवारी मिळाली आणि ते आमदार म्हणून निवडूनही आले. त्यामुळे या मतदारसंघात भाजपची ताकद वाढली. सध्या आमदार धस हे आपला मुलगा जयदत्त धस यांच्यासाठी भाजपकडून उमेदवारी मागत आहेत. या मतदारसंघात राष्ट्रवादीकडून उमेदवारीसाठी बाळासाहेब आजबे की सतीश शिंदे हा पेच
कायम आहे.

बीड जिल्ह्यात अशा होतील संभाव्य लढती
> बीड : जयदत्त क्षीरसागर (शिवसेना) x संदीप क्षीरसागर (राष्ट्रवादी काँग्रेस )
> परळी : पंकजा मुंडे (भाजप) x धनंजय मुंडे (राष्ट्रवादी)
> गेवराई : लक्ष्मण पवार (भाजप) x विजयसिंह पंडित (राष्ट्रवादी)
> माजलगाव : आर. टी. देशमुख (भाजप) x प्रकाश सोळंके (राष्ट्रवादी)
> केज : संगीता ठोंबरे (भाजप) x नमिता मुंदडा (राष्ट्रवादी)

X