आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विद्यार्थ्यांनी राष्ट्रपती, सैनिक, पंतप्रधान, मुख्यमंत्र्यांना पाठवले शुभेच्छा कार्ड

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

उमरगा- तालुक्यातील जकेकूरवाडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थिनींनी दिवाळीनिमित्त शनिवारी (दि.२७) राष्ट्रपती, सैनिक, पंतप्रधान, मुख्यमंत्री, शिक्षणमंत्री, उस्मानाबादचे खासदार, आमदार यांच्यासह शासकीय व निमशासकीय कार्यालये, नातलग, मित्र परिवारांना स्वनिर्मित शुभेच्छा कार्ड तयार करून पोस्टाने पाठवण्याचा स्त्युत्य उपक्रम प्रमोद मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात राबवला. 

 

आधुनिक तंत्रज्ञानाच्या अति वापरामुळे शुभेच्छापत्र देण्याची प्रथा लोप पावत चालली आहे. उपक्रशील शिक्षक प्रमोद मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली पाचवी ते आठवीच्या विद्यार्थ्यांनी शुभेच्छापत्र बनवताना स्वनिर्मितीचा आनंद घेतला. स्वतःचे कल्पनाविश्व व प्रतिभाशिलतेचा उपयोग करून काल्पनिक, वास्तविक जीवनाचा विचार डोळ्यासमोर ठेवून वैविध्यपूर्ण, आकर्षक शुभेच्छापत्रांची निर्मिती विद्यार्थ्यांनी केली. प्रतिवर्षी मोठ्या उत्साहाने दीपावली सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो. लोकप्रिय आणि सर्वदूर आनंदाने साजरा होणाऱ्या दीपावली सणाच्या निमित्ताने शुभेच्छा देण्याचा निर्धार शाळेतील विद्यार्थिनींनी केला आणि तो प्रत्यक्षात उतरवला.

 

शनिवारी सकाळी तयार करण्यात आलेले शुभेच्छा पत्र देशाचे राष्ट्रपती, सैनिक, पंतप्रधान, मुख्यमंत्री, शालेय शिक्षण मंत्री, जिल्ह्याचे खासदार, जिल्हाधिकारी, आमदार, जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्षा, मुख्य कार्यकारी अधिकारी, शिक्षणाधिकारी, उप शिक्षणाधिकारी, तहसीलदार, गटविकास अधिकारी, पोलिस अधिकारी, गटशिक्षणाधिकारी, विस्तार अधिकारी, केंद्रप्रमुख, मुख्याध्यापक, शिक्षक यांच्यासह नातेवाईक व मित्रपरिवारांना पाठवण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी विद्यार्थिनींनी स्वतः सर्व पदाधिकारी, लोकनियुक्त सदस्य, सर्व कार्यालय प्रमुख यांचे पत्ते संकलित करून शुभेच्छापत्र त्यांच्यापर्यंत कशाप्रकारे पोहोचवायचे याचा अनुभव प्रत्यक्षपणे घेतला.

 

त्यासाठी शिक्षकांच्या मदतीने तालुक्यातील पोस्ट कार्यालय गाठून शुभेच्छा कार्ड पाठविण्याची प्रक्रिया विद्यार्थीनींनी स्वतः पूर्ण केली. यावेळी सर्वोत्कृष्ट शुभेच्छा कार्ड तयार करणाऱ्या तीन विद्यार्थिनींना प्रोत्साहन म्हणून शाळेच्या वतीने मुख्याध्यापक अशोक गर्जे यांच्या हस्ते बक्षीस देण्यात आले. सहशिक्षक राजेंद्र पुजारी, अशोक चिंतलवार, मल्लिकार्जुन कोळी, बालाजी कदम, प्रमोद साखरे, साक्षी जाधव, निकिता सूर्यवंशी, रूपाली टाकळे, शुभांगी सूर्यवंशी आदींनी या सर्जनशिलतेला वाव देणाऱ्या उपक्रमासाठी पुढाकार घेतला. 

 

स्वनिर्मित शुभेच्छा कार्ड पोस्टाने पाठवण्याचा स्त्युत्य उपक्रम 
शिक्षक प्रमोद मोरे यांच्यासह विद्यार्थिनींनी बनवलेले शुभेच्छा कार्ड दाखवले. शुभेच्छा कार्ड बनवण्याचे समाधान मिळाले. शालेय व सहशालेय उपक्रमातून नवनवीन गोष्टींची माहिती आम्हा विद्यार्थ्यांना मिळते. शुभेच्छा कार्ड बनवण्याच्या उपक्रमामुळे स्वनिर्मितीचा आनंद मिळाला. शिवाय टपाल कार्यालयाच्या कामकाजाची माहिती मिळाली. त्याचबरोबर देशातील विविध क्षेत्रात काम करणाऱ्या विविध पदावरील व्यक्तींना शुभेच्छा देण्याचा आनंदही आम्हाला मिळाला -साक्षी किशोर जाधव, विद्यार्थिनी. 

सामाजिक भानासह नैतिकमूल्यांच्या जपणुकीचा उद्देश 
विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीबरोबरच त्यांच्या अंगी असलेल्या विविध कलागुणांना वाव मिळावा, विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होण्यासाठी शालेय अभ्यासक्रमासह ई-लर्निंग, क्रीडा व अन्य क्षेत्रात विद्यार्थ्यांना सहभागी करून विद्यार्थ्यांच्या मनात सामाजिक व सांस्कृतिक जाण आणि भान राहावे, शिवाय नैतिक मूल्यांची जपणूक व्हावी, या हेतूने हा उपक्रम घेतला. -प्रमोद मोरे, शिक्षक

बातम्या आणखी आहेत...