आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘ट्रॅक -२ डिप्लोमसी’चे यश

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कर्तारपूर ही भारत-पाकिस्तान मैत्रीसाठी एक चांगली संधी आहे. नव्याने सुरू होणारा हा नवा मार्ग नवी दिल्ली आणि इस्लामाबादपर्यंत पोहोचणार का, या प्रश्नाचे उत्तर मिळवण्यासाठी किमान सहा महिने तरी वाट पाहावी लागेल, असे चित्र आज आहे.

 

गेल्या महिन्यात ३० नोव्हेंबरला भारत आणि पाकिस्तान या दोन देशांच्या प्रतिनिधींनी भारत-पाकिस्तान सीमेलगत असलेल्या कर्तारपूर या ठिकाणी एका कॉरिडॉरच्या पायाभरणी कार्यक्रमाला सुरुवात केली. पुढील वर्षापर्यंत या प्रकल्पाचे काम पूर्ण होणे अपेक्षित आहे. तसे झाल्यास भारतातील शीख धर्मीयांना कोणत्याही व्हिसाशिवाय पाकिस्तानातील कर्तारपूरसाहिब गुरुद्वारात जाणे शक्य होणार आहे. शीख धर्मीयांसाठी ही एक अत्यंत पवित्र जागा आहे. शिखांचे धर्मगुरू गुरुनानक साहेब या ठिकाणी त्यांच्या निधनापर्यंत १८ वर्षे वास्तव्यास होते.

 

स्वातंत्र्यापासून या कॉरिडॉरची मागणी होत होती.  या सर्व घडामोडींमुळे भारत-पाकिस्तान संबंधांच्या चर्चांना पुन्हा एकदा सुरुवात झाली आहे. भारतात होऊ घातलेल्या निवडणुकांत या प्रकल्पाचा फायदा होऊ शकेल, अशी सत्ताधारी भारतीय जनता पक्षाला आशा आहे. यासाठी पाकिस्तानसोबत अधिकृत स्तरावर कोणतीही प्रत्यक्ष चर्चा होत नसतानाही ‘ट्रॅक -२ डिप्लोमसी’च्या माध्यमातून पाकिस्तानच्या साहाय्याने कर्तारपूर कॉरिडॉरविषयी निर्णय घेण्यात यश मिळवले आहे.  

 

या पायाभरणी कार्यक्रमाच्या वेळेस केलेल्या भाषणात पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी “विकास करण्यासाठी भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांनी इतिहासाच्या बंधनांतून मुक्त होणं गरजेचं आहे,’ असे म्हटले. त्यांच्या या भाषणातच त्यांनी चांगल्या भारत- पाकिस्तान संबंधांची आणि त्यासाठी आवश्यक असणाऱ्या चर्चेची गरजही व्यक्त केली. यावर प्रतिक्रिया देताना भारतीय परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी “दहशतवाद आणि चर्चा एकाच वेळेस पुढे जाऊ शकत नाही,’ असे उत्तर दिले. शिवाय २०१९ मध्ये पाकिस्तानात होणाऱ्या सार्क देशांच्या परिषदेलाही भारत उपस्थित राहणार नसल्याचे त्या म्हणाल्या. त्यामुळे कर्तारपूरमुळे भारत- पाकिस्तान संबंधांमध्ये वेगळे वळण येईल का, या चर्चांना काही काळासाठी तरी विराम दिला गेला आहे, असे समजणे गैर ठरणार नाही.  


पाकिस्तानात जुलै महिन्यात निवडणुका झाल्या. यात ‘तेहरिक-ए-इन्साफ’ पक्षाचा विजय होऊन इम्रान खान पंतप्रधान झाले. यानंतर भारत-पाकिस्तान संबंधांची दिशा काय असेल यावर चर्चा होऊ लागल्या होत्या, पण त्यातून फार काही निष्पन्न झाल्याचे अद्याप तरी चित्र नाही. पाकिस्तानच्या राजकारणाचा विचार केल्यास देशाच्या धोरणाविषयी निर्णय घेण्यात सरकारसोबत लष्कराचाही मोठा सहभाग असतो. याच आव्हानांचा सामना करत इम्रान खान यांना पंतप्रधानपदाची जबाबदारी पार पाडावी लागणार आहे.

  

भारत-पाकिस्तान राजकीय संबंधांचा आढावा घेतला तर या दोन देशांमध्ये तीन वेळेस युद्ध आणि १९९९ मध्ये कारगिलचे मर्यादित युद्ध झाले. १९९८ मध्ये भारत आणि त्यापाठोपाठ पाकिस्तान या दोन्ही देशांनी अण्वस्त्र चाचण्या केल्या. यानंतर भारत-पाकिस्तान संबंध अतिशय जटील झाले. १९९९ मध्ये तत्कालीन भारतीय पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ यांच्यासोबत लाहोर करार केला. भारत आणि पाकिस्तान यांच्यात वाघा सीमेमार्फत सुरू झालेल्या बससेवेने दोन्ही राष्ट्रांमधील संबंधांचा एक नवा अध्याय सुरू झाल्याचा भास झाला. पण जूनमध्ये कारगिलमध्ये झालेल्या संघर्षाने या आशांवर पाणी फिरले.   

 

२००१ मध्ये भारतीय संसदेवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानच्या सीमेवर पुन्हा एकदा युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली. दोन्ही देश अण्वस्त्र युद्धाच्या जवळ पोहोचल्याची परिस्थिती निर्माण झाली. शेवटी आंतरराष्ट्रीय दबाव निर्माण करून ही परिस्थिती निवळली. २००७ सालचा समझौता एक्स्प्रेसमधील बॉम्बस्फोट आणि त्यात मृत्युमुखी पडलेले पाकिस्तानी नागरिक असो की २००८ मध्ये मुंबईवर झालेला दहशतवादी हल्ला असो, या सर्व घटनांनी भारत-पाकिस्तान यांच्यातील चर्चांमध्ये व्यत्यय आणला. हाफीज सईदचा मुंबई हल्ल्यातील सहभाग, काश्मिरात वाढलेले दहशतवादी हल्ले यावरून दोन्ही देशांमध्ये शाब्दिक संघर्ष वाढले.   

 

२०१४ मध्ये भारतात झालेल्या सत्तापालटानंतर नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील भारतीय जनता पक्षाला बहुमत मिळाले. त्याच वेळी पाकिस्तानात नवाझ शरीफ यांचे सरकार होते. ही दोन्ही सरकारे चर्चा करतील, अशी अपेक्षा होती.  डिसेंबर २०१५ मध्ये पंतप्रधान मोदींनी रशियाहून परतताना अचानक लाहोरला थांबून तत्कालीन पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ यांची भेट घेऊन सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला. यानंतर भारत-पाकिस्तान संबंध सुधारतील, अशा आशा निर्माण झाल्या. पण, २ जानेवारी २०१६ ला पठाणकोट येथील भारतीय सैन्याच्या तळावर दहशतवादी हल्ला झाला. या हल्ल्यानंतर भारत सरकारने पाकिस्तान सरकारसोबत चर्चा सुरू ठेवण्यास नकार दिला.

 
“दहशतवाद आणि चर्चा या एकाच वेळी केल्या जाऊ शकत नाहीत. पाकिस्तान पुरस्कृत दहशवाद जोवर थांबत नाही तोवर चर्चा होणार नाहीत,’ अशी भूमिका भारत सरकारने घेतली. सप्टेंबर २०१६च्या मध्यावधीस जम्मूतील उरी येथे झालेल्या भारतीय सैन्यावरील हल्ल्याचे प्रत्युत्तर म्हणून भारतीय सैन्याने प्रत्यक्ष नियंत्रणरेषा पार करून पाकिस्तानी सैन्याच्या काही चौक्या उद्ध्वस्त केल्या. या ठिकाणी दहशतवाद्यांना आश्रय मिळत असल्याच्या आरोपावरून हा हल्ला केल्याचे सरकारने म्हटले. या ‘सर्जिकल स्ट्राइक’चा उल्लेख वारंवार केला गेला. त्यावरून बरेच राजकीय डाव साधण्याचाही प्रयत्न झाला. यातून परिस्थिती चिघळत गेली आणि भारत-पाकिस्तान चर्चांचा मार्ग यातून धूसर होत गेला.

 

जुलै २०१८मध्ये पाकिस्तानचे पंतप्रधान झाल्यानंतर देशाला उद्देशून केलेल्या भाषणात “काश्मीर प्रश्नाबाबत भारत आणि पाकिस्तानने चर्चा केली पाहिजे.... संबंध सुधारण्यासाठी भारताने एक पाऊल पुढे टाकले तर पाकिस्तान दोन पावले पुढे येईल,’ असे इम्रान खान म्हणाले. यातून भारत सरकारच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष राहिले. पण, काश्मिरातील पाकिस्तान पुरस्कृत हिंसाचार संपत नाही तोवर चर्चा न करण्याची भूमिका भारत सरकारने कायम ठेवली. सप्टेंबर २०१८ मध्ये संयुक्त राष्ट्राच्या सर्वसाधारण सभेच्या बैठकीच्या वेळेस भारत आणि पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्र्यांनी द्विपक्षीय चर्चा करावी, अशा आशयाचे पत्र इम्रान खान यांनी नरेंद्र मोदींना पाठवले. भारताने हे आमंत्रण स्वीकारले खरे; पण त्यानंतर अगदी एका दिवसातच आपल्या भूमिकेवरून माघारही घेतली. त्याच वेळेस कर्तारपूरसंबंधी होत असलेल्या शीख समुदायाच्या सात दशकांपासून असलेल्या मागणीचा पाठपुरावा करून मार्ग काढण्यात दोन्ही देशांना यश आले आहे. भारत-पाकिस्तान संबंधांत हा महत्त्वाचा टप्पा असेल काय, अशी आजही आशा आहे.   


या दोन्ही देशांतील ताणलेल्या संबंधांमुळे सुरक्षा दलांतील व्यक्तींसह दोन्ही देशांतील नागरिकांचे जीव जात आहेत. त्यासाठी चर्चा करणे हा एकमेव मार्ग आहे. परंतु, पुढील काही महिन्यांचा विचार करता भारतात २०१९ च्या एप्रिल आणि मे महिन्यात सर्वसाधारण निवडणुका होऊ घातल्या आहेत. पाकिस्तानसंबंधी सौम्य भूमिका घेतल्यास हिंदुत्वाच्या विचारधारेवर चालणाऱ्या भारतीय जनता पक्षाच्या एका मोठ्या मतदाराला ही भूमिका पटण्याची शक्यता कमी आहे. भारत-पाकिस्तानच्या राजकीय संबंधांचा मुद्दा हा दोन्ही राष्ट्रांमधील अंतर्गत राजकारणाचाही मुद्दा राहिला आहे. तेव्हा सत्तेत येण्यापूर्वी आणि त्यानंतर सत्तेत आल्यावरही पाकिस्तानला धडा शिकवण्याची भाषा करणाऱ्या सत्ताधारी भाजप सरकारला निवडणुकीच्या तोंडावर आपल्या भूमिकेत मोठा बदल करणे परवडणारे नाही. याची पूर्ण कल्पना पाकिस्तान सरकारलाही आहे. म्हणूनच भारतीय पत्रकारांशी बोलताना “भारताच्या निवडणुका पार पडेपर्यंत सहा महिने थांबण्याची आमची तयारी आहे,’ असे सूचक वक्तव्य इम्रान खान यांनी केले.   

कर्तारपूर ही भारत-पाकिस्तान मैत्रीसाठी एक चांगली संधी आहे. नव्याने सुरू होणारा हा नवा मार्ग नवी दिल्ली आणि इस्लामाबादपर्यंत पोहोचणार का, या प्रश्नाचे उत्तर मिळवण्यासाठी किमान सहा महिने तरी वाट पाहावी लागेल, असे चित्र आज आहे.   

बातम्या आणखी आहेत...