Home | Maharashtra | Pune | the supplementary charge sheet filed against the Kalaskar, Andure

डॉ. दाभोलकर हत्या प्रकरण : कळसकर, अणदुरेविरोधात पुरवणी दोषारोपपत्र दाखल; नऊ जणांचे घेतले जबाब : सीबीआय 

प्रतिनिधी | Update - Feb 14, 2019, 08:54 AM IST

संबंधित दोषारोपपत्रात दोन प्रत्यक्षदर्शींसह ९ जणांचे जबाब नोंदवून ते न्यायालयात सादर करण्यात आले आहेत.

 • the supplementary charge sheet filed against the Kalaskar, Andure

  पुणे- अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्या प्रकरणात हल्लेखोर सचिन अणदुरे आणि शरद कळसकर यांच्याविरोधात सीबीआयने बुधवारी विशेष न्यायाधीश एस. एस. गोसावी यांच्या न्यायालयात सुमारे ४५० पानांचे पुरवणी दोषारोपपत्र दाखल केले. अणदुरे आणि कळसकरविरोधात सीबीआयने पुरावे गोळा केले असून त्याबाबतची माहिती न्यायालयास देण्यात आली आहे.

  संबंधित दोषारोपपत्रात दोन प्रत्यक्षदर्शींसह ९ जणांचे जबाब नोंदवून ते न्यायालयात सादर करण्यात आले आहेत. यापूर्वी या प्रकरणात १० जून २०१६ रोजी सनातन संस्थेचा साधक वीरेंद्र तावडे यास अटक करून त्याच्याविरोधात सप्टेंबर २०१६ मध्ये न्यायालयात सीबीआयने दोषारोपपत्र दाखल केले आहे. डॉ. दाभोलकर यांच्या खूनप्रकरणी दुचाकीवरून आलेले दोन हल्लेखोरच होते, असे आजवरच्या तपासात निष्पन्न झाले आहे. मात्र, सीबीआयने न्यायालयात दावा केला आहे की, हल्लेखोर शरद कळसकरच्या चौकशीत घटनेच्या दिवशी २० ऑगस्ट २०१३ रोजी ओंकारेश्वर पुलावर सकाळी सव्वासात वाजण्याच्या आधीच त्या ठिकाणी हल्लेखोरांचे दोन प्रत्यक्षदर्शी साक्षीदार उपस्थित होते आणि त्यांनी डॉ. दाभोलकर नेमके कोण याची ओळख हल्लेखोरांना करून दिल्याचे उघडकीस आले आहे. त्यानुसार अणदुरे आणि कळसकर यांना दाभोलकरांबाबत खात्री झाल्यानंतर त्यांच्यावर प्रत्यक्ष गोळ्या झाडण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे.

  दोघांचा शोध नाही
  कळसकर आणि अणदुरेला दाभोलकरांची ओळख पटवून देणारे दोघेही खुनाच्या कटात सहभागी होते. मात्र, अद्याप या दोघांचा शोध लागला नसल्याचे सांगण्यात आले. डॉ. नरेंद्र दाभोलकर यांची हत्या करण्यासाठी बंगळुरू येथील पत्रकार गौरी लंकेश खून प्रकरणातील मुख्य आरोपी अमोल काळे याने दाभोलकर यांच्यावर गोळ्या झाडणारा औरंगाबादचा हल्लेखोर सचिन अणदुरे यास पिस्तूल आणि दुचाकी पुरवल्याचा दावा सीबीआयने पुणे न्यायालयात केला आहे.

  काळे, दिग्वेकरविरोधात लवकरच आरोपपत्र
  डॉ. वीरेंद्रसिंग तावडे यांच्या सोबतीने अमोल काळे याने डॉ. दाभोलकर यांच्या हत्येचा कट रचल्याचे सांगण्यात आले आहे. तसेच सचिन अणदुरे यास शस्त्र पुरवणे आणि दुचाकीची व्यवस्था करून देण्यासोबतच डॉ. दाभोलकर यांच्या खुनासाठी रेकी केल्याचा आरोप काळेवर आहे. नालासोपारा शस्त्रसाठा प्रकरणातील आरोपी वैभव राऊत याच्यासह कळसकर याने मुंबर्इ, ठाणे परिसरातील खाडीत चार पिस्टलची विल्हेवाट लावल्याचा दावाही सीबीआयने यापूर्वी न्यायालयात केला आहे. डॉ. दाभोलकर खून प्रकरणात लवकरच इतर आरोपी अमोल काळे, अमित दिग्वेकर, राजेश बंगेरा यांच्याविरोधात दोषारोपपत्र दाखल केले जाणार असल्याची माहिती सीबीआयच्या सूत्रांनी दिली.

Trending