आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महापौरपदासाठीचा सस्पेन्स कायम

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर : शिवसेना, भाजपसह राष्ट्रवादी काँग्रेेसचे उमेदवारही सहलीवर गेले आहेत. सर्वाधिक जागा मिळवणाऱ्या शिवसेनेला सत्तेपासून रोखण्यासाठी स्थानिक पातळीवर राष्ट्रवादी काँग्रेसने भाजपला पाठिंबा देऊ केला आहे. त्यामुळे सत्ता कोण स्थापन करणार, याची उत्सुकता नगरकरांना आहे. स्थानिक पातळीवर दावे- प्रतिदावे सुरू असले, तरी अंतिम निर्णय पक्षपातळीवरच होणार आहे. मात्र, महापौर निवडणूक पाच दिवसांवर येऊन ठेपली तरी राजकीय पक्षांनी आपली भूमिका जाहीर केलेली नाही. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार यांच्याशी चर्चा करून दोन दिवसांत भूमिका जाहीर करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. 

 

नगरकरांनी ९ डिसेंबरला झालेल्या महापालिका निवडणुकीत शिवसेनेला प्रथम क्रमांकाची पसंती दिली. राष्ट्रवादी काँग्रेस दुसऱ्या तर भाजपला तिसऱ्या क्रमांकाची पसंती देण्यात आली. तिसऱ्या क्रमांकावर असलेल्या भाजपशिवाय शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसला सत्ता स्थापन करणे कठीण आहे. त्यात शिवसेनेला रोखण्यासाठी राष्ट्रवादीने भाजपला पाठिंबा देऊ केला आहे. भाजपने बरोबर यावे, असे शिवसेनेला मनोमन वाटत आहे. त्यामुळेच तिसऱ्या क्रमांकावर असुनही भाजपला भाव वधारला आहे. दरम्यान, भाजपकडून बाबासाहेब वाकळे यांनी महापौरपदासाठी कंबर कसली आहे, तर शिवसेनेकडून बाळासाहेब बोराटे यांचे नाव चर्चेत असले, तरी त्यांच्या नावाला मोठा विरोध होत अाहे. सेनेबरोबर युती करायची की राष्ट्रवादीचा पाठींबा घेत सत्ता स्थापन करायची, याचा निर्णय भाजपचे वरीष्ठ नेतेच घेणार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस देखील येत्या दोन दिवसांत अजित पवार यांच्याशी चर्चा करून भूमिका जाहीर करणार आहे. सत्तेचे गणित जुळवत असताना सर्वच पक्षांचे उमेदवार सहलीवर रवाना झाले आहेत. काहीजण मात्र शहरातच आहेत. शिवसेनेच्या उमेदवारांना बोराटे यांनी दमन व मुंबई येथे सहलीवर नेले असल्याची सूत्रांची माहिती आहे. परंतु काही उमेदवारांनी मात्र बोराटे यांच्या सहलीत सहभागी न होणे पसंत केले आहे. येत्या दोन दिवसांत सर्वच राजकीय पक्षांची भूमिका जाहीर होऊन पुढील रणनिती आखली जाणार अाहे. 


निवडणुकीसाठी उरले पाच दिवस तरी पक्षपातळीवरील भूमिका गुलदस्त्यातच 
बसप उमेदवारांवर सर्वांचाच दावा
 


प्रभाग क्रमांक १० मधून निवडून आलेल्या बहुजन समाज पक्षाच्या उमेदवारांनी स्वतंत्र गटनोंदणी केलेली आहे. हे चारही उमेदवार सत्तेच्या बाजूनेच कौल देणार हे निश्चित असले तरी राष्ट्रवादी व शिवसेना या बसप उमेदवारांवर दावा करत आहेत. भाजपचे महापौरपदाचे उमेदवार बाबासाहेब वाकळे यांनी या चारही उमेदवारांना जवळ केले असल्याचीदेखील चर्चा आहे. शिवसेना- भाजपची युती झाली, तर मात्र बसपच्या उमेदवारांची अवस्था केविलवाणी होणार आहे. 


काँग्रेस अलिप्तच... 
काँग्रेसचे पाच उमेदवार कोणाबरोबर जाणार याकडेदेखील अनेकांचे लक्ष लागले आहे. डॉ. सुजय विखे यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसने ही निवडणूक लढवली होती. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विखे यांची महापौर निवडणुकीतील भूमिका महत्त्वाची ठरणार आहे. काँग्रेसच्या पाच उमेदवारांपैकी तीन उमेदवार राष्ट्रवादीच्या गोटात वावरणारे आहेत. निवडणुकीबाबत भूमिका ठरवण्यासाठी काँग्रेसचे उमेदवार व सुजय विखे यांची बैठक होणार आहे. 


अब्रुनुकसानीचा दावा दाखल करणार 
उमेदवारी अर्ज दाखल करताना अपत्याबाबत असलेली माहिती लपवलेली नाही. सर्व खरी माहिती अर्जात दिलेली आहे. विरोधकांनी मात्र खोटे प्रमाणपत्र सादर करत दिशाभूल करण्याचा प्रयत्न केलेला आहे. हा प्रकार ब्लॅकमेलिंग करण्यासारखाच आहे. याप्रकरणी न्यायालयाची नोटीस आल्यानंतर संबंधितांच्या विरोधात अब्रुनुकसानीचा दावा दाखल करणार आहे. महापौरपदासाठी मी इच्छुक असून तसे मी पक्षाला कळवलेले आहे. परंतु पक्षाचे लक्ष विचलित करण्यासाठी विरोधकांनी हा प्रकार केलेला आहे. त्यांच्या विराेधात कायदेशीर कारवाई करणार असल्याची माहिती बाबासाहेब वाकळे यांनी शनिवारी पत्रकारांना दिली. 
 

बातम्या आणखी आहेत...