आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दुचाकीचे स्टँड घासल्याने रस्त्यावर पडताच मागून येणाऱ्या ट्रकने शिक्षकाला चिरडले

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - दुचाकीचे स्टँड रस्त्यावर घासत गेल्यामुळे तोल जाऊन रस्त्यावर पडल्यामुळे मागून वेगाने येणाऱ्या ट्रकने चिरडले. या भीषण अपघातात एका शिक्षक जागीच ठार झाल्याची दुर्दैवी घटना सोमवारी दुपारी पैठण रस्त्यावर घडली. शिक्षकाच्या डोक्यावर हेल्मेट होते, मात्र ट्रकची जोरदार धडक बसताच हेल्मेट बाजूला पडले आणि अवाढव्य ट्रक डोक्यावरून गेल्यामुळे शिक्षकाचा मृत्यू झाल्याचे प्रत्यक्षदर्शींनी  सांगितले.

 

 याप्रकरणी ट्रकचालकास ताब्यात घेण्यात आले असून सातारा पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. दुचाकीचे साइड स्टँड जमिनीवर घासल्यामुळे गायकवाड यांचा तोल गेल्याचा पोलिसांचा प्राथमिक अंदाज असल्याची माहिती वाहतूक पोलिस निरीक्षक अशोक मुदीराज यांनी दिली.    


संतोष लक्ष्मण गायकवाड (३९, रा. नाथपुरम, इटखेडा, पैठण रोड) असे अपघातात ठार झालेल्या शिक्षकाचे नाव आहे. संतोष  हे गेल्या १० वर्षांपासून पैठण रोडवरील अग्रसेन विद्या मंदिर येथे कला शिक्षक म्हणून कार्यरत होते. दिवाळी सुट्या संपल्यावर सोमवारपासून शाळा सुरू झाल्याने ते शाळेत आले होते. दिवसभर शाळेतील कामकाज आटोपल्यानंतर सायंकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास गायकवाड घरी गेले आणि काही कामानिमित्त पुन्हा त्यांच्या  दुचाकीवरून (एमएच २० ई १८९३) शहराकडे येत होते.

 

पैठण रस्त्यावरील मां-बाप दर्ग्याजवळून ते वळण घेत असताना मागून येणाऱ्या भरधाव   ट्रकने  (एमएच २५ बी ६०२४) गायकवाड यांच्या दुचाकीस जोराची धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की, धडकेनंतर गायकवाड यांच्या डोक्यावरील हेल्मेट निघून बाजूला पडले होते. त्याच वेळी ट्रकचे चाक त्यांच्या डोक्यावरून गेले. 

 

अपघातानंतर गायकवाड रक्ताच्या थारोळ्यात पडले होते. भीषण अपघात झाल्याचे पाहून त्यांच्या सहकारी शिक्षकांनी घटनेची माहिती तत्काळ पोलिसांना दिली. अपघाताची माहिती मिळताच वेदांतनगर पोलिस ठाण्याच्या टू-मोबाइल व्हॅनवरील जमादार बबन शिंदे, मोहंमद मुसा शेख यांनी  घटनास्थळी धाव घेऊन रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या गायकवाड यांना उपचारासाठी घाटीत दाखल केले. मात्र,   घाटीतील डॉक्टरांनी गायकवाड यांना तपासून मृत घोषित केले. याप्रकरणी सायंकाळी उशिरापर्यंत सातारा पोलिस ठाण्यात अपघाताची नोंद करण्याचे काम सुरू होते. वाहतूक शाखेचे पोलिस निरीक्षक अशोक मुदीराज आणि त्यांच्या पथकानेही तत्काळ घटनास्थळ  गाठले.    


शिक्षकांची रुग्णालयात धाव  
गायकवाड यांना अपघात झाला असल्याचे समजताच त्यांचे नातेवाईक आणि सहकारी शिक्षकांनी घाटी रुग्णालयात धाव घेतली. रक्ताच्या थारोळ्यातील  संतोष यांना पाहून त्यांच्या नातेवाइकांना शोक अनावर झाला.  नातेवाइकांचा करुण विलाप पाहून उपस्थितांचेही डोळे पाणावले होते.  संतोष गायकवाड हे गेल्या १० वर्षांपासून अग्रसेन विद्या मंदिर येथे नृत्य शिक्षक म्हणून नोकरी करत होते. त्यांच्या पश्चात आई, तीन बहिणी, पत्नी, तिसरीत शिकत असलेला एक मुलगा व एक लहान  मुलगी आहे.    

 

जुन्या मोटारसायकलला स्टँड सेन्सर बसवणे शक्य 
जुन्या मोटारसायकलला स्टँड सेन्सर बसवणे खूप सोपे आणि कमी खर्चाचे आहे. नव्या दुचाकीचे हे सेन्सर विकत मिळते. यात स्पीडोमीटरजवळ इंडिकेटर अथवा आवाज करणारे बझर बसवता येते. नवीन दुचाकीस्वार गाड्या ज्या पद्धतीने सजवतात त्यात अनेक सेन्सर लावतात तसेच स्टँड सेन्सर बाजारात मिळते. ते लावले तर आपल्या वाहनाचे स्टँड उघडे आहे याची आठवण होईल, ते झाकल्यावरच बझर बंद होईल अशी व्यवस्था करता येऊ शकते, अशी सूचना प्रसिद्ध उद्योजक सीएमआयएचे माजी अध्यक्ष मुकुंद कुलकर्णी यांनी केली.

 

अपघातग्रस्त दुचाकीत नव्हते पेट्रोल, पोलिसांनी भरले

पोलिस निरीक्षक अशोक मुदीराज यांनी घटनास्थळाकडे धाव घेतली. त्यांनी प्राथमिक केलेल्या तपासात काही बाबी समोर आल्या आहेत. गायकवाड यांच्या दुचाकीचे साइड स्टँड रस्त्यावर घासले. त्यामुळे त्यांचा तोल गेला आणि ते खाली पडले. त्यामुळे वेगाने येणाऱ्या ट्रकचालकाला अंदाज आला नाही, त्याने त्याला उडवले, असे मुदीराज यांनी सांगितले.  गायकवाड यांनी हेल्मेट घातलेले असल्याचे दिसते. मात्र, घाईत हेल्मेटचा बेल्ट लावला नाही. त्यामुळे ते डोक्यातून निसटून बाहेर पडले आणि डोक्याला गंभीर मार लागला असावा, असा प्राथमिक निष्कर्ष आहे. या अपघातात गाडीचे कुठेही नुकसान झाले. पोलिसांनी जेव्हा ही दुचाकी ताब्यात घेतली तेव्हा त्यात पेट्रोल नव्हते. पोलिसांनी पेट्रोल टाकून ती दुचाकी पोलिस ठाण्यात नेली.  

 

फक्त ५०० रुपये येईल खर्च
पैठण रस्त्यावर झालेल्या अपघातानंतर ‘दिव्य मराठी’ने यासंदर्भात ऑटोमोबाइल तज्ञांशी चर्चा केली. त्यांनी सांगितले की, सध्या बाजारात येणाऱ्या नवीन गाड्यांमध्ये स्टँड अोपन राहिल्यास गाडी सुुरू होत नाही. अथवा स्टँड उघडे असल्यास बझर वाजतो किंवा समोरील इंडिकेटरवर लाल रंगाची खूण दिसून येते. मात्र जुन्या गाड्यांमध्ये ही व्यवस्था नव्हती.  आता जुन्या गाड्यांनाही स्टँड इंडिकेटर, बझर आणि सेन्सर लावण्याची व्यवस्था करता येऊ शकते. त्यासाठी सुमारे ४५० ते ५०० खर्च येतो, असे ऑटोमोबाइल व्यावसायिक अंकुर अनपट यांनी सांगितले.

बातम्या आणखी आहेत...