आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दुचाकीस्वार तीन भामट्यांनी ४० हजारांचा एेवज असलेल्या शिक्षिकेची पर्स लांबवली

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव : रस्त्याने पायी चालत असलेल्या महिलेच्या खांद्यावरील पर्स लांबवून तीन भामटे दुचाकीने पसार झाले. या पर्समध्ये ४० हजार रुपयांचा ऐवज होता. शनिवारी सकाळी ६ वाजता काव्यरत्नावली चौकाजवळ ही घटना घडली. रामानंदनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. 

मंजूषा रवींद्र पाठक (रा.व्यंकटेशनगर) यांच्यासोबत हा प्रकार घडला आहे. पाठक ह्या कंडारी (ता.जळगाव) येथे जिल्हा परिषदेच्या शाळेत शिक्षिका आहेत. शनिवारी सकाळी ६ वाजता त्या घरातून बाहेर पडून काव्यरत्नावली चौकाच्या दिशेने पायी चालत होत्या. दुचाकीने ट्रिपलसीट आलेल्या भामट्यांनी त्यांच्या खांद्यावर अडकवलेली पर्स हिसकावून पोबारा केला. सकाळची वेळ असल्याने रस्त्यावर वर्दळ नव्हती. त्यामुळे पाठक यांनी अारडाओरड करूनही उपयोग झाला नाही. या पर्समध्ये सोन्याचे मंगळसूत्र, एक मोबाइल व १० हजार रुपये रोख असा सुमारे ४० हजार रुपयांचा ऐवज होता. पाठक यांच्या फिर्यादीवरून रामानंदनगर पोलिसात गुन्हा दाखल झाला.  


गस्त संपताच भामट्यांचे उपद्रव :

रात्री १० वाजेपासून ते पहाटे ५ वाजेपर्यंत रात्री गस्तीचे पथक शहरात फिरत असते. पहाटे ५ वाजता गस्ती पथकाचे काम संपताच भामटे कामाला लागत आहेत. अवघ्या एका तासात हातसफाई करून भामटे पोबरा करतात. नंतर तो पोलिसांच्या ताब्यात सापडत नसल्याचे चित्र तयार झाले आहे. १० डिसेंबरला पहाटे मोबाइल लांबवणारे पोलिसांना मिळून आलेले नाहीत. याप्रकरणी जिल्हापेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात अाला अाहे. 
 
उच्चभ्रू भागात चोरट्यांचा हैदोस 
गाडगेबाबा चौक, महाबळ, काव्यरत्नावली, आकाशवाणी या मार्गावर दररोज अनेक नागरिक मॉर्निंग वॉकसाठी येत असतात. अशा प्रमुख मार्गावर लुटीच्या घटना घडत असल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. विशेष म्हणजे याच मार्गांवर पोलिस अधीक्षक, अप्पर पोलिस अधीक्षक, पोलिस उपअधीक्षक, जिल्हाधिकारी आदी प्रमुख अधिकाऱ्यांची निवासस्थाने आहेत. त्यांच्या घराबाहेरच चाेरट्यांनी हैदोस घातल्याचे या घटनांमधून समोर येते आहे. दिवसाढवळ्या लुटण्याच्या घटना वाढत असल्याने लाेकभावना प्रचंड तीव्र झाल्या अाहेत. 


आरएफआयडी यंत्रणा लावूनही उपयोग नाही 
पोलिसांची रात्रीची गस्त चोख व्हावी, यासाठी दोन वर्षांपूर्वी आरएफआयडी यंत्रणा सुरू करण्यात आली. रात्री गस्तीवर असलेल्या पोलिसांनी दिलेल्या पॉइंटवर जाऊन पंचिंग करणे बंधनकारक करण्यात आले आहे. यंत्रणेचा उपयोग पोलिसांच्या हजेरीसाठी होतो आहे; परंतु यानंतर चोरी, घरफोडी, जबरी लुटीच्या घटनांमध्ये घट झाल्याचे दिसून येत नाही. गेल्या काही दिवसांपासून शहरात दररोज चोरी, घरफोडी व सोनसाखळी चोरीचे गुन्हे घडत आहेत. त्यामुळे आरएफआयडी यंत्रणेचाही काही उपयोग होत नसल्याचे समोर आले आहे. त्यामुळे पाेलिस प्रशासनावरील नागरिकांचा राेष वाढला अाहे. 


टेहळणी करून चाेरट्यांचा डल्ला 
हिवाळ्याचे दिवस असल्यामुळे अनेक नागरिक, महिला पहाटेच्यावेळी मॉर्निंग वॉकसाठी घराबाहेर पडत आहेत. याचाच फायदा उचलत चोरटे सोनसाखळ्या, मोबाइल, पर्स लांबवत आहेत. दुचाकीवरून ट्रिपलसीट बसलेल्या भामट्यांनी १० डिसेंबर रोजी जिल्हापेठ व शहर पोलिस ठाण्याच्या हद्दीतून डॉ.शांताराम बडगुजर, प्रणव जोगी, वंदना पाटील व योगेश चौधरी या चार जणांच्या हातातून मोबाइल हिसकावल्याची घटना घडली होती. तर शनिवारी पाठक यांची पर्स लांबवणारे भामटे देखील ट्रिपलसीट होते. एकाच टोळीने हे गुन्हे केल्याचा संशय व्यक्त हाेत अाहे. 
 

बातम्या आणखी आहेत...