आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चोरट्यांनी 24 लाखांचे सिगारेट कार्टून लांबवले; पहिल्या चोरीचा तपास नसताना दुसरी मोठी चोरी

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जालना- गोदामाचे शटर तोडून चोरट्यांनी २४ लाख रुपयांचे सिगारेटचे कार्टून लंपास केल्याची घटना जालना शहरातील व्यंकटेशनगर भागात मंगळवारी मध्यरात्री २ वाजेच्या सुमारास घडली. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज जप्त केले असून, त्या आधारे चोरट्यांना ताब्यात घेण्यासाठी पोलिस प्रयत्न करीत आहेत. दरम्यान, ४ नोव्हेंबर रोजी रात्री नवीन मोंढा भागात एक दुकानातून चोरट्यांनी ४५ लाखांचा ऐवज लंपास केल्याची घटना घडली. या घटनेत चोरटे सीसीटीव्ही फुटेजमध्ये स्पष्ट कैद होऊनही आरोपी पोलिसांना ताब्यात घेता आलेले नाही. 

 

जालना शहरातील पारस नीलेश भयाणी यांचे व्यंकटेशनगर भागात सिगारेटचे गोदाम आहे. मंगळवारी सायंकाळी ते गोदामाचे शटर लावून घरी गेले होते. सुरक्षा म्हणून गोदामाला दोन्ही बाजूंनी शटर लावण्यात आले आहेत. तसेच रात्रीच्या वेळी सुरक्षारक्षकही तैनात होता. परंतु त्याची नजर चुकवून तीन चोरट्यांनी गोदामाच्या मागचे शटर उचकटवून आत प्रवेश केला. यानंतर सीसीटीव्ही दिसताच ते चोरी करण्याआधी फोडून टाकले. यानंतर आत प्रवेश करून चोरट्यांनी २४ लाख ६१ हजार रुपये किमतीचे २२ सिगारेटचे कार्टून काढून घेत लंपास केले. दरम्यान, बुधवारी सकाळी ५ वाजेच्या सुमारास सुरक्षारक्षकाला गोदामात चोरी झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्याने गोदामाचे मालक पारस भयाणी यांना या प्रकाराबाबत माहिती दिली. या घटनेची माहिती मिळताच सदर बाजार पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. या दोन्ही घटनांमुळे सिगारेटचेच बॉक्स का चोरले जात आहेत, याचा तपास अजून पोलिसांना लागत नाही. या प्रकरणी पारस भयाणी यांच्या फिर्यादीवरून सदर बाजार पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलिस उपनिरीक्षक रुपेकर हे करीत आहेत. 

 

सिगारेटचीच होतेय चोरी 

४ नोव्हेंबर २०८ रोजी नवीन मोंढा भागातील ३०१ क्रमांकाचे श्री पार्श्वनाथ ट्रेडिंग (सुपारीवाला) हे दुकान पाठीमागून फोडून तसेच आतील एक शटर तोडून आत प्रवेश केला. या ठिकाणी मोठ्या प्रमाणात विविध प्रकारचा माल असतानाही चोरट्यांनी केवळ सिगारेटचेच महागडे ४५ लाखांचे कॅरेटच लंपास केले. या प्रकरणात चंदनझीरा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झालेला आहे.

 

दरम्यान, मंगळवारी घडलेल्या घटनेतही चोरट्यांनी २४ लाखांचे केवळ सिगारेटचेच बॉक्स लंपास केले. यामुळे या दोन्हीही प्रकरणात एकाच टोळीचा हात असल्याची शक्यता पोलिसांकडून व्यक्त होत आहे. मंगळवारी झालेल्या चोरीच्या घटनेत तीन चोरट्यांनी सीसीटीव्ही फोडण्यासाठी काठीचा वापर केला आहे. यात तिन्ही चोरटे कैद झाले . 
 

बातम्या आणखी आहेत...