आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

धुणे धुण्यासाठी गेलेले तिघे जण सिंदफणा नदीत बुडाले

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

गेवराई - दसऱ्याचे धुणे धुण्यासाठी गेलेल्या तिघा जणांचा सिंदफणा नदीच्या डोहात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला.  तिघांचे मृतदेह ग्रामस्थांनी बाहेर काढले. बीड तालुक्यातील नाथापूर-नांदलगाव येथे बुधवारी सकाळी साडेअकरा वाजण्याच्या सुमारास घडली.

गेवराई तालुक्यातील सिंदफणा नदीच्या तीरावर असणाऱ्या नांदलगाव येथील गोविंद दत्ता गाडे (वय १६), लक्ष्मण भगवानराव गाडे (वय ३५), रोहन लक्ष्मण गाडे(वय १२) व रोहणची आई हे सर्व जण बुधवार रोजी सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास  दसऱ्याचे धुणे धुण्यासाठी गेले होते दरम्यान यातील रोहण लक्ष्मण गाडे यांचा पाय घसरल्याने ते पाण्याच्या डोहात बुडू लागला. त्याला वाचवण्यासाठी वडील लक्ष्मण भगवानराव गाडे झटापटीने पुढे सरसावले. मात्र तेही खोल डोहामध्ये बुडत असल्याचे पाहून पुतण्या गोविंद दत्ता गाडे यानेही उडी घेतली. एकमेकांना वाचवत असताना  दुर्दैवाने या तिघांचा डोहात बुडून मृत्यू झाला.

घटनास्थळी सपोनि सुरेश उणवणे सह पोलिस कर्मचारी दाखल होत पंचनामा केला असून प्रभूरामचंद्र गाडे यांच्या खबरीवरून तलवाडा पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. पुढील तपास सपोनि सुरेश उणवणे करत आहेत.
 

ग्रामस्थांनी काढले मृतदेह
या वेळी नांदलगाव ग्रामस्थांनी सिंदफणा नदीकडे धाव घेत या तिघांचे मृतदेह पाण्याबाहेर काढले. तिघांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी गेवराई तालुक्यातील  जातेगावच्या प्राथमिक रुग्णालयात नेण्यात अाले.  शवविच्छेदन करून रात्री सात वाजण्याच्या सुमारास मृतदेह नातेवाइकांना सुपूर्द करण्यात आले.