आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दोघा पोलिसांना 12 अन् 13 तारखेला लाच घेताना झाली अटक; तरी 16 ला तिसऱ्याने घेतली रक्कम

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - शुक्रवारी सकाळी  पोलिस  आयुक्तालयात झालेल्या एका कार्यक्रमात बोलताना पोलिस आयुक्तांनी नागरिकांशी संवाद साधला. पोलिस हा ‘फोर्स’ नाही ती सेवा देणारी यंत्रणा आहे. त्यामुळे नागरिकांनी बिनदिक्कतपणे पोलिसांशी संपर्क साधावा, अशा शब्दांत आयुक्तांनी नागरिकांना अाश्वस्त केले होते.  हा कार्यक्रम सुरू असताना दुसरीकडे  एक हजार रुपयांची लाच घेताना योगेश पंडित सूर्यवंशी या पोलिस शिपायास वेदांतनगर पोलिस ठाण्यात अटक करण्यात आली. 


विशेष म्हणजे, सोमवारी १२ नोव्हेंबर रोजी आणि दुसऱ्या दिवशी १३ नोव्हेंबर रोजी दोन पोलिसांना लाच घेताना अटक करण्यात आली होती. तरीही १६ तारखेला तिसऱ्या पोलिसाने निर्लज्जपणे  लाच घेतली. सोमवारी सातारा पोलिस ठाण्यातील सहायक फौजदार नारायण केशव बऱ्हाटे यास अटक  करण्यात आली होती. विशेष म्हणजे या सहायक फौजदाराने राज्य राखीव पोलिस दलाच्या एका जवानाकडूनच लाच मागितली होती. त्याचे वृत्त मंगळवारी प्रसिद्ध झाले. त्याची जामिनावर सुटका होण्यापूर्वीच मंगळवारी सिटी चौक पोलिस ठाण्यातील पोलिस नाईक सुनील नारायण जहागीरदार तर शुक्रवारी तिसरा पोलिस लाचलुचपतच्या जाळ्यात अडकला. पोलिस सेवा देणारी यंत्रणा

 

बीट अंमलदाराच्या कक्षातच लावला ट्रॅप

१५ नोव्हेंबर रोजी तक्रारदाराची आई तडीपार मुलास घेऊन  पोलिस ठाण्यात  हजर झाली.  तिने तक्रारदार मुलास फोन करून सांगितले की पोलिस शिपाई सूर्यवंशी याने भावास जामिनावर सोडण्यासाठी व कारवाई न करण्यासाठी पैसे मागितले असून एक हजार रुपये लागतील, असे सांगितले आहे. मात्र तक्रारदाराला लाच देण्याची इच्छा नसल्यामुळे त्याने थेट लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधला.  शुक्रवारी (१६ नोव्हेंबर) वेदांतनगर  पोलिस ठाण्याच्या पहिल्या मजल्यावर बीट अंमलदाराच्या कक्षात हा ट्रॅप झाला. एसीबीच्या  उपअधीक्षक वर्षाराणी पाटील, निरीक्षक महादेव ढाकणे, हवालदार गणेश पंडुरे, रवींद्र देशमुख, मिलिंद इप्पर, संदिप चिंचोले यांच्या पथकाने ही कारवाई केली.

 

१२ नोव्हेंबर :  २० हजारांची लाच घेताना सहायक फौजदार अटकेत
१२ नोव्हेंबर रोजी सातारा पोलिस ठाण्यातील सहायक फौजदार नारायण बऱ्हाटे यांनी राज्य राखीव दलातील जवानाकडून २० हजार रुपयांची लाच घेतली. त्या वेळी ते रंगेहाथ एसीबीच्या जाळ्यात अडकले. कौटुंबिक तक्रारीची माहिती राज्य राखीव दलाचे समादेशक यांना न देण्यासाठी बऱ्हाटे यांनी हे पैसे मागितले होते. ते सध्या हर्सूल कारागृहात न्यायालयीन कोठडीत आहेत.


१३ नोव्हेंबर : पोलिस नाईकास अटक
पोलिस ठाण्याच्या हद्दीतून जाणाऱ्या वाळूच्या गाडीवर कारवाई न करण्यासाठी साडेतीन हजार रुपयांची लाच मागून त्यापैकी अडीच हजार रुपये स्वीकारणाऱ्या पोलिस नाईक सुनील नारायणराव जहागीरदार (४८, श्रीपाद कॉलनी, जटवाडा रोड) यांना लाचलुचत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ अटक केली. बुधवारी होनाजीनगर येथील एका वॉशिंग सेंटरवर पैसे स्वीकारताना हा ट्रॅप झाला.

 

 

 

वरिष्ठ अधिकाऱ्यांचे प्रयत्न
एकीकडे पोलिस म्हणजे  ब्रिटिश काळातील पोलिसांप्रमाणे दडपशाही करणारा कोतवाल, ठाणेदार नसून तो सामान्य माणसाचा मित्र अाहे, अशी ओळख पोलिस खात्याला देण्याचा प्रयत्न वरिष्ठ पोलिस अधिकारी करीत अाहेत. त्याच वेळी सामान्य माणसाला मात्र पोलिस ठाण्याची पायरी चढणे म्हणजे प्रत्येक पायरीवर चिरीमिरी देणे, धाक-दडपशाहीचा अनुभव येत आहे.
भ्रष्टाचार संपवणार कोण ? 


बेडर, धाडसी आणि दुष्टांचा कर्दनकाळ अशी पोलिस खात्याची प्रतिमा उजळवणाऱ्या ‘सिंघम’ चित्रपटाने पाच वर्षांपूर्वी धूम केली होती.  या सिंघमपासून  पोलिसांना प्रेरणा मिळावी म्हणून या चित्रपटाचे खास शो सर्व जिल्ह्यांमध्ये आयोजित करण्यात आले होते.मात्र गेल्या पाच दिवसांतील लाचखोरीच्या घटना पाहता नागरिकांनी सीपींवर विश्वास ठेवायचा की वस्तुस्थितीवर? असा प्रश्न उपस्थित होत आहे. 

भावाविरुद्ध कारवाई न करण्यासाठी पैसे मागितले
शुक्रवारी दुपारी वेदांतनगर पोलिस ठाण्यातील शिपाई योगेश पंडित सूर्यवंशी हा हजार रुपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात अडकला. या प्रकरणातील तक्रारदार हा खासगी ठेकेदार आहे. तक्रारदाराची पत्नी व भाऊ यांच्या विरोधात वेदांतनगर पोलिस ठाण्यात कलम  ३२४ प्रमाणे मारहाणीचा गुन्हा दाखल आहे. यातील तकारदारच्या पत्नीस अटक करून जामिनावर सोडण्यात आले. मात्र भाऊ तडीपार असल्याने त्याला अटक करण्यात आली नाही.

जनसामान्यांच्या मनात पोलिसांची भीती आहे. त्यामुळे ऐवज चोरट्यांनी पळवला तरी ते तक्रार देत नाहीत, अशा शब्दांत शुक्रवारी काही फिर्यादींनी भावना मांडल्या. पोलिस आयुक्तालयात झालेल्या मुद्देमाल परतीच्या कार्यक्रमात फिर्यादींचे हे मत ऐकून पोलिस आयुक्त चिरंजीव प्रसाद यांनी त्यांना आश्वस्त केले. ते म्हणाले, आजचे पोलिस म्हणजे स्वातंत्र्यपूर्वकालीन ‘फोर्स’ नव्हेत. आज ती सेवा देणारी यंत्रणा आहे. त्यामुळे बिनदिक्कत संवाद साधा, भीती बाळगू नका.

 

काही तक्रार असल्यास आयुक्तालयाच्या 

व्हॉट्सअॅप क्रमांकावर किंवा ईमेलवर संपर्क साधा, असेही त्यांनी सांगितले.   
 चोरीच्या प्रकरणाचा तपासपूर्ण होऊन त्यातील मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला तरी अनेक वर्षे तो पडून होता. अशा प्रकरणांतील ५५ फिर्यादींचा १० लाख ९८ हजार ३४१ रुपयांचा ऐवज शुक्रवारी या कार्यक्रमात परत देण्यात आला. या उपक्रमात शहरातील ९ पोलिस ठाण्यांनी सहभाग नोंदवला. या वेळी पोलिस आयुक्त चिरंजीव प्रसाद, उपायुक्त निकेश खाटमोडे, डॉ. राहुल खाडे, गुन्हे शाखेचे सहायक पोलिस आयुक्त डॉ. नागनाथ कोडे यांची प्रमुख उपस्थिती होती.

 

अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेले मुद्देमाल सोडवण्यासाठी पोलिस ठाण्यातील कर्मचाऱ्यांनी पुढाकार घेतला. प्रत्येक पोलिस ठाण्यातील  निरीक्षक, बीट अंमलदार आणि मोहरील यांनी फिर्यादींचा शोध घेऊन हा मुद्देमाल परत केला. पोलिस निरीक्षक निर्मला परदेशी, दादाराव शिनगारे, अनिल गायकवाड, अनिल आढे, श्यामसुंदर वसुरकर, नाथा जाधव, राहुल खटावकर, शरद इंगळे,  ज्ञानेश्वर साबळे,  श्रीपाद परोपकारी यांच्यासह प्रत्येक पोलिस ठाण्यातील कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.    


आरोपींपेक्षा फिर्यादींचा शोध घेणे कठीण : आरोपींपेक्षा फिर्यादींना शोधणे जास्त कठीण गेल्याचा अनुभव काही पोलिसांना आला. फिर्यादीने घर बदलले असेल, गाव सोडले असेल तर अडचणी येतात. चोरीला गेलेला ऐवज क्षुल्लक असेल तर बराच काळ चालणाऱ्या न्यायालयीन प्रक्रियेमुळे फिर्यादी येण्यास टाळतात. त्यामुळे न्यायालयीन प्रक्रियेत पोलिस फिर्यादींना मार्गदर्शन करतील, असे या वेळी सांगण्यात आले. 


सन १९९६ मध्ये सिडकोत घरफोडी झाली. त्यात विष्णू केशवराव देशमुख यांच्या दोन हजार ७७८ रुपयांच्या चांदीच्या वस्तू चोरीला गेल्या. २०१४ मध्ये या प्रकरणाचा तपास पूर्ण झाला. तेव्हापासून हा ऐवज पोलिस ठाण्यात जमा होता. देशमुख हे पुण्यात राहत असल्याने त्यांच्या वतीने त्यांच्या मित्राने हा ऐवज स्वीकारला.   

 

विविध प्रकरणांतील २६४ फिर्यादींचा ऐवज पडून    
शहरात १७ पोलिस ठाण्यांत २६४ फिर्यादींचा ऐवज पडून आहे. परिमंडळ १ मध्ये ९६, तर परिमंडळ दोनमधील पोलिस ठाण्यांत १६८ फिर्यादींचा ऐवज परत करणे बाकी आहे. पोलिस अायुक्तालयात सध्या १४४१ गुन्हे  प्रलंबित आहेत. २३९ प्रकरणांचा तपास पूर्ण, तर २० गुन्ह्यांत शिक्षा झाली आहे. एका गुन्ह्यात तडजोड, तर ४ गुन्हे डिसमिस करण्यात आले आहेत.   

 

आजचे पोलिस ‘फोर्स’ नव्हेत  
स्वातंत्र्यापूर्वी या यंत्रणेचा फोर्स म्हणून वापर होत होता, तो विचार डोक्यातून काढून टाका. बिनदिक्कतपणे तक्रार करा, असा सल्ला देतानाच पोलिस यंत्रणा अधिकाधिक लोकाभिमुख करण्याचा प्रयत्न शासन पातळीवर सुरू आहेत, अशी माहितीही पोलिस आयुक्तांनी दिली. दरम्यान, पोलिस रायझिंग डेच्या निमित्ताने जानेवारीतही ऐवज परत करण्याचा कार्यक्रम घेतला जाईल. दोन महिन्यांत दोनदा असा कार्यक्रम घेतला आहे, असे सहायक आयुक्त कोडे यांनी सांगितले.

 

ऐवज परत करण्यात सिडको ठाणे प्रथम, क्रांती चौक दुसऱ्या स्थानी 

सिडको पोलिसांनी १४ फिर्यादींना मुद्देमाल परत केला, तर क्रांती चौक पोलिसांनी १३ फिर्यादींना चोरीचा ऐवज परत दिला. ठाणेनिहाय आकडेवारी पुढीलप्रमाणे  


- सिडको : १४ फिर्यादी; २ लाख १९ हजार २३० रुपये.   
- क्रांती चौक : १३ फिर्यादी; १ लाख २० हजार रुपये.  
- एमवाळूज : ७ फिर्यादी, २ लाख रुपये  
- वेदांतनगर : ४ फिर्यादी; २.४४ लाख रुपये.  
- मुकुंदवाडी : ४ फिर्यादी; २ लाख रुपये.  
- सिटी चौक :  २ फिर्यादी; २१,५००  रुपये    
- जवाहरनगर : ६  फिर्यादी    
- एमसिडको : १ फिर्यादी; ४० हजार    
- या वेळी ५५४ ग्रॅमचे सोने-चांदीचे दागिने, २५ दुचाकी, ९ मोबाइल, टॅब,  लॅपटॉप  आणि रोख ५६ हजार ४४५ रुपये परत करण्यात आले.   

बातम्या आणखी आहेत...