आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अमेरिकेने पाकची 11,816 कोटी रुपयांची संरक्षण मदत रोखली: इम्रान सरकारची अडचण

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

वॉशिंग्टन -  अमेरिकेने पाकिस्तानची संरक्षणासाठीची ११ हजार ८१६ कोटी रुपयांची मदत रोखली आहे. त्यामुळे इम्रान खान सरकारच्या अडचणीत वाढच होणार आहे. राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशानुसार हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती पेंटागॉनने दिली. त्यातून अमेरिकेला आलेले नैराश्य दिसून येते, असे तज्ज्ञांनी म्हटले आहे.   


अल-कायदाचा म्होरक्या आेसामा बिन लादेन अबोटाबादमध्ये दडून बसला होता. त्याची माहिती जाणूनबुजून दिली गेली नव्हती. त्यावरून राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी पाकिस्तान मूर्ख असल्याचे म्हटले होते. त्यावरून दोन्ही देशांत ट्विटरवरून आरोप-प्रत्यारोपही झाले. त्या पार्श्वभूमीवर पेंटागॉनने बुधवारी ही माहिती दिली. अमेरिकेने पाकिस्तानला संरक्षणासाठी देऊ केलेली ११ हजार ८२३ कोटी रुपयांची मदत रद्द केली, असे संरक्षण विभागाचे प्रवक्ते कर्नल रॉब मॅनिंग यांनी सांगितले. पत्रकारांना ई-मेलवरून दिलेल्या उत्तरात ही माहिती जाहीर करण्यात आली.   खरे तर अमेरिकेने पाकिस्तानशी असलेले संबंध तोडण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत.त्यामुळेच लष्करी पातळीवरील मदत बंद करण्याचा निर्णय अमेरिकेने जानेवारीतच घेतला. त्यानंतर आता संरक्षणाचा निधी देण्याचे रद्द केले आहे. 

 

अमेरिकेसाठी पाकने काहीही केले नाही, मदत देण्याची गरज नाही : ट्रम्प  

पाकिस्तानच्या अंतर्गत पातळीवर दहशतवादाला प्रोत्साहन दिले जात आहे. दहशतवाद्यांसाठी हा देश स्वर्ग ठरला आहे. पाकिस्तान दहशतवादाच्या विरोधात काही ठोस कृती करत नाही तोपर्यंत मदत देण्याची गरज नाही. तसेही पाकने अमेरिकेसाठी काहीही केलेले नाही अशा शब्दांत ट्रम्प यांनी नाराजी व्यक्त केली.   

 

 

पाकिस्तानची बोलाची कढी..अाणि अमेरिकेची नाराजी   

दहशतवादाला पाकिस्तानच्या भूमीवर प्रोत्साहन दिले जाऊ नये, असे अमेरिकेने वारंवार बजावले होते. पाकिस्तानने अशी कृती होणार नाही, दहशतवादाच्या विरोधातील लढाईत सहकार्य करू, असे आश्वासन दिले गेले. मात्र त्यावर पाकिस्तानने प्रत्यक्षात प्रभावी कारवाई मात्र केली नाही. त्यातून ट्रम्प नाराज झाले.पाकिस्तानने तालिबानच्या विरोधात तातडीने काही पावले उचलली असती तर अफगाणिस्तानात आतापर्यंत शांतता प्रस्थापित झाली असती, असे सेडनी यांनी सांगितले.या गोष्टी अमेरिकेच्या पाकिस्तान संबंधाविषयी आलेल्या नैराश्याला दर्शवणाऱ्या आहेत, असे मत उपसंरक्षणमंत्री डेव्हिड सेडनी यांनी व्यक्त केले आहे.    

 

डोनाल्ड ट्रम्प यांनी मुलगी इव्हांका व जावयाची केली पाठराखण

राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची मुलगी व सल्लागार इव्हांका ट्रम्प सरकारी कामकाजात खासगी इ-मेलचा वापर केल्यावरून वादात सापडल्या आहेत. त्यावरून टीका होत असतानाच ट्रम्प यांनी इव्हांका यांचा बचाव केला. मुलीने कोणताही मेल हटवलेला नाही. त्यात कोणतीही गोपनीय माहिती नव्हती. ते बुधवारी पत्रकारांशी बोलत होते. माजी मंत्री व २०१६ मधील राष्ट्राध्यक्ष निवडणुकीतील प्रतिस्पर्धी हिलरी क्लिंटन यांनी ३३ हजार इ-मेल डिलिट केले होते. अमेरिकी प्रतिनिधी सभेचे खासदार इव्हांका यांच्या प्रकरणात तपास करण्याचा विचार करत आहेत. यासंबंधीची माहिती व्हाइट हाऊसला देण्याची विनंती रिपब्लिकन खासदार ट्रे गेवडी यांनी पत्राद्वारे केली आहे. इव्हांका यांचे प्रकरण हिलरी क्लिंटन यांच्यासारखेच आहे. 

बातम्या आणखी आहेत...