Home | Maharashtra | Marathwada | Other Marathwada | The vanchit and the MIM will remain with the legislature

विधानसभेतही वंचित व एमआयएम सोबतच राहणार; काँग्रेसच्या अपप्रचारामुळे मुस्लिम समाज वंचितपासून दूर, प्रा. यशपाल भिंगे यांचा दावा

प्रतिनिधी, | Update - Jun 07, 2019, 09:15 AM IST

एमआयएमच्या माध्यमातून जरी मुस्लिम मते वंचितकडे वळली नाही तरी आघाडी तुटणार नाही

 • The vanchit and the MIM will remain with the legislature

  नांदेड - लोकसभा निवडणुकीत मुस्लिम मतदार वंचित बहुजन आघाडीकडे वळला नाही. खुद्द अॅड. प्रकाश आंबेडकरांनीही ही बाब मान्य केली आहे. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत वंचित आघाडीसोबत एमआयएम राहील की नाही अशी चर्चा राजकीय गोटात सुरू झाली. तथापि, काँग्रेसच्या अपप्रचारामुळे मुस्लिम समाज वंचित बहुजन आघाडीपासून दूर राहिला, असा दावा लाेकसभेतील पराभूत उमेदवार प्रा. यशपाल भिंगे यांनी केला. आगामी विधानसभा निवडणुकीतही वंचित बहुजन अाघाडी अाणि एमअायएम साेबत राहील, असेही त्यांनी स्पष्ट केले.


  लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर अॅड. प्रकाश आंबेडकरांनी वंचित बहुजन आघाडीची मोट बांधून त्यात एमआयएमला सोबत घेतले. दलित, वंचित घटक आणि मुस्लिम मतांच्या जोरावर आघाडीचे अनेक उमेदवार विजयी होतील, अशी त्यांना अपेक्षा होती. तथापि एमआयएमचे इम्तियाज जलील यांचा अपवाद वगळता राज्यात आघाडीला यश मिळाले नाही. स्वत: आंबेडकरही अकोला, सोलापुरातून पराभूत झाले. त्याची कारणे शोधताना मुस्लिम मतदार वंचित आघाडीकडे वळला नाही, असे निदर्शनाला आले.

  मुस्लिम मतदार काँग्रेसकडे गेला
  वंचित बहुजन आघाडीत एमआयएम असतानाही मुस्लीम मतदार काँग्रेसकडे गेला. याबाबत वंचित आघाडीचे उमेदवार राहिलेले प्रा. डाॅ. यशपाल भिंगे यांनी दिलेल्या माहितीनुसार, नरेंद्र मोदी सत्तेतून दूर गेले पाहिजे अशी मानसिकता मुस्लिम समाजाची होती. काँग्रेसतर्फे संपूर्ण राज्यात वंचित आघाडी ही भाजपची बी टीम आहे असा प्रचार करण्यात आला. वस्तुस्थिती तशी नव्हती. समाजातील एक मोठा वर्ग सत्तेच्या प्रवाहापासून दूर आहे. त्याला सत्तेत सहभागी करून घेतले पाहिजे या विचाराने एमआयएमशी आघाडी करण्यात आली. परंतु काँग्रेसच्या प्रचारामुळे तो समाज वंचितकडे आला नाही. मोदींना सत्तेतून घालवण्यासाठी त्यांना केवळ काँग्रेस हाच पर्याय वाटला. वंचित आघाडी नवीन होती. त्यामुळे त्यांनी वंचितचा पर्याय स्वीकारला नाही. शिवाय एमआयएमकडे मुस्लिम समाजाचा ओढा पाच सात टक्क्यांपेक्षा अधिक नव्हता. त्यामुळे हा समाज वंचित आघाडीकडे येऊ शकला नाही.

  विधानसभेत चित्र वेगळे राहील
  एमआयएमच्या माध्यमातून जरी मुस्लिम मते वंचितकडे वळली नाही तरी आघाडी तुटणार नाही. विधानसभेत ही आघाडी कायम राहील. प्रा. भिंगे यांनी दिलेल्या माहितीनुसार, औरंगाबादला इम्तियाज जलील विजयी झाल्यानंतर आता मुस्लिम समाजालाही वंचित आघाडी विजयी होऊ शकते अशी खात्री पटली आहे. लोकसभा निकालानंतर मुस्लिम समाज पश्चात्तापदग्ध अवस्थेत आहे. वंचित आघाडी मुस्लिम समाजाला एक वंचित घटक म्हणूनच मानते. धर्माच्या दृष्टीकोणातून पाहत नाही. मुस्लिम समाजही सत्तेत आला पाहिजे ही वंचित आघाडीची भूमिका आहे. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत वंचितसोबत एमआयएम राहणार आहेच. परंतु मुस्लिम समाजालाही वंचित आघाडी मोदींना पर्याय ठरू शकते हे लोकसभेत दिसलेल्या शक्तीवरुन खात्री पटल्याने तोही समाज विधानसभेत वंचितसोबत राहील असेही प्रा. भिंगे म्हणाले.

Trending