आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दुर्दैवी अपघातांचे दुष्टचक्र

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक जिल्ह्याच्या देवळा तालुक्यातील एसटी बस आणि अॅपेरिक्षाचा भीषण अपघात दुर्दैवी तर खराच; पण त्याहूनही तो आपल्या एकूणच व्यवस्थेवर मोठे प्रश्नचिन्ह लावणारा आहे. अपघातातील मृतांची संख्या २६ वर पोहोचली आहे. असे गंभीर अपघात घडले की अगोदर शोक-श्रद्धांजली, सरकारी पातळीवरून मदतीच्या घोषणा, सर्वसामान्यांच्या संतप्त प्रतिक्रिया आणि वाद, चर्चा असा घटनाक्रम ठरलेला असतो. हा अपघातही त्याला अपवाद नाही. थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींपासून अनेकांनी शोक व्यक्त केला आहे. अशा सहवेदना संबंंधित कुटुंबीयांसाठी दिलासादायक निश्चितच असतात. त्यामुळे या भावनांसोबतच मदतीचा हात पुढे करणे जेवढे महत्त्वाचे तेवढेच किंबहुना त्याहूनही अधिक महत्त्वाचे आहे भविष्यात अशा घटना टाळण्यासाठीच्या दीर्घकालीन उपायांची अंमलबजावणी करणे. बुधवारी भरदुपारच्या सुमारास जिथे हा विचित्र आणि भयंकर अपघात झाला तो रस्ता काही महामार्ग वा तत्सम मोठा रस्ता नाही. ग्रामीण भागातील उंच-सखल असा परिसर आहे. अशा ठिकाणी एवढा भीषण अपघात होत असेल तर त्यामागची कारणे अधिक गांभीर्याने तपासावी लागतील. प्राथमिक तपासात हाती आलेल्या माहितीनुसार अतिवेगामुळे वळणावर एसटी बसचालकाचे नियंत्रण सुटले आणि नेमके त्याच वेळी समोरून येणाऱ्या अॅपेवर धडकून तिने रिक्षाला जवळपास ५० फूट फरफटत नेले आणि ही दोन्ही वाहने तेथील विहिरीचा कठडा तोडून थेट आत कोसळली. विहीर जवळपास अर्धी भरलेली असल्याने वरून अपघाताचा दणका आणि खाली पाण्याचा धोका अशा स्थितीत २६ जणांचा करुण अंत झाला. त्यानंतर अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी, पाठोपाठ नेतेमंडळींची धावाधाव सुरू झाली. बुधवारी नाशिकचे पालकमंत्री छगन भुजबळ, परिवहनमंत्री अनिल परब, कृषिमंत्री दादा भुसे, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर आदींनी अपघातग्रस्तांच्या भेटी घेतल्या. शासनातर्फे मृतांच्या वारसांना दहा लाख तर गंभीर जखमींना पाच लाखांची तातडीची मदत जाहीर करण्यात आली. ते आवश्यकच. पण, केवळ मदत दिली म्हणजे कर्तव्य संपले असे होता कामा नये. या अपघाताची भीषणता अधिक असल्याने त्याची दखल तातडीने घेतली गेली. पण, इतरत्र दररोज होणाऱ्या लहानमोठ्या अपघातांचे काय? रस्ता प्रवास म्हटल्यावर अपघात पूर्णपणे टळणार नाहीत ही वस्तुस्थिती असली तरी त्याच्या प्रमाणावर नक्कीच आळा घालता येऊ शकतो. त्यासाठी सर्वाधिक गरज आहे ती वाहतूक शिस्तीची. बेशिस्त आणि बेदरकार वाहतुकीमुळे आपल्याकडे सर्वाधिक अपघात होतात. त्यामुळे पोलिस आणि आरटीओच्या यंत्रणेने अधिक सजग राहून वाहतूक नियमांची काटेकोर अंमलबजावणी, वेगावर नियंत्रण याकडे प्राधान्याने लक्ष पुरवायला हवे. शिवाय, लोकांनीही वाहतूक शिस्त अंगी बाणवणे नितांत आवश्यक आहे. दोन्ही बाजूंनी एवढे जरी झाले तरी अपघातांची संख्या लक्षणीय घटेल, वारंवार अशी हळहळ व्यक्त करण्याची वेळ येणार नाही.

बातम्या आणखी आहेत...