परभणी / नवदांपत्यांनी घडवले सामाजिक बांधिलकीचे दर्शन, आहेराची रक्कम गरजूच्या शिक्षणासाठी दिली

एकूण २७ हजार रुपयाची रोख मदत या दोन्ही कुटुंबियांनी संबंंधित विद्यार्थ्यांस सुपूर्द केली

प्रतिनिधी

Jul 15,2019 08:07:00 AM IST

परभणी - लग्नसोहळ्यात आहेर स्वरूपात मिळालेली २७ हजार रुपयांची रोख रक्कम नवदांम्पत्यासह दोघा व्याह्यांनी गरजू व गुणवंत विद्यार्थ्यांना सुपूर्द करीत सामाजिक बांधिलकीचे दर्शन घडवले. त्यामुळे आयआयटी वाराणसी प्रवेशास पात्र ठरलेल्या सतीश जोजारे याच्या प्रवेशातील आर्थिक अडसर थोड्या प्रमाणात दूर होण्यास मदत होणार आहे.


सतीश जोजारे या ऑटोरिक्षा चालकाच्या मुलाने कौटुंबिक बिकट स्थितीतही प्रचंड मेहनत, नियोजनपूर्व अभ्यास करीत जेईईपाठोपाठ मेन्स परीक्षेत उत्तुंग असे यश पटकावून आयआयटीपर्यंत झेप मारली. परंतु प्रवेशापासून पुढील पाच वर्षांचा शिक्षणाचा खर्च करावा तरी कसा, असा यक्ष प्रश्‍न सतीशसह त्याच्या पालकांसमोर उभा राहिला आहे. समाजमाध्यमातून याबाबतची माहिती समोर आल्यानंतर सतीशच्या शिक्षणासाठी नागरिकांनी हळूहळू प्रतिसाद द्यावयास सुरूवात केली आहे. घरमालकासह शेजाऱ्यांनी सर्वप्रथम मदतीचा हात पुढे केला. विशेष बाब म्हणजे एका विवाह सोहळ्यात नवदांम्पत्यासह दोघा व्याह्यांनी आहेर स्वरूपातील प्राप्त रक्कम थेट गुणवंतास बहाल करीत सामाजिक बांधिलकी दाखवून दिली.


मुंबईतील वरिष्ठ अधिकारी शिवाजी पहिनकर, श्री ज्वेलर्सचे संस्थापक दिपक टाक यांनी सर्वप्रथम स्वतःच मदतीचा हात पुढे केला. पहिनकर व टाक यांनी प्रत्येकी पाच हजार रुपये जमा केले. पाठोपाठ बाल विद्या मंदिरच्या १९८२ च्या बॅचनेही पैसे गोळा केले. एकूण २७ हजार रुपयाची रोख मदत या दोन्ही कुटुंबियांनी संबंंधित विद्यार्थ्यांस सुपूर्द केली.


यावेळी भगवान खैराजानी, विवेक वट्टमवार, सुहास वट्टमवार, विनोद डावरे, दिपक पाठक, व्यंकटेश कुरूंदकर, संतोष चिक्षे, किरण अंबेकर, रवी नांदापूरकर, दिपक पाचपोर, दिपक मुलगीर, सुरेश जपे, रवि करंवदे, श्रीकांत देशपांडे आदी उपस्थित होते.

X
COMMENT