आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • The 'whistles' Of The Existing Agriculture Ministers Have Made The Former Agricultural Ministers Irritate

विद्यमान कृषिमंत्र्यांच्या ‘शिट्यां’नी माजी कृषिमंत्र्यांना केले बेजार

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

प्रेमदास वाडकर 

अमरावती - भाजपचे नेते तथा विद्यमान कृषिमंत्री डॉ. अनिल बोंडे यांच्या शिट्यांनी माजी कृषिमंत्री राहिलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते हर्षवर्धन देशमुख यांना निवडणूक प्रचारादरम्यान चांगलेच बेजार केले होते. २००९ च्या निवडणुकीत अपक्ष उमेदवार असलेले डॉ. अनिल बोंडे यांचे चिन्ह शिटी हाेते.  प्रतिस्पर्धी उमेदवार हर्षवर्धन देशमुख यांच्यासह विरोधकांच्या प्रचारसभेत लोकांकडून शिट्या वाजवल्या जात होता. त्यामुळे अन्य उमेदवारांच्या सभेतदेखील शिटीचाच बोलबाला दिसून येत होता.

वरूड-मोर्शी मतदारसंघावर पूर्वी हर्षवर्धन देशमुख आणि नरेशचंद्र ठाकरे यांचाच दबदबा होता. देशमुख आणि ठाकरे यांनी यापूर्वी या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले आहे. काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीच्या सरकारमध्ये हर्षवर्धन देशमुख हे कृषिमंत्री हाेते. त्यानंतर झालेल्या निवडणुकीत काँग्रेसचे नरेशचंद्र ठाकरे यांनी त्यांचा पराभव केला होता. शिवाय हर्षवर्धन देशमुख विदर्भ वैधानिक विकास महामंडळाचे उपाध्यक्ष म्हणून जबाबदारी सांभाळली आहेे. मात्र, २००९ च्या विधानसभा निवडणुकीत अपक्ष म्हणून उभे राहिलेले डॉ. अनिल बोंडे यांनी देशमुख-ठाकरे यांच्या गडाला सुरुंग लावला. २००९ मध्ये काँग्रेस-राष्ट्रवादीने आघाडीतून, तर भाजप व शिवसेनेने युती करीत निवडणूक लढवली. त्या वेळेस डॉ. बोंडे हे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख म्हणून कार्यरत होते. हा मतदारसंघ भाजपला सुटल्याने तिवसाचे तत्कालीन आमदार प्रा. साहेबराव तट्टे यांना युतीने उमेदवारी दिली. मात्र डॉ. अनिल बोंडे यांनी बंडखाेरी करत अपक्ष म्हणून उडी घेतली. आघाडीत ही जागा राष्ट्रवादीला सुटल्याने काँग्रेसचे नरेशचंद्र ठाकरे हेदेखील नाराज हाेते. त्यांनीही अपक्ष उमेदवारी दाखल केली. युती, आघाडीला अपक्ष डॉ. बोंडे यांची शिटी भारी पडली. 

विराेधक शिट्यांनी हैराण
या निवडणुकीत सर्वसामान्य जनता बाेंडेसाेबत असल्याचे दिसले. आघाडी, युतीच्या सभेला गर्दी खूप जमायची, मात्र तिथे बाेंडेचे समर्थक, त्यांना मानणारे लाेक  “शिट्या’ वाजवून सभा उधळून लावायचे. एकदा वरूडच्या चौकात भरदुपारी हर्षवर्धन देशमुख यांची सभा हाेती. राष्ट्रवादीचे नेतेदेखील आले होते. मात्र, सभेत प्रमुख वक्ते बोलायला उभे राहिले की प्रेक्षकांमधून मोठमोठ्याने शिट्यांचा आवाज येत होता. अन्य ठिकाणच्या सभांमध्येही “शिट्यांनी’ हर्षवर्धन देशमुख, नरेशचंद्र ठाकरे, प्रा. साहेबराव तट्टे यांना चांगलेच त्रस्त केले हाेते. या निवडणुकीत ४३ हजार मते मिळवत  डॉ. अनिल बोंडे प्रथमच विधानसभेत पोहोचले. नरेशचंद्र ठाकरे यांना ३७,८७०, हर्षवर्धन देशमुख यांना ३७,७४८ मते मिळाली, तर भाजपचे प्रा. साहेबराव तट्टे यांना १५,२७६ मतांवर समाधान मानावे लागले होते. त्यानंतर डाॅ. बाेंडे यांनी भाजपत प्रवेश करून पुन्हा आमदारकी मिळवली व आता ते कृषिमंत्री म्हणून विराजमान झाले आहेत.