आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

प्रासंगिक : सारा समाज बधिर झालाय... 

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

संवेदनशीलता आणि सहअनुभूती यांच्याशी राजकारणी आणि पोलिस यांचा संबंध असतो की नाही, असा प्रश्न पडावा असे प्रसंग अधूनमधून घडत असतात. ते अपवादात्मक असले तरी त्यामुळे या दोन्ही क्षेत्रांविषयी समाजमनावर नकारात्मक ओरखडे ओढले जातात आणि त्यातून ते क्षेत्रच बदनाम होत राहते. औरंगाबाद जिल्ह्यातल्या सोयगाव तालुक्यातील जरंडी नावाच्या गावात जे काही घडते आहे तेही असेच राजकारणी आणि पोलिस यांच्या प्रतिमेवर काळा डाग पाडणारे ठरू शकते, नव्हे ठरते आहे. त्याची चिंता मात्र त्याच क्षेत्रातल्या अन्य मंडळींनाही दिसत नाही. त्यामुळे जे घडते आहे ते पाहत आणि वाचत राहण्याच्या मानसिकतेत सारे गेले आहेत. 


आर्थिकदृष्ट्या फारशी प्रगती साधता न आलेले हे गाव आहे. इथल्या जिल्हा परिषदेच्या एका शाळेत मुख्याध्यापक म्हणून ४८ वर्षे वयाच्या एच. आर. काटोले नामक शिक्षकाची जून २०१८ ला नियुक्ती झाली आहे. या नियुक्तीपासून हा माणूस इयत्ता सहावी ते आठवीच्या वर्गात शिकणाऱ्या मुलींशी गैरवर्तन करीत होता, ही बाब त्या मुलींनीच आता उघड केली आहे. या माणसाने गेले नऊ महिने कसा कसा त्रास दिला आणि किती गलिच्छ वर्तन केले हे 'दिव्य मराठी'च्या महिला प्रतिनिधींनी त्या मुलींशी प्रत्यक्ष बोलून जाणून घेतले. हा सर्व प्रकार अत्यंत संतापजनक आहे, एवढेच त्या सांगू आणि लिहू शकतात, अशी परिस्थिती आहे. या मुलींनी हा प्रकार शाळेतल्या शिक्षिकांना सांगितल्यानंतर प्रकरण शालेय समितीपर्यंत नेण्यात आले. या समितीने मुख्याध्यापकाला मुलींच्या वर्गाकडे न फिरकण्याच्या अटीवर हे प्रकरण 'मिटवून' टाकले. पण मुलींच्या पालकांना हा प्रकार समजल्यानंतर प्रकरण पोलिस ठाण्यापर्यंत गेले. इतकी गंभीर तक्रार आल्यानंतर या प्रकरणात गुन्हा नोंदवण्याऐवजी पोलिसांनी पालकांनाच पुढे मुलींना कसा त्रास होऊ शकतो, त्यांची बदनामी होऊन लग्नाला अडचणी येऊ शकतात असे समजावून सांगितले. त्यामुळे तक्रार मागे घेण्यात आली. 


'दिव्य मराठी' ने हे प्रकरण लावून धरल्यानंतर महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर, बाल हक्क आयोगाचे प्रमुख प्रवीण घुगे यांनी लक्ष घातले. मग पोलिसांनी त्या मुलींच्या पालकांनाच 'ही माहिती पोलिसांना का सांगितली नाही?' अशी विचारणा करणाऱ्या नोटिसा दिल्या आहेत. पोलिसांचा हा उलटा कारभार का सुरू आहे, याची माहिती घेतली तेव्हा यातले राजकीय संबंध समोर आले आहेत. संशयित आरोपीच्या पत्नीने जिल्हा परिषदेची मागची निवडणूक भाजपतर्फे लढवली होती. सोयगावच्या नगराध्यक्षा (शिवसेना) त्याच्या जवळच्या नातलग आहेत. शिवाय पालकांनी पोलिस ठाणे गाठताच हा मुख्याध्यापक थेट शेजारच्या जिल्ह्यात खासदाराकडेच आश्रयाला गेला होता, अशीही माहिती समोर आली आहे. 


या प्रकरणात राजकारण्यांनी हस्तक्षेप केला का? पोलिसांवर दडपण आणले गेले की त्यांनीच हे प्रकरण दडपण्याचा निर्णय घेतला हे अजून स्पष्ट झालेले नाही. पण गेला आठवडाभर हे प्रकरण गाजत असतानाही ना भाजपचे नेते याबाबतीत काही बोलत आहेत, ना शिवसेनेचे. याचा अर्थ काय होतो हे वेगळे सांगायची गरज नाही. हा मुख्याध्यापक सोयगावचा राहणारा आहे. म्हणजे जिथे त्याची नियुक्ती आहे ते गाव अवघ्या १० मिनिटांच्या अंतरावर आहे. इतकी सोय उगाचच कोणाची होत नाही. भाजप, शिवसेना हे तर सत्ताधारी पक्ष आहेत. विरोधी पक्षाचे नेतेही याबाबतीत काही बोलायला तयार नाहीत. जे काही घडते आहे त्यांच्याशी आमचा काय संबंध? त्या मुली काय आमच्या घरातल्या आहेत का? असाच विचार ही राजकारणी मंडळी करीत असावीत, असे दिसते. स्वार्थी राजकारण माणसाला किती संवेदनाहीन बनवते याचे यापेक्षा ज्वलंत उदाहरण कोणते असू शकेल? 


दिल्लीत निर्भया प्रकरण घडले आणि तेव्हाचे विरोधी पक्ष सरकारवर तुटून पडले होते. त्यानंतर सरकारनेही कायद्यात बदल करून ते आणखी कठोर करण्याचा प्रयत्न केला. सर्वांनीच त्या बदलाचे स्वागत केले. पण कायद्याची अंमलबजावणी झाली तर त्या कायद्याचा उपयोग आहे. कायद्याचा वापरच केला जाणार नसेल तर तो किती कठोर आहे, याने काही फरकच पडत नाही, हे जरंडीतील या लाजिरवाण्या प्रकरणाने दाखवून दिले आहे. आपण शिक्षक आहोत, नव्हे मुख्य अध्यापक आहोत याचेही भान या माणसाला राहिले नाही. 


आपल्या मुलींपेक्षाही लहान वयाच्या मुलींशी तो गैरवर्तन करीत राहिला. ही तर विकृती आहेच, पण त्याच्या या कृत्याकडे दुर्लक्ष करायला सांगणे आणि त्याला पाठीशी घालणे ही आणखी मोठी विकृती आहे. पोलिस आणि राजकारणी यांनी त्याच विकृतीचे दर्शन घडवले आहे. दुर्दैव असे की त्यानंतरही सारे कसे शांत शांत आहे. सारा समाजच जणू बधिर झाला आहे. 
 

बातम्या आणखी आहेत...