आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जालना रोडचे रुंदीकरण ४३० वरून १०४ कोटींवर आणले, तरी ४२५० कोटी खर्चून स्कायबसची घोषणा

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी घोषणा केलेली वाळूज ते औरंगाबाद स्कायबस सेवा औरंगाबादकरांसाठी दिवास्वप्नच ठरण्याची शक्यता आहे. या बससाठी थोडाफार नव्हे, तर किमान ४२५० काेटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. मात्र, गडकरींनीच जालना रोडच्या रुंदीकरणाचे बजेट ४३० कोटी रुपयांवरून १०४ काेटींवर आणले. एकीकडे शहराची रक्तवाहिनी असलेल्या रस्त्याच्या कामात चारपट कपात केल्यावर स्कायबससाठी त्यापेक्षा दहापट निधी आणणार कोठून, असा प्रश्न उपस्थित होत आहे. लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेचाही या प्रकल्पाला फटका बसण्याची शक्यता आहे. 


दोन आठवड्यांपूर्वी औरंगाबादेत आलेल्या गडकरींनी जालना ते वाळूज रस्त्यावर स्कायबस सुरू करण्याची घोषणा केली. देशातील अशा प्रकारचा हा पहिलाच प्रकल्प औरंगाबादकरांच्या वाट्याला येणार असल्याचे स्वप्न त्यांनी दाखवले. मात्र, स्कायबसची घोषणा केवळ प्रकल्पाची चाचपणी असल्याने सूत्रांचे म्हणणे आहे. दिल्ली मेट्रो प्रकल्पात कामाचा अनुभव असलेल्या एका अभियंत्याच्या म्हणण्यानुसार मेट्रोचे एक किलोमीटरचे जाळे टाकण्यास ३५० कोटी रुपये लागतात, तर स्कायबससाठी अवघा ५० कोटी रुपये खर्च येतो. गडकरींनी तर जालना ते वाळूज अशा ८५ किलोमीटरवर स्कायबसची घोषणा केली आहे. या हिशेबाने संपूर्ण प्रकल्पाला किमान ४२५० काेटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. एवढा मोठा निधी उभा करणे हे मोठे आव्हान असल्याचे या अभियंत्याने सांगितले. त्यामुळे ही निव्वळ घोषणाच ठरण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. 


रोडच्या निधीत कपात 
गडकरींनीच दोन वर्षांपूर्वी औरंगाबाद शहरातील जालना रोड सहा पदरी करण्यासाठी सुरुवातीला ४३० कोटी रुपयांची घोषणा केली हाेती. नंतर हे बजेट ३७० आणि पुढे २०० कोटींवर आले. आता तर अवघे १०४ कोटी रुपये खर्चून राष्ट्रीय स्तरावरील डांबरीकरण केले जाणार आहे. अशा परिस्थितीत ४२५० कोटीच्या स्कायबसचे दिवास्वप्नच असल्याचे अभियंत्यांनी सांगितले. 


आचारसंहितेची धाकधूक 
ऑस्ट्रेलियाची कंपनी १६ जानेवारी रोजी स्कायबसचे सादरीकरण करणार आहे. पण यापूर्वी गोवा आणि चेंबूरमध्ये स्कायबस प्रकल्प फेल ठरले आहेत. एप्रिल महिन्यात येऊ घातलेल्या लोकसभा निवडणुकीसाठी फेब्रुवारीअखेरीस आचारसंहिता लागण्याची शक्यता आहे. याचा प्रकल्पाला फटका बसण्याची शक्यता खासदार चंद्रकांत खैरे यांनी व्यक्त केली आहे. 

बातम्या आणखी आहेत...