आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मतदारांचा वाढलेला टक्का पडणार कुणाच्या पथ्थ्यावर?

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अहमदनगर - महापालिका निवडणुकीसाठी भाजप, शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी या प्रमुख पक्षांसह इतर पक्षही रिंगणात उतरणार आहेत. प्रभागरचना अंतिम झाल्यानंतरही प्रभागांच्या सीमारेषेवरील मतदारांचा गोंधळ अजूनही समजलेला नव्हता. पण प्रारूप मतदार याद्या जाहीर झाल्यानंतर प्रभागरचनेत हक्काचा मतदार इच्छुकांना समजला आहे. २ लाख ५६ हजार ७१९ मतदार मनपाच्या मतदारयादीत समाविष्ट झाले आहेत. मागील निवडणुकांच्या तुलनेत मतदारांचा टक्का वाढला असून हे मतदार कोणाच्या पथ्थ्यावर पडतील हे निकालातूनच स्पष्ट होईल. 


चौथ्या मनपा निवडणुकीची तयारी राजकीय वर्तुळासह प्रशासकीय पातळीवरही युद्धपातळीवर सुरू आहे. प्रारूप मतदारयादी जाहीर झाली आहे. मनपा २००३ मध्ये स्थापन झाल्यानंतर २०१३ च्या मनपा निवडणुकीत सुमारे सव्वादोन लाख मतदार होते. या निवडणुकीत मनपाच्या स्थापनेपासून विक्रमी ७२ टक्के मतदान झाले होते. आता जाहीर जाहीर झालेल्या प्रारूप यादीनुसार मतदारांची संख्या आता अडीच लाखांवर पोहोचली आहे. वाढलेला मतदारांचा टक्का तरुणांचा असल्याने प्रस्थापित दिग्गजांना धडकी भरवणारा आहे. ही मतदार यादी १ सप्टेंबर २०१८ रोजी अस्तित्वात असलेल्या विधानसभेच्या मतदार यादीनुसार तयार करण्यात आल्या आहेत. त्यातूनच प्रभागनिहाय मतदारांच्या याद्या तयार करण्यात आल्या आहेत. 


याद्या जाहीर झाल्यानंतर हरकती घेण्यासही गुरुवारपासूनच सुरवात झाली आहे, अंतिम मतदार यादी ६ नोव्हेंबरला प्रसिद्ध होईल. या याद्या मनपा कार्यालयात पाहण्यासाठी उपलब्ध होत्या. या याद्यांची प्रतही ठरावीक रक्कम भरल्यानंतर उपलब्ध होणार आहे. भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी व काँग्रेस या पक्षांनी निवडणुकीची तयारी सुरू केली. भाजप, शिवसेनेत इच्छुकांची गर्दी वाढत असताना राष्ट्रवादीने शिवसेनेला धक्का देण्याची रणनिती आखली आहे. जास्तीत जास्त उमेदवार निवडून आणण्यासाठी मातब्बरांसह गल्लीनेतेही सक्रिय झाले आहेत. 


प्रभागरचना ज्यांना समजली नाही, असे इच्छुक सोयीनेच प्रचार करत होते. त्यामुळे आपण कोणत्या प्रभागात आहोत, याबाबत नागरिकांत संभ्रम होता. पण आता हा संभ्रम दूर झाला आहे. मतदार यादीनुसार पुन्हा एकदा कार्यकर्ता पातळीवर प्रभागाचा स्वतंत्र फेरफटका मारून इच्छुक त्यांच्या उमेदवारीची माहितीपत्रके घरोघर पोहोचवणार आहेत. 

 

सर्वाधिक मतदार प्रभाग १२ मध्ये 
प्रभागनिहाय जाहीर झालेल्या प्रारूप मतदारयादीत प्रभाग १२ सर्वाधिक १९ हजार ११८ मतदार असलेला प्रभाग ठरला आहे. प्रभाग 1 (10 हजार ७५१), प्रभाग २ (१५ हजार ६७०) प्रभाग ३ (१३ हजार ६०९) प्रभाग ४ (१४ हजार ६९१), प्रभाग ५ (१८ हजार ६३०), प्रभाग ६ (१३ हजार २८७), प्रभाग ७ (१२ हजार ८३२), प्रभाग ८ (१४ हजार ९३४), प्रभाग ९ (१७ हजार ७१२), प्रभाग १० (१५ हजार ७४०), प्रभाग ११ (१६ हजार ३८८), प्रभाग १२ (१९ हजार ११८), प्रभाग १३ (१८ हजार ७८३), प्रभाग १४ (१५ हजार ३१४), प्रभाग १५ (११ हजार ६१९), प्रभाग १६ (१५ हजार ३१४), प्रभाग १७ (१२ हजार २९५) अशी मतदार संख्या आहे. 
एकूण मतदार : २५६७१९ 
स्त्री मतदार : १२४५८७ 
पुरुष मतदार : १३२१३२ 
मतदारयादीची पाने : ९६९१ 

 

अशी होतेय याद्यांची विक्री 
प्रारूप मतदारयादी जाहीर झाल्यानंतर सर्वच इच्छुकांनी प्रभागनिहाय यादी खरेदीची तयारी दर्शवली आहे. जुन्या मनपाजवळ माहिती सुविधा केंद्रात प्रभागनिहाय मतदार याद्या विक्रीसाठी उपलब्ध आहेत. त्यात एका पाठपोठ पानाची किंमत ४ रुपये असून यादीच्या एकूण पानांप्रमाणे दरआकारणी करण्यात आली आहे. प्रत्येक यादीची किंमत १ हजार ६३६ ते २ हजार ९०८ रुपयांपर्यंत आहे. 


मतदानाची टक्केवारी 
२००३ - ६७.१८ टक्के 
२००८ - ६०.३४ टक्के 

बातम्या आणखी आहेत...