आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शेतकऱ्यांच्या विधवा पत्नी अधिवेशनावर देणार धडक: अात्महत्या राेखण्यासाठी स्वतंत्र धाेरणाची मागणी

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक - पुढील आठवड्यात मुंबईत होऊ घातलेल्या हिवाळी अधिवेशनाच्या निमित्ताने पहिल्यांदाच राज्यातील आत्महत्याग्रस्त कुटुंबांतील शेतकरी महिला रस्त्यावर उतरणार आहेत. महिला किसान आंदोलन मंचाच्या वतीने हे आंदोलन छेडण्यात आले आहे. आत्महत्याग्रस्त कुटुंबांतील महिलांचे प्रश्न सुटावेत आणि शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबाव्यात, या उद्देशाने समग्र धोरण वा स्वतंत्र कायदा असावा या मागणीसाठी हे धरणे आंदोलन करण्यात येणार आहे.

 
आत्महत्याग्रस्त कुटुंबांतील शेतकऱ्यांच्या विधवा पत्नी आणि निराधार मातांचे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. त्यांच्यासोबत कार्यरत राज्यातील सर्व संस्था, संघटना महिला किसान अधिकार मंच म्हणजे ‘मकाम’ या छत्राखाली एकत्र आल्या आहेत. नागपूर, यवतमाळ आणि औरंगाबादमध्ये विभागीय स्तरावर चर्चासत्रे, सर्वेक्षण केल्यानंतर आता या मंचाच्या वतीने हिवाळी अधिवेशनाच्या निमित्ताने मुंबईत धरणे आंदोलन करण्यात येत आहे. या महिलांचे प्रश्न सोडवण्यासाठी स्वतंत्र धोरण आखण्यात यावे, ही यांची मुख्य मागणी आहे.  


आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांना सध्या मिळणारी तातडीची १ लाखांची मदत २००५ मध्ये ठरवण्यात आली होती. गेल्या १३ वर्षांत त्यात वाढ करण्यात आली नसल्याचे या महिलांचे म्हणणे आहे. दरम्यान, आंध्र प्रदेशात ही मदत साडेतीन लाख, तर तेलंगणा आणि कर्नाटकात ५ लाख रुपये आहे. महाराष्ट्रातील ही मदतही वाढवून मिळावी, ही या आंदोलनाची प्रमुख मागणी आहे.

 

राज्यातील २५ हजार शेतकरीही काढणार पायी माेर्चा
राज्यातील १३ विविध शेतकरी संघटनांनी एकत्र येत स्थापन केलेल्या शेतकरी सुकाणू समितीने शेतकऱ्यांच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी ‘ठाणे ते विधानभवन’ मोर्चा काढणार अाहेत. २५ नाेव्हेंबर रोजी हा मोर्चा ठाण्यातून निघून २६ रोजी विधिमंडळावर धडकणार आहे. यात राज्यातील २५ हजार शेतकरी, आदिवासी, शेतमजूर ठाण्यातून पायी विधानभवनावर मोर्चा नेणार अाहेत. शेतकरी संघटनेचे नेते रघुनाथ पाटील  म्हणाले, सध्या राज्यात तीव्र दुष्काळ आहे. जनावरांच्या चारा-पाण्याची अवस्था बिकट आहे. चारा छावणीला न देता जनावरांच्या दावणीला देण्याची आमची मागणी आहे. राष्ट्रीय आपत्ती निवारण कायद्यात दुष्काळाचा समावेश झालेला नाही. या वेळी इतर मागण्याही करण्यात येणार असल्याचे ते म्हणाले.

 

अात्महत्याग्रस्त कुटुंबीयांच्या मदतीत भरीव वाढीची मागणी

> मदतीची रक्कम पाचपट करा  

> पात्र-अपात्रतेचे निकष बदला  
> विधवा पेन्शनची रक्कम २ हजार करा  
> मुलांच्या मोफत शिक्षणाची सवलत  मराठवाड्याला लागू करा  
> कोणत्याही अर्जाशिवाय स्वतंत्र रेशन कार्ड द्या  
> रेशन कार्डासाठी पुराव्यांची सक्ती रद्द करा  
> सरकारी दवाखान्यांतील रिक्त पदे भरा  
> वारसा नोंदीसाठी विशेष मोहीम राबवा  
> ‘उमेद’अंतर्गत रोजगार मिळवून द्यावा  
>  शेतकरी कुटुंबीयांसाठी समुपदेशन आणि साहाय्य कक्ष सुरू करा  
>  किसान मित्र हेल्पलाइन सुरू करा.

बातम्या आणखी आहेत...