आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिवराज्याभिषेक दिन विशेष : आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याची पत्नी करणार शिवराज्याभिषेक, खरा मान रयतेला - छत्रपती संभाजी महाराज

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

उस्मानाबाद - किल्ले रायगडावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिवराज्याभिषेक सोहळ्याचा मान उस्मानाबाद जिल्ह्यातील आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबाला मिळणार आहे. उस्मानाबाद तालुक्यातील मेडसिंगा येथील शेतकरी कुटुंबाला घेऊन कार्यकर्ते बुधवारी(दि.५) रायगडाकडे रवाना झाले. छत्रपती शिवाजी महाराज हे रयतेचे राजे होते, त्यामुळे रयतेलाच त्यांच्या राज्याभिषेकाचा मान मिळावा या भूमिकेतून कार्यक्रमाचे नियोजन केल्याचे छत्रपती संभाजी महाराजांनी ‘दिव्य मराठी’ला सांगितले.


किल्ले रायगडावर ६ जून रोजी मोठ्या दिमाखात रयतेच्या राजा अर्थात छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा होतो. अखिल भारतीय शिवराज्याभिषेक सोहळा समितीच्या वतीने दरवर्षी दिमाखदार सोहळा आयोजित करण्यात येतो. यावर्षी महाराष्ट्रात भीषण दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली असून, शेतकऱ्यांमध्ये प्रचंड नैराश्य दिसत आहे. नापिकी आणि कर्जबाजारीपणामुळे शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढत आहेत. या पार्श्वभूमीवर शिवराज्याभिषेक सोहळा समितीचे मार्गदर्शक तथा सोहळ्याचे आयोजक खासदार छत्रपती संभाजी महाराज यांनी शेतकऱ्यांची नोंद घेतली आहे. त्यांनी या वर्षीचा शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक शेतकरी कुटुंबाच्या हस्ते करण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याच्या पत्नीची निवड करण्यात आली आहे. छत्रपती संभाजी महाराजांचे निकटवर्तीय योगेश केदार हे मूळचे उस्मानाबादचे. त्यांनी उस्मानाबादमधील कार्यकर्ते रोहित पडवळ, अभिजीत निंबाळकर, महादेव माळी, प्रणील रणखांब, बलराज रणदिवे, कुणाल निंबाळकर, अंगद आगळे आदींच्या माध्यमातून मेडसिंगा (ता.उस्मानाबाद) येथील आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबाची निवड करून संभाजी महाराजांना ही माहिती दिली. त्यानंतर या कुटुंबीयांना घेऊन कार्यकर्ते बुधवारी रायगडाकडे रवाना झाले. सकाळी ९ वाजता रायगडावर शिवराज्याभिषेकाचा सोहळा होणार आहे. आत्महत्याग्रस्त शेतकरी लक्ष्मण अवचार यांच्या पत्नी रेश्मा यांच्या हस्ते शिवराज्याभिषेक सोहळा होणार असून, त्यांच्यासमवेत त्यांचे सासरे गणपती अवचार, सासू चिवाबाई अवचार आणि मुलगी कृष्णाली अवचार उपस्थित राहणार आहेत. या सोहळ्यासाठी छत्रपती संभाजी महाराज यांच्यासह विविध राज्यांचे राजदूत आणि राज्यातील मंत्री उपस्थित राहणार आहेत.

 

काय आहे कुटुंबाची पार्श्वभूमी ?
 लक्ष्मण अवचार यांनी नापिकी, दुष्काळी स्थिती आणि कर्जबाजारीपणामुळे दि. १९ मे २०१५ रोजी गळफास घेऊन आत्महत्या केली. त्यांच्या पश्चात आई-वडील, पत्नी, एक मुलगा, एक मुलगी आहे. २५ वर्षांच्या वयात लक्ष्मण यांनी जीवनयात्रा संपवली मात्र, त्यांच्या जाण्याने कुटुंबावर संकट उभारले आहे. त्यांचे वडील गणपती, आई चिवाबाई, पत्नी रेश्मा यांना दररोज मोलमजुरी करून उदरनिर्वाह चालवावा लागतो. नापिकीमुळे लक्ष्मण यांच्यावर सुमारे ५ लाख रुपयांचे सावकारांचे कर्ज झाले होते. त्यामुळे त्यांनी आत्महत्या केली. मात्र, त्यांच्या कुटुंबीयांना शासनाकडूनही आर्थिक मदत मिळाली नाही.

 

खरा मान रयतेला
छत्रपती शिवाजी महाराज हे रयतेचे राजे होते. त्यामुळे राज्याभिषेकाचा  मान  शेतकरी कुटुंबाला देण्याचा निर्णय घेतला आहे. दुष्काळामुळे शेतकऱ्यांमध्ये नैराश्याचे वातावरण  आहे. मात्र, अशा कार्यक्रमातून त्यांच्यामध्ये पुन्हा  शिवाजी महाराजांचे विचार रुजवण्याचे प्रयत्न करीत आहोत. शेतकरी हा खरा राजा आहे. आत्महत्याग्रस्त कुटुंबातील ताईंच्या हस्ते राज्याभिषेक झाल्यास खऱ्या अर्थाने हा सोहळा रयतेचा ठरेल.
-छत्रपती संभाजी महाराज, कोल्हापूर.