आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराजळगाव - शंकर अप्पानगरात महिला एकटी असल्याची संधी साधून शेजारी राहणाऱ्या एका तरुणाने घरात घुसून तिच्या अंगावरील दागिने ओरबाडण्याचा प्रयत्न केला. महिलेने विरोध केल्यानंतर त्याने महिलेवर चाकूने चार वार केल्याची घटना शनिवारी सायंकाळी ७.१५ वाजता घडली. यात महिला गंभीर जखमी झाली. या महिलेवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
शंकरअप्पानगरात राहणाऱ्या प्रतिभा प्रदीप पाटील (वय ४७) असे जखमी महिलेचे नाव आहे. तर त्यांच्यावर प्राणघातक हल्ला करणारा मनोज शिवाजी चंदेले (वय २२) हा देखील तेथेच राहतो. शंकरअप्पानगरात एकाच दुमजली इमारतीमध्ये पाटील व चंदेले कुटुंबीय भाड्याने राहतात. दरम्यान, जखमी प्रतिभा पाटील यांचे पती प्रदीप पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी सायंकाळी ७.१५ वाजता प्रतिभा पाटील या वरच्या मजल्यावरील घरात एकट्या होत्या. ही संधी साधून मनोज त्यांच्या घरात शिरला. अन् त्याने आतून दरवाजा बंद करून प्रतिभा यांच्या अंगावरील दागिने ओरबाडण्याचा प्रयत्न केला.
विरोध करताच मनोजने हातातील चाकूने प्रतिभा यांच्या मानेवर, छातीवर व पाठीवर असे एकूण चार वार केले. या हल्ल्यात प्रतिभा पाटील या गंभीर जखमी झाल्या अाहेत. तर मनोज पासून स्वत:ची सुटका करण्यासाठी जीवाच्या आकांताने प्रतिभा पाटील यांनी अारडा-ओरड केली. त्यांच्या किंचाळ्या ऐकून खालच्या मजल्यावर राहणारे तसेच शेजारच्यांनी वरती धाव घेतली. परंतु, मनोज याने आतून दरवाजा बंद केलेला असल्यामुळे नागरिकांना काहीच करता येत नव्हते. तर दुसरीकडे तो प्रतिभा पाटील यांना मारहाण करत असल्यामुळे त्या विव्हळत होत्या. अखेर नागरिकांनी घराचा दरवाजा तोडून घरात प्रवेश मिळवला. यानंतर गंभीर अवस्थेत व रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या प्रतिभा पाटील यांना वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केले. प्रकृती गंभीर असल्यामुळे नंतर त्यांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. या प्रकरणी रात्री उशिरापर्यंत रामानंदनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.
अाराेपी मनोज पोलिस भरतीची तयारी करणारा
मनोज हा पोलिस भरतीची तयारी करत होता. अचानक त्याने अशा प्रकारचे कृत्य केल्यामुळे परिसरात खळबळ उडाली अाहे. रात्री उशिरापर्यंत परिसरातील नागरिक पाटील यांच्या घराजवळ थांबून होते. माजी नगरसेवक चंद्रकांत कापसे, मंगलसिंग पाटील यांनी प्रदीप पाटील यांना धीर देत मदत केली. दरम्यान, ताब्यात घेतल्यानंतर मनाेज याने वेगळीच स्टोरी पोलिसांना सांगितली.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.