आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आत्याच्या घरी आलेल्या महिलेचा अागीमध्ये मृत्यू , शेजारची तीन घरेही जळाली

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक - गंजमाळ परिसरातील पंचशीलनगर भागात बुधवारी (दि. १४) दुपारी अचानक एका घराला आग लागून मंगळवारी रात्रीच आत्याच्या घरी आलेल्या महिलेचा मृत्यू झाला. या आगीत शेजारची आणखी तीन घरे जळाली आहेत. या घटनेनंतर संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण पसरले होते. हॉटेल रॉयल हेरिटेजमागील परिसरात दुपारी एक वाजेच्या सुमारास भागूबाई आव्हाड यांच्या घराला आग लागल्याचे लक्षात येताच स्थानिकांनी घराकडे धाव घेतली.

 

नागरिकांनी आग विझविण्याचा प्रयत्न केला; मात्र अल्पावधीत आगीने रौद्ररूप धारण केल्याने त्यांचे प्रयत्न निष्फळ ठरले. अग्निशमन दलाचे बंब काही मिनिटांत घटनास्थळी दाखल झाले. घराच्या तिन्ही बाजूने पाण्याचा मारा करत त्यांनी आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. परिसरातील युवकांनी शेजारील घरांवरून जात पत्रे तोडून पाण्याचा मारा करण्यासाठी मोकळी जागा करून दिली. शेजारी असलेल्या रत्ना मोरे, अकिल खान, अकबर शेख यांच्या घरांनाही अाग लागली हाेती. अग्निशमन दलाकडून आग विझविण्याचा प्रयत्न सुरू असतानाच दुसरीकडे स्थानिकांनी अाव्हाड यांच्या घराचा दरवाजा तोडला असता समोरच त्यांची भाची सुनीता योगेश जटाळे-लाहोटी (वय ३०, रा. भगूर) या संपूर्ण जळालेल्या अवस्थेत दिसून आल्या. 

 

पोलिसांनी रुग्णवाहिका बोलवून तातडीने शासकीय रुग्णालयात पाठविले; मात्र तेथे त्यांना मृत घोषित करण्यात आले. या आगीत तिन्ही घरांतील संसाराेपयोगी साहित्य जळून खाक झाले. आगीचे कारण समजू शकले नाही. भद्रकाली पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक मंगलसिंग सूर्यवंशी तपास करीत आहेत. दीड तासाच्या अथक प्रयत्नानंतर आगीवर नियंत्रण मिळविण्यात अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांना यश आले.


गॅस सिलिंंडर गायब अन‌् सापडलेही... : परिसरातील युवकांनी घटनास्थळाजवळील सर्व घरातील गॅस सिलिंडर घरातून बाहेर काढण्यास सांगितल्यामुळे रहिवाशांनी सिलिंडर तत्काळ घराबाहेर काढून ठेवले. मात्र, या वेळातच काही सिलिंडर गायब झाल्याचे लक्षात येताच महिलांनी गोंधळ घातला. पोलिसांनी परिसरातील काही घरांची तपासणी करून चार-पाच सिलिंडर परत मिळवले.

 

धूर दिसताच घेतली घराकडे धाव..

मी माझ्या बेकरीत काम करत असताना भागू मावशीच्या घरातून धूर निघताना पाहिला आणि कोणताही वेळ वाया न घालता त्यांच्या घराकडे धाव घेतली. मला सूरज उमाप तिकडे पळताना दिसला. त्याने व मी घरावर पाणी मारण्यास सुरुवात केली. दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला; परंतु आतून कडी लागलेली होती. अन्य स्थानिकांनीही आग विझविण्याचा प्रयत्न केला. काही वेळेतच अग्निशमन दल व पोलिस दाखल झाले. काही वेळानंतर आम्ही लाथ मारून दरवाजा उघडला तेव्हा एक महिला जळालेल्या अवस्थेत दिसली.

 

अरुंद बोळांमुळे अाग लागलेल्या घराकडे लांबवरून पाइप न्यावा लागला.
अरुंद बोळांमुळे बचावकार्यात अडथळे पंचशीलनगर भागातील अरुंद गल्लीबोळ व दाट लोकवस्तीमुळे आग विझविण्यात व बचावकार्यात माेठे अडथळे निर्माण झाले होते. घटनास्थळावर पोहोचण्यासाठीच अग्निशमन दलाच्या वाहनाला मोठी कसरत करावी लागली. दलाचे शिंगाडा तलाव, पंचवटी भागातील दोन बंब व एक देवदूत वाहन परिसरात पोहोचल्यानंतर घटनास्थळी पोहोचण्यास जागा नसल्याने हॉटेल रॉयल हेरिटेजसमोर उभे करण्यात आले होते. त्या ठिकाणावरूनच ५०० मीटर आंतरावर पाइप घेऊन जात अग्निशमन दलाच्या जवानांनी आग अाटोक्यात आणली.


सुनीताला भाजी अाणण्यासाठी गेले अन‌्...
दुपारी सुनीता मला म्हणाली, 'आत्या, मला भाजी आण. मला भाजी खायची आहे'. म्हणून मी एक वाजेच्या सुमारास भाजी आणण्यासाठी घरातून बाहेर गेले. काही मिनिटांतच शेजारच्या काही लोकांनी मला सांगितले की तुमच्या घरातून धूर निघतोय. मी घराकडे धावले. सुनीताचा जळून मृत्यू झाला. ती काही दिवस माझ्याकडे राहण्यासाठी आली होती. - भागूबाई आव्हाड


आठ पाइप नेऊन अाग विझवली...
आग लागलेल्या घरात लाकडाचे पार्टिशन केलेले होते. त्यामुळे आग झपाट्याने वाढली. अरुंद गल्लीबोळ असल्याने आग विझविण्यात अडचणींचा सामना करावा लागला. पाचशे मीटर अंतरावरून अाठ पाइप नेत अाग अाटाेक्यात अाणली. - संजय बैरागी, प्रभारी मुख्य अग्निशमन अधिकारी

बातम्या आणखी आहेत...